जुआननच्या गोलमुळे ओदिशाला नमवित बेंगळुरुची आघाडी

0
109

स्पेनचा ३२ वर्षांचा बचावपटू जुआननने पूर्वाधात नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर बेंगळुरू एफसीने ओदिशा एफसी संघावर १-० अशी निसटती मात करीत हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात काल पूर्ण गुणांची कमाई केली. या विजयाबरोबरच त्यांनी गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थानही मिळविले आहे.
कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या बेंगळुरूने विजयाबरोबरच अपराजित घोडदौडही राखली.

बेंगळुरूला मोसमाच्या प्रारंभी सलग तीन बरोबरी पत्कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर काहीसे दडपण आले होते, पण मागील चार सामन्यांत त्यांनी तीन विजय मिळविले आहेत. बेंगळूरूचा हा एकूण सात सामन्यांतील तिसरा विजय असून चार बरोबरींसह त्यांचे १३ गुण झाले. एटीके आणि जमशेदपूर (६ सामन्यांतून ११) यांना मागे टाकत बेंगळुरूने आघाडी घेतली. ओदिशाला सात लढतींत तिसरा पराभव पत्करावा लागला. एक विजय आणि तीन बरोबरींसह त्यांचे सहा गुण आणि सहावे स्थान कायम राहिले.

ओदिशाने सुरवात समाधानकारक केली, पण खाते उघडण्याची शर्यत बेंगळुरूने जिंकली. ३६व्या मिनिटाला डिमास डेल्गाडोचा क्रॉस शॉट निशू कुमार याच्यापाशी गेला. त्यातून एरीक पार्टालू याला चेंडू मिळाला. त्याने हेडींगवर चेंडू पेनल्टी क्षेत्रात मारला. मग जुआनन याचा फटका तितकासा सफाईदार असूनही चेंडू ओदिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला अडविता येणार नाही इतक्या लांबून नेटमध्ये गेला.
पूर्वार्धात १५व्या मिनिटाला ओदीशाने अप्रतिम चाल रचली होती. विनीत रायने नंदकुमार शेखरला लांबून अचूक पास दिला. त्यानंतर शेखरने उजव्या पायाने मारलेला ताकदवान फटका बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने झेपावत थोपविला.
२३व्या मिनिटाला बेंगळुरूच्या हरमनज्योत खाब्राने उजव्या बाजूने प्रतिस्पर्ध्याचा बचाव भेदत आगेकूच केली. त्याने सुनील छेत्रीच्या दिशेने चेंडू मारला, पण ओदिशाच्या डियावँडौ डिगाग्ने याने छेत्रीला शह दिला. त्याने छेत्रीपेक्षा वेगाने धावत दडपण निर्माण केले. छेत्रीने फटका मारला, पण डियाग्ने याने तो चपळाईने रोखला.
३१व्या मिनिटाला ओदीशाच्या झिस्को हर्नांडेझने आगेकूच केली. त्याने नारायण दासला डावीकडे पास दिला. नारायणने घोडदौड करीत फटका मारला, पण चेंडू थेट गुरप्रीतच्या हातात गेला.

दुसर्‍या सत्रात शेखरने डावीकडून मुसंडी मारली. त्याने नेटच्या दिशेने चेंडू मारला, पण त्यावेळी हेडिंग करू शकेल असा कुणीही सहकारी योग्य जागी नव्हता. ५२व्या मिनिटाला निशूने डावीकडे चेंडू मिळताच आगेकूच केली. ओदिशाच्या शुभम सारंगीला हुलकावणी देत त्याने उजवीकडे छेत्रीला पास दिला, पण छेत्रीचा फटका नेटवरून बाहेर गेला.

अंतिम टप्यात दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले, पण अर्शदीपने बेंगळुरूचे, तर गुरप्रीतने ओदीशाचे प्रयत्न फोल ठरविले. दोन मिनिटे बाकी असताना ओदिशाच्या डॅनीएल लालहह्लीम्पुईया याचे प्रयत्न गुरप्रीतने अपयशी ठरविले.