>> लखनऊमध्ये पंतप्रधान मोदींचा सवाल
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशभरात विरोध होत असताना केलेल्या आंदोलनात हिंसाचार झाला. या हिंसाचार करणार्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनात हिंसा आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणार्यांना खडे बोल सुनावत हा हिंसाचाराचा मार्ग योग्य होता का असा सवाल केला आहे.
काल बुधवारी लखनऊमध्ये अटलबिहारी वाजपेयी मेडिकल विद्यापीठाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राम मंदिर, कलम ३७०चा उल्लेख केला. उत्तर प्रदेशात नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनात हिंसाचार घडवला, सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. यावेळी अवलंबलेला हा मार्ग योग्य होता का? असा प्रश्न स्वतःलाच विचारावा. त्यांची कृती योग्य होती का? असा सवाल केला आहे. यावेळी जी जाळपोळ करण्यात आली, जे उद्ध्वस्त केले ते त्यांच्या मुलाबाळांच्या उपयोगी पडले नसते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हिंसक आंदोलनात काही नागरिकांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झाले. यात पोलिसही जखमी झाले. त्यांच्या कुटुंबीयांचा कधी विचार केला का? चांगले रस्ते, दळणवळण सुविधा हा नागरिकांचा अधिकार आहे, ते सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. हक्क आणि जबाबदारीची जाणीव आपल्याला ठेवायला हवी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सीसीएच्या पाठिंब्यासाठी अमेरिकेत भारतीयांची रॅली
दरम्यान, देशभरात सध्या सीसीएवरून (सुधारित नागरिकत्व कायदा) वादंग सुरू आहे, शिवाय एनपीआरमुळे (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) एनआरसीचा (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) मुद्दा देखील अधिकच चर्चेत आल्याचे दिसत आहे. मात्र, दुसरीकडे अमेरिकेत सीएए व एनआरसीच्या समर्थनार्थ तेथील भारतीयांकडून रॅलींचे आयोजन केले जात आहे. या कायद्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी अमेरिकेतील भारतीय रस्त्यांवर उतरून एकजुट दाखवत आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल असलेल्या अफवा व चुकीची माहिती दूर करणे हा तेथील भारतीयांचा रॅली काढण्या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेतील भारतीयांनी सीएटल, ऑस्टीन व ह्युस्टन, डब्लिन इत्यादी ठिकाणी या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढलेली आहे. तर, शिकागो, सॅन फ्रॅन्सिस्को, न्युयॉर्क सिटी, वॉशिंग्टन डीसी, अटलांटा, सॅनजोस व अन्य ठिकाणी देखील आगामी काही दिवसात रॅला काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे. तसेच, रॅली आयोजकाकडून हे देखील सांगण्यात आले की, आम्ही सीएए आणि एनआरसीबद्दल इस्लामिक व डाव्या विचार सरणीच्या संघटनामध्ये असलेला संभ्रम व भीती दूर करण्यासाठी या रॅली काढत आहोत.