गोवा फलोत्पादन मंडळातर्फे ९० रु.नी कांदा विक्री सुरू

0
209

>> खुल्या मार्केटमध्ये दरात घट

गोवा फलोत्पादन महामंडळाने अखेर काल सोमवार दि. ९ डिसेंबरपासून ९० रुपये प्रति किलो दराने कांद्याच्या विक्रीला सुरुवात करून कांद्यांच्या दरवाढीमुळे त्रस्त बनलेल्या नागरिकांना दिलासा दिला. दरम्यान, गोवा फलोत्पादन महामंडळाने कमी दरात कांद्याची विक्री सुरू करताच खुल्या मार्केटमधील कांद्यांच्या दरात ३० ते ४० रुपये घट झाली आहे.

राज्यातील फलोत्पादन महामंडळाच्या कांद्यांच्या विक्री दरात १२९ रुपये प्रति किलोपर्यंत वाढ झाली होती. मार्केटिंग फेडरेशनच्या भाजी विभागात कांदा १४० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. तर, खुल्या मार्केटमध्ये कांद्याची १६०-१७० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात होती. फलोत्पादन महामंडळाकडे कांदा खरेदीसाठी निधीची कमतरता असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर फलोत्पादन महामंडळाने नाशिक भागातून १७ टन कांद्याची थेट खरेदी केली आहे. तसेच ८ टन कांदा पुरवठादारांकडून खरेदी केला आहे.

मार्केटमध्ये दरात घट
फलोत्पादन मंडळाने कांद्यांचा दर १०० रुपयांपेक्षा खाली आणण्याच्या दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केल्याचे मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण झांट्ये यांनी सांगितले. फलोत्पादक मंडळाने कमी दरात कांद्याची विक्री करण्यास सुरुवात केल्याने खुल्या मार्केटमध्ये कांद्याच्या दरात घट झाली आहे. खुल्या मार्केटमध्ये १३० ते १४० रुपये प्रति किलो दराने कांदा विकला जात आहे.