Home बातम्या गलितगात्र!

गलितगात्र!

0

महाभारत घडून गेल्यावर सारी वाताहत आणि उदासीच मागे उरावी तशी गोव्यातील कॉंग्रेस पक्षाची सध्या दयनीय स्थिती झाली आहे. जबाबदार नेते मिठाच्या गुळण्या घेऊन बसले आहेत, ज्यांनी या पक्षाच्या बळावर सत्तेची चव चाखली ते आता पक्षाला वार्‍यावर सोडून स्वतः नामानिराळे होऊ पाहत आहेत आणि बिचारे सामान्य कार्यकर्ते मात्र तोंडघशी पडले आहेत. पक्षात प्राण फुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न मिरामारच्या मेळाव्यात झाला, परंतु पक्षाची एकसंध ताकद दिसण्याऐवजी सध्याचे विस्कळीत, असंघटित, गलितगात्र रूपच त्यातून उघडे पडले. विद्यमान आमदारांपैकी सहा आमदारांनी पक्षाच्या या महत्त्वपूर्ण मेळाव्याकडे पाठ फिरवणे हे कशाचे लक्षण आहे? जे हजर होते, त्यापैकी अनेकजण तेथे मनाने सामील होते की केवळ शरीरानेच याविषयीही साशंकता आहे. सत्ता येणे आणि हातची जाणे हा राजकारणात उन सावलीचा खेळ असतो. परंतु गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या हातची सत्ता गेली आणि जणू काही सर्वस्व गमावले अशा रीतीने चेतनाहीन, दयनीय स्थितीमध्ये हा पक्ष पोहोचला आहे. सुरवातीचे शंभर दिवस आपण मौन पाळू असे विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे म्हणाले, तेव्हा जनतेचा कॉंग्रेसविरोधी ‘मूड’ पाहून त्यांनी मौन पत्करले असेल असे सर्वांना वाटले होते.

पण कॉंग्रेसला धुडकावून टाकणारी जी लाट गेल्या निवडणुकीत आली, ती ओसरल्यावर तरी कॉंग्रेस नेते बोलतील, सक्षम विरोधकाचे आपले कर्तव्य पार पाडतील अशी अपेक्षा होती, परंतु हाय रे दैवा, ती पूर्णपणे फोल ठरली आहे. कालपरवा पक्षात आलेल्या ताम्हणकरांच्या बेताल, पोरकट वक्तव्यांना पक्षाची अधिकृत भूमिका मानावे तर त्या वक्तव्यांना काही ताळतंत्रच नाही. वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल तसे बरळणे याला ‘भूमिका’ म्हणत नाहीत हे यांना समजवणार कोण? अधूनमधून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना पुढे केले जाते, परंतु आक्रमकता हा त्यांचा पिंडच नाही. ज्यांनी खरे तर आघाडी लढवायची, ते कॉंग्रेसचे रथी – महारथी कोठे आणि कशासाठी दडून बसले आहेत? यांना बोलायची भीती का वाटते? आपण बोललो तर सरकार आपल्यामागे लागेल ही भीती आहे का? जनता गेले अनेक महिने हे सवाल विचारते आहे. वास्तविक लोकशाहीमध्ये सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी जबाबदार विरोधी पक्षही तितकाच महत्त्वाचा असतो. सरकार काही गैर वागत असेल, चुकत असेल तर त्यावर बोट ठेवण्याचे काम विरोधी पक्षाचे. परंतु गेल्या निवडणुकीतील धुळधाणीनंतर कॉंग्रेसची जी केविलवाणी स्थिती झालेली आहे ती पाहिली तर विरोधी पक्ष म्हणून पुन्हा पाय रोवून उभे राहण्याची ताकदच त्यांच्यात उरलेली दिसत नाही. एवढे पाय लटपटायला लागले तरी कशामुळे? विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांचा पिंड अद्वातद्वा बोलण्याचा नाही. ते एक समंजस आणि सुसंस्कृत नेते आहेत. कालच्या मेळाव्यात त्यांनी पर्रीकरांना दहा तोंडांनी बोलणार्‍या रावणाची उपमा दिली. पण समजा हा रावण असेल तर त्याच्यावर शरसंधान करण्याएवढा ‘राम’ तरी कॉंग्रेस पक्षात उरला आहे काय? खाणींचा प्रश्न बिकट बनेल आणि जनता सरकारच्या विरोधात जाईल याची कॉंग्रेस नेते वाट पाहात आहेत असे दिसते. त्यामुळे कायदेशीर खाणी सुरू व्हाव्यात, खाण अवलंबितांना पॅकेज मिळावे अशी भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे. मात्र, आजची ही स्थिती या खाण अवलंबितांवर का ओढवली? कोणामुळे ओढवली ते जनताही पुरती जाणून आहे. आजची परिस्थिती गेल्या सात – आठ महिन्यांतील घडामोडींतून उद्भवलेली नाही. त्याला गेल्या अनेक वर्षांतील अंदाधुंदीची पार्श्वभूमी आहे आणि खाणी बंद पाडण्यात केंद्र सरकारचाही वाटा आहेच की! पर्रीकर यांच्या सरकारला सुधाकर रेड्डी ‘भाई सरकार’ म्हणाले. पर्रीकर वेळोवेळी ‘यू टर्न’ घेत आहेत असे त्यांचे म्हणणे होते. मग अशा प्रकारे जर विद्यमान मुख्यमंत्री यू टर्न घेत असतील तर त्यांना उघडे पाडायला समस्त कॉंग्रेसजनांचे हात कोणी बांधले आहेत? त्यासाठी आधी त्यांनी बोलायला तर हवे! वस्तुस्थिती अशी आहे की आज कॉंग्रेसच्या बहुतेक नेत्यांना पक्षाच्या भवितव्याची काही फिकीर नाही. जो तो स्वतःच्या भवितव्याच्या चिंतेत आहे. मेळाव्याला सहा आमदारांची अनुपस्थिती हा याचा सज्जड पुरावा आहे. एवढी विकलांग स्थितीतील ही पक्षसंघटना सरकारला ती काय घेरणार! मुळात पक्षामध्ये, पक्षाच्या आमदारांमध्ये एकवाक्यता आहे का? त्यामुळे या मंडळींनी आधी स्वतःला सावरावे आणि मग बोलावे हेच शहाणपणाचे ठरेल!