आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट पुन्हा नंबर १

0
129

कोलकातात झालेल्या बांगालदेशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात केलेल्या १३६ धावांच्या शतकी खेळीचा फायदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला झाला असून त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळविले आहे.

शतकामुळे विराटचे ९२८ गुण झाले असून तो अव्वल स्थानी विराजमान झालेला आहे. अव्वल स्थानी असलेला ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ दुसर्‍या स्थानी घसरला आहे. पाकविरुद्धच्या दुसर्‍या लढतीत त्याला पहिल्या डावात ४ व दुसर्‍या डावात ३६ धावांचीच खेळी करता आली होती. त्याचा फटका त्याला बसला आणि तो ९३१वरून ९२३ गुणांवर खाली आला. भारताच्या चेतेश्वर पुजाराने आपले चौथे स्थान राखले आहे. तर अजिंक्य रहाणे हा सहाव्या स्थानी असलेला अव्वल दहातील आणखी एक भारतीय फलंदाज आहे. त्याला एका स्थानचा फटका बसला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत त्रिशतकी खेळी केलेल्या डेव्हिड वॉर्नरला १२ गुणांचा लाभ झाला असून त्याने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ८७७ गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे.पहिल्या डावातील शतकामुळे मार्नस लाबुशानेलाही मोठा फायदा झाला असून तो ७३१ गुणांसह अव्वल दहात आठव्या स्थानी पोहोचला आहे.

गोलंदाजीत मोहम्मद शमी अव्वल दहात
दरम्यान, गोलंदाजीत भारताच्या मोहम्मद शमीने बांगलादेेशविरुद्धच्या शानदार कामगिरीमुळे अव्वल दहात स्थान मिळविले आहे. तो ७७१ गुणांसह दहाव्या स्थानी आहे. बांगालदेशविरुद्धच्या मालिकेला दुखापतीमुळे मुकावे लागलेला जसप्रीत बुमराह ७९४ गुणांसह पाचव्या स्थानी आहेे. तर स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ७७२ गुणांसह नवव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियन द्रुतगती गोलंदाज पॅट कमिन्सने ९०० गुणांसह आपले अव्वल स्थान राखले आहे.