पद्मश्री सुरेश आमोणकर यांना अखेरचा निरोप

0
176

पद्मश्री सुरेश गुंडू आमोणकर यांना काल सोमवारी मुख्यमंत्री, मंत्रिगण, चाहते, विद्यार्थी आणि अनेक प्रतिष्ठिक नागरिकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. म्हापसा येथील जी. एस्. आमोणकर विद्यालयाच्या सभागृहात पद्मश्री आमोणकर यांचे पार्थिव लोकांच्या दर्शनासाठी ठेवले होते.

यावेळी पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर, माजी पर्यटनमंत्री तथा थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, एलिना साल्ढाणा, माजी आमदार आलेक्स सिक्वेरा, म्हापशाचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, नगरसेवक सुधीर कांदोळकर, संदीप फळारी, तुषार टोपले, राजसिंह राणे, सुशांत हरमलकर, संजय मिशाळ तसेच साहित्यिक दिलीप बोरकर, महाबळेश्‍वर सैल, उद्योजक श्रीनिवास धेंपो गुरुदत्त भक्ता, जी. एस. आमोणकर विद्यालय ट्रस्टीचे उजगांवकर, डॉ. गुरुदास नाटेकर, वाहतूक खात्याचे उपसंचालक मेघःश्याम पिळर्णकर, मिनिश तार तसेच आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी वर्ग, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच त्यांचे नातेवाईक व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हापशाचे आमदार ज्योसुआ डिसोझा यांनी आपल्या मातोश्रींसमवेत पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी आमोणकर यांचे पुत्र सिध्दार्थ, राज व गौतम, सुना व नातवंडे उपस्थित होते. तसेच प्रा. सुभाष वेलींगकर, दौलत हवालदार, पेडणेचे माजी नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभू, भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, ज्येष्ठ पत्रकार राजू नायक, संदेश प्रभूदेसाई व इतरही उपस्थित होते. आमोणकर यांचे पार्थिव काल सकाळी १० वा.च्या सुमारास इस्पितळातून विद्यालयाच्या सभागृहात आणण्यात आले व संध्याकाळी ४ वा.पर्यंत लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. नंतर आमोणकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली.

देहदानासाठी पार्थिव बांबोळीत
पद्मश्री आमोणकर यांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचे पार्थिव बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात नेण्यात आले. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते.