रेल्वे ठप्प झाल्याने शेकडो प्रवासी मडगाव तसेच गोव्याच्या अन्य रेल्वे स्थानकांवर अडकून पडले. रस्ता मोकळा करण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्याने काल सायंकाळी मुंबईला जाणारी कोकण कन्या ही गाडी अखेर रद्द करण्यात आली होती तर एर्नाकुलम येथून दिल्ली, गुजरातपर्यंत जाणार्या गाड्या लोंढामार्गे सोडण्यात आल्या होत्या.
मांडवी ही गाडी काल सकाळी ८.३० वाजता मडगाव रेल्वे स्टेशनवरून सोडली होती. मात्र भिंत कोसळल्याचे कळल्यानंतर ती वेर्णा येथे थांबविण्यात आली. यावेळी प्रवाशांनी बराच वेळ होऊन रेल्वे अधिकार्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर स्टेशनमास्तरला घेराव घातला व संताप व्यक्त केला. त्यानंतर ती गाडी करमळीपर्यंत पाठविण्यात आली.
दरम्यान, ऐन चतुर्थीच्या दिवसांत गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांत निराशा पसरली होती. मुंबईहून गोव्यात येणारे प्रवासीही वाटेत अडकून पडले होते. रेल्वे महामंडळातर्फे त्यांना मुंबईहून गोव्यात येण्यासाठी कोणतीच व्यवस्था केली नव्हती असे कळते.
रत्नागिरी जिल्ह्यात पोमेंडी येथे काल सकाळी ८.१५ वा. २० मीटर उंचीची संरक्षक भिंत कोसळून माती रुळांवर आल्याचे निदर्शनास आल्यानंतर रेल्वे मार्ग ताबडतोब बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र तसेच गुजरात, नवी दिल्ली आदि ठिकाणी जाणार्या गाड्या तात्काळ वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात आल्या.
घटनेची माहिती मिळताच अभियंते व अन्य जणांचे पथक पाठवून मार्ग मोकळा करण्याचे काम हातात घेण्यात आले होते. जोरदार पावसामुळे दुरूस्तीकाम कठीण झाले होते. सुरूवातीस संध्याकाळी ५ पर्यंत मार्ग खुला केला जाईल असे रेल्वे सूत्रांनी सांगितले होते. मात्र शेवटी रात्री उशीरा मार्ग मोकळा करण्यास यश आले त्यानंतर वाहतूक सुरू झाली. चतुर्थीच्या दिवसांत मुंबईहून कोंकण व इतर भागांत जाणार्या लोकांची संख्या बरीच मोठी असते. हे सर्व प्रवासी मुंबई व अन्य स्थानकांवर काल अडकून पडले. यंदाच्या पावसाळ्यात पोमेंडी येथे कोंकण रेल्वेचा मार्ग बंद होण्याची ही तिसरी वेळ आहे. जोरदार पाऊस, भुसभुशीत माती, कोसळणारे दगड यामुळे याठिकाणी अशी स्थिती निर्माण होते असे अधिकार्यांचे म्हणणे आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत त्यावर कायमचा उपाय केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल
यंदाच्या हंगामात पाऊस बर्यापैकी झाल्याने यावर्षी चांगले पीक येण्याचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे शेतकरीही समाधानी होते, परंतु गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्याचे कृषी संचालक सतीश तेंडुलकर यांनी सांगितले. गेले दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शेतामध्ये पाणी तुडुंब भरलेले नाही. त्यामुळे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. परंतु पुढील दोन दिवस पाऊस चालू राहिल्यास शेतीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. या हंगामात शेतीला रोग झाल्याच्या तक्रारी आल्या नव्हत्या. त्यामुळे पाऊस कमी व्हावा यासाठी शेतकरी प्रार्थना करीत आहेत. यावर्षी लागवड करण्याचे प्रमाणही वाढले असून एकूण सुमारे ३० हजार शेती लागवडीखाली आणली आहे. सरकारने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळी उपकरणे व खते खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने त्याचा शेती उत्पादन वाढविण्यास बरीच मदत झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसाचा सुपारीच्या उत्पादनावर बराच परिणाम झालेला असून कुळागरात सुपारी मोठ्या प्रमाणात गळू लागल्याच्या तक्रारी येत असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे डोंगरळ भागातील मिरचीच्या उत्पादनावरही या मुसळधार पावसाचा परिणाम झाला आहे.