अमेरिकी उच्चस्तरीय शिष्टमंडळ पीओके भेटीवर

0
100

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्य दर्जा भारत सरकारने रद्द केल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) स्थितीची पाहणी करण्यासाठी काल येथे अमेरिकी संसदेच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट दिली.

या शिष्टमंडळात ख्रिस व्हॅन हॉलेन व मॅगी हासन हे अमेरिकी सांसद तसेच अमेरिकेचे चार्ज द अफेअर्स ऍम्बासिडर पॉल जोन्स यांचा समावेश आहे. त्यांनी पीओकेतील मुजफ्फराबाद येथे जाऊन तेथील लोकांशी संवाद साधला.

पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने एका निवेदनात याविषयी म्हटले आहे की भारत सरकारच्या वरील कृतीनंतर पीओकेतील स्थितीच्या माहितीसाठी अमेरिकी शिष्टमंडळ तेथे आले आहे. अमेरिकी शिष्टमंडळाने पीओकेचे नेते सरदार मसूद खान व राजा फारूक हैदर यांच्याशी चर्चा केली.

जम्मू-काश्मीरप्रश्‍नी संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार तोडग्यासाठी भारताकडे बोलणी करावी असे आवाहन पीओके नेत्यांनी अमेरिकी शिष्टमंडळाला केले. मात्र भारताने काश्मीरप्रश्‍न हा द्विपक्षीय असल्याचे ठामपणे आधीच स्पष्ट केले आहे. तिसर्‍या पक्षाला याबाबत कोणतेही स्थान नसल्याचे भारताने म्हटले आहे.