अब्दुल्ला पिता-पुत्रांची पक्षाच्या शिष्टमंडळाशी दोन महिन्यांनंतर भेट

0
114

केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्य दर्जा रद्दबातल ठरविल्यानंतर प्रथमच एका मोठ्या राजकीय घडामोडी काल नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या १५ सदस्यीय शिष्टमंडळाला सुमारे दोन महिने स्थानबध्दतेत असलेल्या फारुख अब्दुल्ला व ओमर अब्दुला यांची येथे भेट घेऊ देण्यात आली. जम्मू-काश्मीर प्रशासनाने या शिष्टमंडळाला अब्दुल्ला यांची भेट घेण्यास अनुमती दिली होती.

नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना येथील त्यांच्या निवासस्थानीच गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यांचे पुत्र तथा माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हेही स्थानबध्दतेत होते. काल नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या शिष्टमंडळाने अब्दुल्ला यांची भेट घेऊन राज्यात लवकरच होणार्‍या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका व ताज्या घडामोडी यांच्यावर चर्चा केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व पक्षाचे जम्मूचे प्रांत प्रमुख दविंदर सिंग राणा यांनी केले. ओमर अब्दुल्ला यांच्या हरी निवास या निवासस्थानी हे शिष्टमंडळ सुमारे ३० मिनिटे होते.

नेत्यांच्या सुटकेची गरज
फारुख व ओमर अब्दुल्ला यांच्याशी वेगवेगळ्या स्वतंत्र बैठका या शिष्टमंडळाने घेतल्या. यावेळी दाढी वाढवलेल्या ओमर अब्दुल्ला यांनी शिष्टमंडळाबरोबर सेल्फीही घेतली. त्यानंतर हे शिष्टमंडळ फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी गेले. अब्दुल्ला यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर दविंदर सिंग राणा यांनी पत्रकारांना सांगितले की जम्मू-काश्मीरसंदर्भात राजकीय प्रक्रिया सुरू व्हायची असेल तर राजकीय पक्षांच्या नेत्यांना मुक्त करण्याची गरज आहे. जम्मू-काश्मीरमधील विद्यमान स्थितीबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. विशेष करून लोकांचा सध्या होत असलेला कोंडमारा अनुभवून ही नाराजी आहे. त्यामुळे राज्यात लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी आमचे आवाहन आहे की प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षांच्या कोणतेही गुन्हेगारी आरोप नसलेल्या राजकीय नेत्यांची स्थानबध्दतेतून सुटका केली जावी.

धार्मिक सलोख्यासाठी वचनबध्द
आपल्या पक्षाला इतिहास आणि वारसा आहे. राज्यातील धार्मिक सलोखा कायम ठेवून लोककल्याणासाठी वावरण्यास आमचा पक्ष वचनबध्द आहे असे सिंग म्हणाले. गटविकास समित्यांच्या निवडणुकांमध्ये सहभागी होण्याविषयी विचारले असता सिंग म्हणाले, ‘हे पहा राज्यात बंदिवास असल्याप्रमाणे स्थिती आहे. राजकीय नेते बंदिस्त आहेत, त्यांची सुटका व्हायला हवी, तरच राजकीय प्रक्रिया सुरू होईल.’

पीडीपीचे शिष्टमंडळ आज
मेहबुबा मुफ्तींना भेटणार
फारुख व ओमर या अब्दुला पिता पुत्रांची भेट घेण्यास नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या शिष्टमंडळाला मान्यता दिल्यानंतर राज्यातील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी तथा पीडीपीच्या नेत्यांना त्यांच्या प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेण्यास राज्य प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार पीडीपीचे शिष्टमंडळ मेहबुबा मुफ्ती यांना आज सोमवारी भेटणार आहेत.