चतुर्थीच्या निमित्ताने शहरी भागात वास्तव्य करून असलेले गोमंतकीय गावातील घरात जमतात. आजच्या काळात नात्यातील माणसेही क्वचितच एकमेकांना भेटत असतात. परंतु या सणाच्या निमित्तानेच परस्परांमधील स्नेहसंबंध वृद्धिंगत होण्यास काही प्रमाणात मदत होत आहे. त्यामुळे काहीजण हा सण पाच किंवा सात दिवस साजरा करणे पसंत करीत असतात.
गणेश चतुर्थीची खरेदी करण्यासाठी काल राज्याच्या बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होती. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच मोटीळीच्या सामानाचे दरही प्रचंड वाढले आहेत, असे असतानाही उत्सवप्रिय गोमंतकीय काल संध्याकाळी उशिरापर्यंत माटोळीचे सामान खरेदी करण्यात दंग होते. काही वर्षांपूर्वी या सणासाठीचे माटोळीचे सामान गावातच मिळत होते. आता परिस्थिती बदलल्याने शहरातील बाजारात गौरी पूजनाला लागणार्या सर्वच वस्तू उपलब्ध होऊ लागल्याने गावी जाणारे लोक शहरातून ‘पत्री’ घेऊन जाणे पसंत करीत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या सणासाठी गावी जाणार्या लोकांना पोलिसांनी मौल्यवान वस्तू शहरातील घरात ठेवून न जाण्याचे आवाहन केले आहे. शहरी भागातील घरे बंद असल्याने चोर्यांचेही प्रकार होतात. त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या वसाहतींच्या परिसरात गस्त वाढविण्याचा निर्णय घेऊन पोलीस शिपायांवर जबाबदारी सोपविली आहे.
गणेशमूर्ती घरी नेण्यास प्रारंभ
काल जोरदार पावसातून लोक गणेश चित्रशाळेतील मूर्ती घरी नेताना दिसत होते. माटोळीचे सामान खरेदी करण्यासाठीही बरीच गर्दी उसळली होती. म्हापसा शहरात विविध ठिकाणच्या चित्रशाळांत लोकांनी आपल्या पसंतीच्या मूर्ती पसंत करून ठेवल्या होत्या. कालपासून त्या घरी नेण्यास प्रारंभ झाला. भर पावसातही कुटुंबांतील सदस्यांनी उत्साहात गणेशमूर्ती घरी नेल्या.
१७ सार्वजनिक गणपतींची चित्रशाळा
गोव्यातील सुमारे १७ सार्वजनिक गणपती बनविणार्या तुये मुरमुसे येथील भालचंद्र कळंगुटकर यांची चित्रशाळा सुबक गणेशमूर्तींनी सज्ज झाली आहे. सार्वजनिक गणेशमूर्तींबरोबर अनेक लोक घरी पुजायचे गणपतीही त्यांच्याकडून करून नेतात. गेली अनेक वर्षे त्यांनी ही मूर्ती बनविण्याची परंपरा सुरू ठेवली आहे.