बालसंगोपन ः एक कला भाग – २

0
213
  •  अंजली वि. मुतालिक

मूल बोलण्यात मुख्य वाटा आईचा असतो. ती किंवा घरातील सर्व मंडळी जर बोलकी असतील, त्याच्या कानावर जर सारखे शब्द पडत असतील तर त्या घरातील मुलं पटकन् बोलतात. मूल बोलणार्‍यांच्या ओठांच्या हालचाली टिपत असते. त्यावर तसे अनुकरण करते.

वेगवेगळ्या वयोगटासाठी एकच ढाचा, साचा, नियम सर्व ठिकाणी लागू होत नाही. प्रत्येक मूल भिन्न असते. प्रत्येकाचा पिंड निराळा असतो. हाही विचार केला तर योग्य दिशेने जाता येईल…
मेंदू आणि हृदय –
लहान मुलं हृदयाचा वापर अधिक करतात. पटकन् कुणावरही विश्‍वास ठेवतात. दुसर्‍यांचे अनुकरण करतात. घरातल्या सर्वांची चप्पल ते ओळखतात. कारण ती त्याने लहानपणी चाखून पाहिलेली तर असतेच आणि मोठी माणसे तीच चप्पल घालून याला फिरायला नेत असतात.

एखादं बीजच जर चांगलं असेल तर त्यापासून येणारं झाड उत्तम असतं. तसंच आई-बाबांचे जनुके (जीन्स) मुलं घेऊन येत असतात. यानुसार स्वभाव घडतो. मेंदूची वाढ जसजशी व्हायला लागते तसतसे बाळ छोटे छोटे निर्णय घ्यायला लागते. यात गर्भसंस्काराला महत्त्व आहेच. लहान मुलं हृदयाचा वापर अधिक तर मेंदूचा वापर कमी करतात. व्यक्ती मेंदू अधिक वापरतील तर हृदयाचा वापर- भावनिकता कमी असते.
बोलणे –
‘‘आमचा विराज दोन वर्षांचा झालाय, तरीही बोलत नाही कसा?’’
‘‘बघा हं, लवकर स्पेशालिस्टना दाखवा. आमची रीया आठव्या महिन्याची असल्यापासून ‘पाणी’ शब्दही नीट उच्चारते.’’
हे ऐकून विराजच्या घरी चिंता वाढते. पुढच्या महिन्यात तो फक्त ‘आ ऽऽ ठ’ असं काहीसं बोलू लागतो पण तो का बोलत नाही अजून म्हणून पालक विराजला घेऊन डॉक्टरांकडे जातात.
हा हसरा बालक कृतीतून, हालचालीतून, हावभावातून बराच व्यक्त होत असतो. डॉक्टरनी त्याला ‘तुझं नाव काय?’ असं लाडिकपणे विचारलं तर डोळे मिटून फक्त ‘आठ’ असं काहीसं उच्चारतो.

कोणतीही औषधे न देता डॉक्टर त्याच्या हालचालीवरून, ‘‘बोलेल तो! टेन्शन नका घेऊ. फक्त नंतर खूप बोलतो असं सांगायला याच’’ आणि होतंही अगदी तसंच!
मूल बोलण्यात मुख्य वाटा आईचा असतो. ती किंवा घरातील सर्व मंडळी जर बोलकी असतील, त्याच्या कानावर जर सारखे शब्द पडत असतील तर त्या घरातील मुलं पटकन् बोलतात. मूल बोलणार्‍यांच्या ओठांच्या हालचाली टिपत असते. त्यावर तसे अनुकरण करते. म्हणून जी लोकं बाळाशी खूप बोलतील, त्यांच्या घरातील बाळं पटकन् बोलती होतील. घरात अजून लहान मुलं असतील तर अधिक पटकन् बोलतील.
बाळाच्या आवडीनिवडी –
पाल्याच्या आवडीनिवडी हळूहळू पालकांच्याच लक्षात येतात. छोट्या मुलींना बाहुल्या, बार्बी तर मुलग्यांना सगळ्या गाड्यांचं निसर्गतः आकर्षण असतं. रंगांचं आकर्षण असतं. चित्रांचं असतं. अशी भरपूर चित्रे असलेली छोटीशी गुळगुळीत पानांची पुस्तिका घरी हॉलमध्ये, किचनमध्ये ठेवून द्या. कधीतरी तुम्ही ती नीट पहा, वाचा. त्यातील एखादे चित्र उघडा, ‘‘अरे, मस्त आहे ना ही उंटाची गाडी!’’ असे आश्‍चर्याने पाल्यासमोर म्हणा, तुम्ही पुस्तक बाजुला ठेवा. तुमचे काम करा. एक-दोन दिवसात दुसरी घोड्याची गाडी कशी दिसतेय हे तुमचं मूलच तुम्हाला दाखवेल. येस… आता तुम्ही योग्य मार्गावर नेत आहात आपल्या बाळाला!

मग त्या त्या विषयावर सर्वांनी एखादा किस्सा, चर्चा यातून त्या पुस्तकात अजून काय खजाना लपलाय हे तुम्ही तुमच्या परीने तपासा अन् भावी वाचक बोलण्यातूनच घडवा. ‘अमुक अमुक वाच’ असं कधीच सांगू नका. तुम्ही वाचून त्यावर गप्पा मारा. मग तुला कसं समजलं की मग पुस्तकात वाचलं हे सांगा.
प्रत्येक घरात रेसीपीचं बुक असतं. भले तुम्ही निष्णात सुगरण आहात. तरीही आज साधी भजी करतानाही मुद्दाम पुस्तकात पाहून करा. भजीच्या वासाने छोटी पावले आपोआप किचनकडे वळतीलच. पण पुढच्या वेळी ‘‘आई, आता हे असलं दिसतंय हे कर ना’’ असं पुस्तकातूनच मुलं तुम्हाला सांगतील. ई बुक्स हाही एक उत्तम पर्याय आहे. पण यात मोबाइल, ईयर फोनमुळे प्रत्येकवेळी काय घडतंय हे तपासत बसावे लागते.

मुले आणि लैंगिकता –
‘‘आमच्यावेळी असं नव्हतं हो!’’ सगळं दबक्या आवाजात बोलायचं, एमसी म्हणजे काय मला तर दहावीत समजलंय, या कार्ट्यांना आतापासून सांगायचं हे सगळं? आणि वर या विषयावर शालेय अभ्यासक्रम आणि पुस्तक? राम राम राम!’’
पूर्वीच्या तुलनेत रजोदर्शनाचा, एमसीचा कालखंडही बदलत चालला आहे. सध्या मुलींना १२- १३व्या वर्षी रजोदर्शन होते. मुलांचा आवाज बदलण्याचा कालावधी लवकर झाल्याचा दिसून येतो.

मुलं जे जे प्रश्‍न विचारतील त्या त्या वयाच्या मुलांनुसार त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा किंवा समुपदेशन केले जाते. अगदी लहान वयात चुकीच्या सवयी, हस्तमैथुन, इ. घटना समजल्या तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. मुलांचा रिकामा वेळ मैदानात, त्यांच्या आवडत्या खेळात, कामात घालवण्याचा प्रयत्न करावा.
किशोरवयीन मुला-मुलींना हल्ली योग्य मार्गदर्शन वर्ग उपलब्ध असतात. शालेय अभ्यासक्रमातही इयत्ता ९ वीत काही पायाभूत भाग यामध्ये शाळेत होतच असतो. संवादाद्वारे पाल्याच्या मनातील अढी उकलण्याचा प्रयत्न व्हावा. यातून सुदृढ भावी नागरिक घडतीलच. शिवाय कुठल्याशा किरकोळ कारणावरून होणार्‍या किशोरवयीन कळ्या स्वतःहून आपलं आयुष्य संपवणार नाहीत यासाठी नक्की प्रयत्नशील राहूया.

मैदान आणि उर्जा –
घरासमोरील अंगण, मैदान सध्या बहिर्वक्र भिंग सोबत घेऊन शोधावी लागतील. मोकळ्या हवेत, निसर्गात प्रत्येकाने दर दिवशी जर घाम शरीराबाहेर घालवला तर उद्या देशाचा भावी नागरिक सुदृढच असेल असे आपले पंतप्रधान २०१७च्या शिक्षक दिनीच बोलले आहेत. यावरून मैदानांचं महत्त्वही आपल्या लक्षात येईल. प्रत्येक मूल हे एक सुप्त उर्जेच्या रूपात असते. ही उर्जा सकारात्मक कार्यात रुपांतरित केली जावी.
विज्ञानातील उर्जा अक्षय्यतेचा नियम आपण जाणतो. ‘एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड बट् इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू अनादर’ अशा प्रकारे स्थिर उर्जेचे योग्य विधायक उर्जेत रुपांतर व्हावे.

मैदान म्हणजे फक्त क्रिकेट असे बरेचजण विचार करतात. खो-खो; कबड्डी तसेच इतरही बरेच पारंपरिक साधनविरहित खेळ खेळले असता सहभावना वाढीस लागते. मुलांमध्ये शेअरिंगची, वाटून घेण्याची भावना येते. सहकार्याची भावना वाढीस लागते. निकोप, निखळ मैत्री ही सुसंवादाचा पाया आहे. तो याच मार्गाने भक्कम करता येईल. याच्या अनुषंगाने सामाजिक तसेच भावनिक विकास साधता येईल. उद्याच्या सुसंस्कृत पिढीच्या ओठांवर देशप्रेमाची गीते येतील. राष्ट्राप्रती भक्तिभाववाढीस चालना मिळेल.