जानेवारीपासून केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी ः गुदिन्हो

0
145

राज्यात नवीन केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी जानेवारी २०२० पासून केली जाणार आहे. वाहतूक नियमभंग प्रकरणी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईसाठी गुजरात मॉडेलचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
दारूच्या नशेत वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालविणे आदी वाहतूक नियम भंगाच्या दंडात कोणतीही कपात केली जाणार नाही. तर, वाहतूक नियम भंगाच्या काही दंडात निश्‍चित थोडी कपात करण्यावर विचारविनिमय केला जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. कायदा विभागाचा सल्ला घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
राज्यातील रस्ते खराब असल्याने नवीन मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली होती. राज्यातील रस्त्यांवरील खड्‌ड्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. डिसेंबरपर्यंत सर्व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. नवीन मोटर वाहन कायद्याबाबत जनजागृतीसाठी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

नव्या क्रमांकपट्टीत चिप्स नाहीत
राज्यातील नव्याने बसविण्यात येत असलेल्या उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीमध्ये वाहनाची माहिती असलेल्या चिप्सचा समावेश नाही. तर, होलोग्राम आणि इतर सुरक्षात्मक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

राज्यातील वाहनांना उच्च सुरक्षा पट्टी बसविण्याचे काम ऑक्टोबर २०१९ पासून सुरू करण्यात आले आहे. अडीच ते तीन वर्षात सर्व वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. आत्तापर्यंत २९ हजार वाहनांना नवीन उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी बसविण्यात आली आहे. नवीन वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी बसविताना नियमांचे पालन योग्य पद्धतीने न करणार्‍या वाहन विक्रेत्यांना समज देण्याची सूचना वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांना करण्यात आली आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

पणजी, म्हापसा, डिचोली, पेडणे, मडगाव, केपे, फोंडा, धारबांदोडा, वास्को आणि काणकोण नवीन क्रमांकपट्टी बसविण्यासाठी सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. ऑल लाइन पद्धतीने शुल्क स्वीकारले जात आहे. तसेच साहाय्यक वाहतूक अधिकारी कार्यालयात शुल्क स्वीकारण्याची सोय करण्यात आलेली आहे. नवीन क्रमांकपट्टीसाठी शुल्क भरणार्‍या वाहन मालकाला एसएमएस संदेशाद्वारे वाहन क्रमांकपट्टी बसविण्याबाबत माहिती दिली जाते, अशी माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.