काल म्हाऊस व केरी पंचायतीतर्फे घेण्यास आलेल्या पत्रकार परिषदेत सत्तरीत व्याघ्रक्षेत्रास विरोध व्यक्त करण्यात आला. व्याघ्रक्षेत्रांची अधिसूचना काढण्यापूर्वी नागरिकांचे म्हणणे विचारात घ्या अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
केंद्र सरकारने व्याघ्र क्षेत्रासाठी राज्य सरकाराकडे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. त्यानुसार राज्य सरकार सत्तरीतील व्याघ्रक्षेत्राचा प्रस्ताव पाठविणार आहे. त्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेला म्हाऊस सरपंच दत्ता गावस, केरी सरपंच जिवबाराव राणे, म्हाऊस पंच सदस्य विठोबा सावंत, तुकाराम गावकर, वाटु गावकर व पांडुरंग सावंत यांची उपस्थिती होती.
राज्य सरकार प्रस्ताव पाठविताना नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे कारण यापूर्वी अभयारण्याचा प्रस्ताव पाठविताना नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही. त्यामुळे त्याचा प्रभाव सत्तरीतील २७ गावांवर झाला आहे. अभायारण्याच्यावेळी लोकांना विश्वासात न घेण्याची चूक परत या सरकारने करू नये, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. पत्रकार परिषदेत माहिती देताना पुढे म्हणाले की, व्याघ्रक्षेत्राचा प्रभाव २७ गावांवर होणार असून अनेक शेतकर्यांना उत्पन्नाची नुकसानी सोसावी लागणार. येणार्या दिवसांत बफर झोन विषयी निर्णय होणार आहे. बफर झोन सुद्धा ठरविताना पंचायतीना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा कारण बफर पंचायती अनभिज्ञच असून त्याविषयी नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज आहे. बफर झोन व व्याघ्रक्षेत्र याबद्दल निर्णय घेण्यासाठी नागरिकांत जागृती करण्याची गरज असून पंचायतीत त्याविषयी माहिती देणारे कार्यक्रम घ्यावे त्यामुळे मतभेद दूर होतील. तसेच झिरो बफर झोन करण्याची मागणी करण्यात आली आहे.