>> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट संघांचे व्यस्त वेळापत्रक
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड भविष्यातील दौर्यांच्या कार्यक्रमांनुसार (एफटीपी) वेस्ट इंडीज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश संघाविरुद्ध मालिकांचे आयोजन करणार आहे. या सर्व मालिका न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी ही माहिती दिली.
सर्व मालिका या जैव-सुरक्षित वातावरणात खेळविल्या जाणार असल्याचे सांगतानाच डेव्हिड यांनी न्यूझीलंड दौर्यावर येणार्या संघांना विलगीकरणात ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेने जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झालेली आहे. मार्चमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दौरा अर्धवट रद्द झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ अजून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाही आहेत.
या दौर्यांच्या आयोजनासाठी आम्ही तेथील क्रिकेट बोर्डांच्या संपर्कात आहोत. वेस्ट इंडीज बोर्डाशी फोनवर संपर्क केलेला आहे. त्यांच्याकडून पुष्टीही मिळालेली आहे. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डानीही दौर्यावर येणार असल्याची पुष्टी दिलेली आहे, असे व्हाईट यांनी सांगितले.
न्यूझीलंडच्या महिला सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघ फेब्रुवारीत न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. आम्ही फक्त आशयावर काम करीत आहोत. पण बहुधा पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० मालिका खेळविल्या जातील, असे व्हाईट म्हणाले. व्हाईट यांनी दौर्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली नाही. परंतु सर्व मालिका या जैव-सुरक्षित वातावरणात खेळविल्या जातील असे ते म्हणाले.
न्यूझीलंडच्या सध्याच्या एफटीपीनुसार ते वेस्ट इंडीज व पाकिस्तान या दोन्ही देशांविरुद्ध कसोटी आणि टी -२०, बांगलादेशविरुद्ध वनडे आणि टी -२० मालिका खेळतील. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका छोटेखानी मालिकेचे नियोजन करण्यात आलेले आहे.