>> रोज एक पोस्टर प्रकाशित करणार
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या म्हादई जागोर आंदोलनाला अधिक चालना देण्याचा भाग म्हणून डिजिटल जनजागृती मोहीम कालपासून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती प्रवक्ते उर्ङ्गान मुल्ला यांनी काल दिली.
केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने कर्नाटकाच्या कळसा भांडुरा प्रकल्पाला दिलेला पर्यावरण दाखला रद्द करावा यासाठी आंदोलन प्रखर करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले आणखीन एक पाऊल आहे. डिजिटल जनजागृतीच्या (कॅम्पेन) माध्यमातून प्रत्येक दिवशी एक पोस्टर प्रकाशित करण्यात येणार असून, गोव्यातील बारा तालुक्यांच्या नावाने बारा पोस्टर समाज माध्यमांवर टाकण्यात येणार आहेत. सदर पोस्टरवर गोव्यातील भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराबद्दल भाष्य केले जाणार असून, म्हादई प्रश्नावर आपली खुर्ची सांभाळण्यासाठी गप्प बसलेल्या मंत्र्यांच्या भानगडी बाहेर काढण्यात येणार आहेत, असे प्रवक्ते मुल्ला यांनी सांगितले.
गोव्यातील लोकांनी म्हादई प्रश्नावर संवेदनशील बनणे गरजेचे असून, म्हादई प्रश्नी भाजपच्या धोरणाविरोधात राग व संताप व्यक्त करणे गरजेचे आहे. कर्नाटकाचा डाव यशस्वी झाल्यास गोव्याची मांडवी नदी आटेल व संपूर्ण गोवाच वाळवंट बनणार आहे याची जाणीव लोकांनी ठेवणे गरजेचे आहे. कॉंग्रेस पक्ष म्हादई प्रश्नावर जनआंदोलनाचे समर्थपणे नेतृत्व करणार असून, म्हादईचे पाणी वळविण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी आंदोलन केले जाणार असल्याचे मुल्ला म्हणाले.