पणजी – फोंडा मार्गावर कोने – प्रियोळ येथील भीषण अपघातात एका तरुण अध्यापिकेचा नाहक बळी गेला. बेफाम, बेशिस्त वाहतुकीतून हा अपघात घडला हे तर स्पष्टच आहे. वळणावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसचालक असताना अचानक समोरून टँकर आल्याने त्याची बसशी समोरासमोर धडक बसली, टँकर बाजूच्या दरीत फेकला गेला आणि बसच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. अपघातग्रस्त बसमध्ये सारे नियम धुडकावून केबिनमध्ये प्रवासी बसले होते. साहजिकच टँकरची धडक बसताच रक्ताचे पाट वाहिले. रस्ता अपघातांचे प्रचंड प्रमाण ही गोव्यातील एक प्रमुख समस्या आहे आणि वाहतूक खात्याला त्यामध्ये शिस्त आणण्यात आजवर पूर्णपणे अपयश आलेले आहे. त्यामुळे अपघात घडला की काही दिवस वाहतुकीत शिस्तीची गरज व्यक्त करीत चर्चा करायची आणि काही दिवसांनी सारे विसरून जायचे असाच प्रकार गेली अनेक वर्षे चालला आहे. या अशा प्रकारच्या अपघातांपासून आपण काही धडा घेणार आहोत की नाही? राज्यातील बेशिस्त, बेदरकार बस वाहतुकीमध्ये सुधारणा होणार की नाही? परवाच्या अपघातानंतरच हाच प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खासगी बस वाहतूक ही बेशिस्तीची परमावधी आहे आणि वाहतूक खाते आणि त्यातील भ्रष्ट निरीक्षक खासगी बस वाहतूकदारांचीच आजवर पाठराखण करीत आलेले आहेत हे वास्तव गोमंतकीय जनतेला एव्हाना पुरेपूर कळून चुकले आहे. बसवाल्यांनी तिकीट दरवाढीची मागणी करायची, सरकारने आधी नाही – नाही म्हणायचे आणि वाहतुकीत शिस्त आणण्याचा आव आणत तिकीट दरवाढ देऊन मोकळे व्हायचे, काही दिवस युद्धाला तोंड फुटल्यासारखे वाहतूक निरीक्षकांनी वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्याचे भासवायचे, गाड्या अडवायच्या, चालकांना, वाहकांना तालांव द्यायचा, आपण कारवाई करतो आहोत असा सारा देखावा करायचा आणि पुन्हा बसमालक आणि वाहतूक अधिकारी एकमेकांच्या गळ्यात गळा घालायला मोकळे. गोव्याच्या जनतेला या सार्या प्रकाराची एव्हाना सवय झाली आहे. परवाच्या अपघातानंतर जनता हळहळली, बसचालकांना शिस्त नाही, वाहन कसे चालवावे त्याचा ताळतंत्र नाही यावर चर्चा झडल्या, परंतु यातून निष्पन्न काय होणार आहे? स्वतः वाहतूकमंत्र्यांनी हा बस अपघात प्रत्यक्ष पाहिला. त्यांनी जखमींना स्वतःच्या वाहनातून इस्पितळात हलवण्याचे कर्तव्यही पार पाडले. परंतु पुढे काय? असे अपघात घडू नयेत यासाठी ते काय करणार आहेत हा खरा प्रश्न आहे. अपघात हा कधी सांगून होत नसतो हे खरे, परंतु प्रत्येक अपघातामागे काही कारणे असतात. कधी चालकाने मद्यपान केलेले असते, कधी वाहनाने वेगमर्यादा ओलांडलेली असते, कधी वाहतूक नियमाचे उल्लंघन केलेले असते. येणार्या – जाणार्या वाहनांनी स्वयंशिस्त पाळली आणि थोडी काळजी घेतली तर अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते. परंतु एकाने जरी बेशिस्त दाखवली, तरी दुसर्याच्या प्राणांवर ते बेतल्याखेरीज राहत नाही. राज्यातील महामार्ग तर मृत्यूचे सापळेच बनलेले आहेत. आगशीच्या नव्या बायपासवर आजवर किती अपघात घडले, बांबोळीच्या उतरणीवर किती अपघात घडले, पण त्यापासून आपण धडा कुठे घेतला? पुन्हा पुन्हा अपघात होतच आहेत, माणसे मरत आहेत आणि संबंधित अधिकारी डोळ्यांवर झापडे ओढून बसले आहे. वाहन चालवण्याचीही एक संस्कृती असते, जी बहुतांश गोमंतकीय चालकांमध्ये दिसून येत नाही. रस्त्यांची स्थिती तर दिव्यच आहे! ज्या कोने – प्रियोळ येथे सदर अपघात घडला, तेथे भरधाव वाहने येत असतात. रस्त्यांच्या कडेला वाट्टेल तिथे फळे, भाज्या घेऊन विक्रेते बसलेले असतात. काही वाहने त्यासाठी मध्येच थांबवली जातात, त्यांना न जुमानता इतर वाहने भरधाव धावत असतात. शिस्त नावाची चीजच कुठे दिसत नाही. ज्या बसला अपघात झाला, त्या मिनीबसची प्रवाशांची क्षमता किती आणि आत किती प्रवासी होते? केबिनमध्ये किती प्रवासी बसले होते? चालकापाशी योग्य ते सर्व परवाने होते का? बस सुस्थितीत होती का? वळणावर भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याचा त्याने प्रयत्न केला का? या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. ज्या चालकाच्या चुकीमुळे अपघात घडला त्याच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जावा. त्याचा आणि बसचा परवाना रद्दबातल केला जावा. वाहतुकीतील बेशिस्त नाहीशी करण्यासाठी थोडी कठोर पावले उचलावीच लागतील. केवळ हळहळण्यापेक्षा असे प्रकार टाळण्यासाठी पावले उचलणे अधिक उपकारक ठरेल!