पावलोपावली अध्ययन

0
185
  • प्रा. प्रदीप मसुरकर
    (मुख्याध्यापक, गिरी सरकारी हायस्कूल)

घर, बाहेरील वातावरण, घरची मंडळी, मित्रमंडळी, आजुबाजूच्या घडणार्‍या घटना अशा प्रत्येकातून व्यक्ती शिकत असते व अध्ययन घडत असते.
गरज आहे योग्य निरीक्षणाची, ऐकण्याची, अनुभव घेण्याची व सकारात्मक दृष्टी ठेवण्याची, नवीन शिकण्याची…

‘अध्ययन’ हा शब्द डोळ्यासमोर आला की आपल्या डोळ्यासमोर शाळा, कॉलेज येतात. प्रत्येकाला वाटते की अध्ययनाचे धडे हे शाळेतूनच सुरू होतात. पण बारकाईने पाहिल्यास व अध्ययनाची संकल्पना नीट समजून घेतल्यास असे दिसून येईल की आपल्याला प्रत्येक क्षणी, मग आम्ही कुठेही असू द्या, आपण प्रत्येक क्षणी काहीतरी शिकत असतो. त्याची तीव्रता कमी-अधिक प्रमाणात असते.

सुमित्राने आपल्या पतिराजाना बाजारातून कांदे आणावयास सांगितले. त्यांना ऑफिसला जाण्याची घाई. त्यांनी लगेच मंडईत जाऊन हाताला मिळतील तसे कांदे घेतले व पैसे देऊन ते घरी आले व ‘हे घे कांदे आणले आहेत…’ सुमित्राने ते पाहिले व लागलीच पतीराजावर खेकसली- ‘‘तुम्ही इतके शिकले-सवरलेले, तुम्हाला साधे कांदे नीट आणता येत नाहीत? या एक किलो कांद्यातले अर्धा किलो कुजके आहेत. आता कांद्याचा भाव वाढला आहे आणि तुम्ही पैसे देऊन असे कसे आणलेत?.. याचवेळेस तुमचे असे नाही तर प्रत्येक वेळी भाजी आणता त्यातली अर्धी भाजी खराब…’’ बिचार्‍या नवर्‍याने तिचा सुमनहार (शब्द) घेऊन तो कसाबसा तेथून निसटला. येथे पतीराजांनी योग्य प्रकारे निरीक्षण (पाहणे) न केल्याने त्यांना घरातून बोलणी खावी लागली.

दुसर्‍या खेपेस बाजारात जाताना तेथे बसलेल्या भाजीवाली बाईच्या गोड बोलण्याला न भुलता त्यांनी आपले लक्ष आपण काय घेतो आहोत याकडे पूर्णतः दिले. थोडक्यात पूर्वीच्या कटू अनुभवाने, त्यांच्या वर्तनात योग्य तो बदल दिसून आला.
अध्ययन (लर्निंग) म्हटले की आपल्या वर्तनात होणारा योग्य तो बदल… तो काहीवेळेस सरावाने होतो तर काही वेळेस अनुभवाने होतो. तो बदल जर कायमस्वरुपी असेल तरच आपण अध्ययन घडले असे म्हणतो किंवा आपण काहीतरी शिकलो असे होते.
मी माझ्या खोेलीसमोर असलेल्या ‘निम्बा’च्या झाडाकडे पाहत होतो. ते झाड उंच व हिरव्यागार पानांनी भरलेलं आहे. तेवढ्यात माझ्या सौभाग्यवतीने माझ्यासमोर सकाळचा नाश्ता आणून ठेवला. नाश्ता घेत असता समोरच्या झाडावर तीन कावळे येऊन बसले. मला राहावले नाही. माझ्या समोरचा पोळ्याचा एक तुकडा मी झाडाखाली टाकला. त्यातील एक कावळा खाली उतरला व तो घेऊन परत इतर दोन कावळ्यांकडे गेला. माझी नजर त्यांच्यावरच होती. त्या कावळ्याने त्या पोळ्याचे आणखी दोन तुकडे केले व शेजारी बसलेल्या लहान कावळ्याच्या तोंडात घातले. (थोडक्यात आपली आई जशी मुलांना भरवते त्याप्रमाणे दोन- दोनदा प्रत्येक कावळ्यास (पिलांना) देऊन आपणही थोडा खाल्ला. तेवढ्यात एक चौथा कावळा तेथे आला. ते दृश्य पाहून तर मी आश्‍चर्यचकित झालो. त्याने उरलेला तुकडा त्या कावळ्यास दिला. येथे मला पक्षातील ममता, आईचे प्रेम, एकमेकास वाटून देण्याची पक्षांची प्रवृत्ती (शेअरिंग) दिसून आले. हा ‘गुण’ फार महत्त्वाचा वाटला मला व माझ्या अनुभवात भर पडली. असे बरेचसे पक्षी (सर्व) आपल्या पिलांचे संरक्षण करतात. त्यांना वाढवतात. अशा काही गोष्टी आपल्याला निसर्गातूनच पाहावयास व अनुभवायला मिळतात.

२० वर्षांपूर्वीची एक घटना माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. मी माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलीला घेऊन बागेत गेलो होतो. तेथे ती छानपैकी खेळत होती. तिच्या हाताला एक काडी मिळाली. मी लगेच तिला सांगितले, ‘डोळ्याला लागेल बाळा, टाकून दे खाली’. ‘नाही पप्पा, माझ्या हातात ‘चंदामामा’ आहे’. मी लगेच विचारले, ‘‘तुझ्या हातात तर काडी आहे, चंदामामा कशी म्हणतेस?’ त्या काडीचा आकार अर्धगोलाकृती होता. तिने त्यावेळेस सांगितले, ‘‘पापा चंदामामा लहान लहान होतो तेव्हा असा दिसतो.’’ मी समजलो. याही वयात मुले निरीक्षक असतात. थोडक्यात ‘चंद्राची कोर’ तिला सांगावयाची होती. पालक या नात्याने मी या मुलीस घरात अनुकूल असे वातावरण दिले. आज तीच मुलगी आर्किटेक्चरचा कोर्स पूर्ण करते आहे.
लहान मुले बर्‍याच गोष्टी अनुकरणाने (इमिटेशन) शिकतात. शाळेत जाण्याअगोदर मोबाइलमधल्या बर्‍याचशा गोष्टी त्या मुलांना कळतात व ती हाताळतात. हा आजुबाजूच्या वातावरण, घरच्या वातावरणाचा परिणाम होय. यामधून काही वेळेस योग्य वर्तलबदल घडून येतो. तर काही वेळेस नको तेसुद्धा ती शिकतात. त्यामुळे पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.

पालकांची भाषा हे मुलांशी सुसंवाद साधण्याचे उत्तम साधन असते. जर घरातील मंडळींची भाषा चांगली असेल, चांगला संवाद मुलांशी असेल तर शाळेत जाण्याअगोदर ती बर्‍याच चांगल्या शब्दांचा संच (व्होकॅबुलरी) घेऊन शाळेत प्रवेश करतात. काही वेळेस असेही पाहावयास मिळते की लहान मुलांच्या तोंडात शिवी-गाळी दिसून येतात. हा परिणाम बहुतेक वेळा त्यांच्या घरात बोलल्या जाणार्‍या भाषेवर अवलंबून असतो. मुले ही अनुकरणशील असतात. त्यांचे आईवडिल जसे बोलतात त्याप्रमाणे त्यांच्या भाषेचा विकास होत असतो. त्यावेळेस शिक्षकांनी त्या पालकांना शाळेत बोलवून योग्य मार्गदर्शन केलेले बरे असते. इतर मुलेही एकमेकांशी संवाद करताना नको असलेले शब्द वापरतात. यास घरातील भाषा कारणीभूत असते. भाषा हे अध्ययनाचे माध्यम आहे.

एके दिवशी मी मोटर दुरुस्तीसाठी एका मेकॅनिककडे घेऊन गेलो. त्याला गाडीची तक्रार सांगितली. त्याने आपण स्टार्ट मारून आवाज ऐकला व लगेच गाडीतील बिघाड शोधून काढला व ती गाडी चुटकीसरशी दुरुस्त करून दिली. मी विचारले, ‘‘तू हे शिक्षण कोठे घेतलेस?’’ त्याने उत्तर दिले, ‘‘सर, मी इयत्ता पाचवीतून शाळा सोडली. आज हे मी जे शिकलो ते दुसर्‍या मेकॅनिकच्या हाताखाली काम करून – सरावाने शिकलो. आज माझ्याकडे दररोज २५ ते ३० गाड्या दुरुस्तीसाठी येतात. माझ्या हाताखाली आणखी दोन मुले शिकतात. अध्ययन हे सरावाने आत्मसात करता येते. कोणतेही कौशल्य शिकण्यासाठी आवड व सराव यांची गरज असते. त्या मेकॅनिकमध्ये मला एका बीई पदवीधरामध्ये असणारा किंवा त्याच्यापेक्षा जास्त आत्मविश्‍वास दिसून आला. जीवन जगण्याची कला त्याने आत्मसात केली होती कौशल्ये आत्मसात करून!
संतवाणी व समाज ः-
संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर, प.पू. कलावती आई असे बरेचसे संत आमच्या भारतभूमीत जन्मास आले. त्यांची ग्रंथसंपदाही भरपूर आहे. कित्येक जणांचे मोडकळीस येणारे संसार त्यांनी आपल्या बोधवाणीतून सावरले व समाज सुधारण्याचे काम केले. त्या वेळेस त्यांची भजने आम्ही एकाग्रतेने व आवडीने म्हटली तर मानसिक समाधान लाभते. घरातील वातावरण आनंदी होते. ही एक शक्ती त्यांच्या वाणीमध्ये, ग्रंथांमध्ये दिसून येते. आज आपल्याला कोणी विचारले की संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, पू. कलावती आई कोणत्या शाळेत वा कॉलेजमध्ये गेले होते, असे विचारले तर कोणासही सांगता येत नाही. कारण त्याचा कोठेही उल्लेख सापडत नाही. पण त्यांनी केलेल्या ग्रंथरचनेवर कॉलेजमध्ये पीएच.डी. कित्येक विद्यार्थी करीत आहेत. सद्ग्रंथ वाचनाने आपल्याही वृत्तीत, वागण्यात व आचरणात बदल घडतो. कित्येक लोक व्यसनातून सुटले व चांगले नागरिक बनले. येथेसुद्धा अध्ययन होत असते.
ज्या व्यक्तीच्या बोलण्याने, बोधाने, मार्गदर्शनाने समाजातील व्यक्तींवर चांगला परिणाम घडतो, हे सर्वात उत्कृष्ट अध्ययन होय. उदा. ‘संत गाडगे बाबा’नी स्वच्छता, आरोग्य व अध्यात्म सहजपणे लोकांना आपल्या आचरणातून पटवून दिले.
व्यवहार व अध्ययन ः-
एकदा बसमधून प्रवास करतानाची गोष्ट. बसमध्ये बरीच गर्दी होती. कंडक्टर पुढच्या लोकांना मागे व मागच्या लोकांना पुढे ढकलत होता. मला कशीबशी जागा मिळाली. एका व्यक्तीने कंडक्टरला १०० रुपये दिले व तिकिट होते १५ रुपये. कंडक्टरने त्यास ३५ रुपये दिले. गडबडीत त्या व्यक्तीने ते खिशात घातले. उतरताना सहजच त्याने पुन्हा आपल्या पैशांकडे बघितले व कंडक्टरला सांगितले की मला ८५ रुपये द्यायचे असून तुम्ही फक्त ३५ रुपयेच दिले. तो ऐकावयास तयार नाही. कंडक्टर म्हणाला, ‘तू मला ५० च रुपये दिले. खूप वेळ बाचाबाची झाली. पण शेवटपर्यंत त्याने उरलेले पैसे त्यास दिले नाही. येथे कोणताही व्यवहार करताना क्रम पूर्ण होणे गरजेचे असते. लगेच त्याने पैशाची मागणी केली असती तर त्यास त्याने दिले असते. कोणताही व्यवहार घाई-गडबडीत केला तर नुकसान होते. कित्येक दुकानदारही आमचे लक्ष नाही असे पाहतात आणि आम्ही फसवले जातो व या अनुभवातून दुसर्‍या वेळी सावरल्यास… योग्य अध्ययन झाले म्हणावयास हरकत नाही.
कित्येक वेळेस आम्ही ब्रेड विकत घेतो, पण जर त्यावरील तारीख लक्षात घेतली नाही तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा संभव असतो.
म्हणून औषधे, दैनंदिन वस्तू खरेदी करताना योग्य ‘उत्पादन दिनांक’ व ‘एक्सपायरी दिनांक’ पाहणे गरजेचे असते.
निसर्ग हा उत्कृष्ट गुरु ः-
निसर्गातील प्रत्येक घटनेचे बारकाईने निरीक्षण केल्यास, ती विशिष्ट क्रमाने होत असते, असे आपल्याला दिसेल. उदा. मूल जन्माला आल्यावर त्याचे बोलणे, चालणे, वाढ, विकास यामध्ये योग्य प्रकारे क्रम दिसून येतो. भाषा विकास, शारीरिक विकास, बौद्धिक विकास किंवा इतर कोणताही विकास असूद्या यामध्ये विशिष्ट क्रम सापडतो.
सुरुवातीला मूल रडते, ही भाषा आईला योग्य प्रकारे कळते. त्याला भूक लागली तरी रडते, बरे वाटत नसेल तरीही रडते, झोपेला आले की रडते व थोड्या दिवसांनी विशिष्ट आवाज काढते. मग अ.. आ…. आई, हळुहळू बा- बा. मला दे… म्हणावयास शिकते. एक वर्षानंतर शब्दसंचय आणखी वाढतो. अशाप्रकारे क्रम दिसून येतो. नंतर सफाईने बोलावयास लागते.
कूस बदलणे, पालथे पडणे, पुढे सरकणे, रांगणे, बसणे, उभे राहणे, चालणे येथेही क्रम दिसतो व नकळत अध्ययन नैसर्गिकरीत्या परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करत असते.
पाऊस पडणे – येथेही क्रम असतो. समुद्र = वाफ = ढग = पाऊस (पाणी)…
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.. यांमध्येही क्रम दिसून येतो. ही आपोआप आम्ही नकळत आत्मसात करत असतो व समजून घेत असतो.
आमच्या दैनंदिन जीवनातील कित्येक कृती या क्रमाने चालतात व आम्ही पावलोपावली शिकत असतो.

आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती क्रमाने होत असते. उदा…..
१. अंघोळ करणे, २. जेवणे, ३. जेवणाच्या ताटातील पदार्थांची रचना- येथेही क्रम दिसतो. आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीतून, कृतीतून आपण काहीतरी नवीन शिकत असतो. कोणाच्या आचरणातून, कोणाच्या कृतीतून, संभाषणातून, हावभाव, बोलण्यातून, चालण्यातून आम्ही नकळत बर्‍याच गोष्टी आत्मसात करतो. आमच्या ज्ञानात भर घालतो व त्याचा परिणाम योग्य तो आमच्या वागण्यात, वर्तनात, कृतीत, बोलण्यात, कौशल्यात होत असतो. अध्ययन घडत असते. चेतकाची म्हणजे स्टिम्युलसची तीव्रता जितकी जास्त त्याप्रमाणे अवधान खेचले जाते. अवधानामुळे आवड निर्माण होते… ती आपल्या वर्तनास प्रेरित करते, सराव घडतो, आत्मविश्‍वास वाढतो, नवीन अनुभवात भर पडते व अध्ययन घडते.

अध्ययन हे केवळ शाळेत घडते असे नाही. निसर्ग… सभोवतालचे वातावरण हे एक उत्कृष्ट चेतक (स्टिम्युलस) म्हणून आपल्यासमोर उभे राहते. ते बल प्रेरित करते व आम्ही बर्‍याच गोष्टी पावलोपावली शिकतो.
घर, बाहेरील वातावरण, घरची मंडळी, मित्रमंडळी, आजुबाजूच्या घडणार्‍या घटना अशा प्रत्येकातून व्यक्ती शिकत असते व अध्ययन घडत असते.
गरज आहे योग्य निरीक्षणाची, ऐकण्याची, अनुभव घेण्याची व सकारात्मक दृष्टी ठेवण्याची, नवीन शिकण्याची… तर आपल्याला पावलोपावली अध्ययनाची अनुभूती मिळेल.