Home बातम्या यंदाच्या चतुर्थीत कागदाच्या गणेशमूर्ती

यंदाच्या चतुर्थीत कागदाच्या गणेशमूर्ती

0

पर्यावरणपूरक मूर्तींच्या प्रसाराचे प्रयत्न

सप्टेंबरमध्ये होणार्‍या गणेशचतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर कुंडई येथील सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू उपासना फाऊंडेशनने प्लास्टर ऑफ पॅरिस व चिकणमातीला पर्याय म्हणून ‘पेपर मॅटो’ किंवा कागदापासून तयार केलेल्या श्रीगणेशमूर्ती गोव्यात लोकप्रिय करण्याचे ठरविले असून या ‘इको फ्रेंडली गणेशमूर्ती’ वापरात आणण्यासाठी जनतेमध्ये जागृती करण्यात येणार असल्याचे पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाणा व गोवा हस्तकला विकास महामंडळाचे अध्यक्ष लवू मामलेदार यांनी सांगितले.

कागदापासून बनविलेल्या या मूर्ती सुबक दिसत असून चिकणमातीच्या मूर्तीप्रमाणेच त्या आकर्षक वाटतात. एक फूट उंचीच्या गणेशमूर्तीची किंमत ४०० रुपये असून विसर्जन केल्यानंतर चार ते पाच तासात त्या विरघळतात. माशांसाठी अन्न म्हणूनही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे त्याचा पर्यावरणावर कोणताही वाईट परिणाम होत नाही, असे फाऊंडेशनचे प्रथमेश सिंह नाईक यांनी सांगितले.

प्लास्टर ऑफ पॅरिसला हा महत्त्वाचा पर्याय ठरला असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री साल्ढाणा व आमदार मामलेदार यांनी सांगितले. यावेळी मडगाव येथील रवींद्र भवनचे अध्यक्ष दामोदर नाईक उपस्थित होते. आपण हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष असताना प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींवर बंदी घालण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली.

गेल्या वर्षी गोव्यात कागदापासून बनविलेल्या ५५ मूर्तींची विक्री केली होती. मुंबईत ८ हजार मूर्तींची विक्री केली होती, अशी माहिती प्रथमेश सिंह नाईक यांनी दिली.