पाकिस्तानची संभाव्य सामरिक खेळी

0
147
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

भारताने सैनिकी प्रतिकार सुरु करताच ही चकमक अणुयुद्धात बदलू शकते या शक्यतेने घाबरलेले पाश्चिमात्य देश व संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती युद्धबंदीसाठी प्रयत्न लागू करतील अशी आशा पाकला वाटते. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांच्या चीन दौर्‍यात त्यांनी याच मुद्यावर चिनी अधिकार्‍यांशी चर्चा केली असावी, असाही संरक्षणतज्ज्ञांचा होरा आहे.

२६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताने बालाकोटवर हवाई हल्ला केला. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानने पूंछ नौशेरामध्ये प्रतिहल्ला केला. त्यात झालेल्या ‘डॉग फाईट’ मध्ये एका भारतीय वैमानिकाने पाकिस्तानी एफ -१६ फाल्कन जेटचा धुव्वा उडवला. ६ ऑगस्टला भारतीय संसदेने राज्यघटनेतल्या काश्मीरला खास दर्जा देणार्‍या ३७०/३५ए कलमांमध्ये बदल करून काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करायला मंजुरी दिली. तेव्हापासून अस्वस्थ होऊन चवताळलेला पाकिस्तान काश्मीर प्रश्न जगाच्या नजरेत आणून देत तेथे त्यांची मध्यस्थी करवण्याचा जीवतोड प्रयत्न करतो आहे. मात्र, चीनसकट सर्वच आघाड्यांवर त्याला असफलतेचा सामना करावा लागला.
आता १७-३० सप्टेंबर २०१९ दरम्यान संयुक्त राष्ट्र संघ महासभेचे ७४ वे अधिवेशन होत आहे. ११२ राष्ट्रप्रमुख, ४८ सरकार प्रमुख आणि ३० परराष्ट्रमंत्री ह्या अधिवेशनात हजेरी लावतात. यातील ‘जनरल डिबेट’मध्ये अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प २४ सप्टेंबरला आणि याच डिबेटच्या ‘प्रोग्रेस इन अड्रेसिंग प्रायॉरिटीज’ सत्रामध्ये पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबरला एका मागे एक संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेला संबोधित करतील. पाकिस्तान २६ सप्टेंबरच्या ‘एलिमिनेशन ऑफ न्यूक्लियर वेपन्स’ या सेशनमध्ये काश्मीर संबंधातील आण्विक युद्धाच्या संभावनेला उजागर करेल आणि इम्रान खान काश्मीरचे तुणतुणे जोरात वाजवेल यात शंकाच नाही. या पार्श्वभूमीवर २० ऑगस्ट त ८ सप्टेंबर दरम्यान घडलेल्या महत्वाच्या खालील बाबींमुळे येणार्‍या भविष्यात काय होऊ शकते याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

१) २३ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर दरम्यान चीन व पाकिस्तानी वायुसेनेने १५ दिवसांचा शाहीन (ईगल) ८ हा सर्वदलीय युद्धाभ्यास केला.
२) जरूर पडली तर आम्ही काश्मीर प्रश्नावर भारताशी अणुयुद्धसुद्धा करू शकतो आणि त्याच्या नंतरच्या नृशंस परिणामांसाठी जगातील देशच जबाबदार असतील अशी धमकी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खाननी ५ सप्टेंबरला भारताला दिली. त्याच्याच अनुषंगाने काश्मिरमधील रसातळाला जात असलेली सामरिक व राजकीय परिस्थिती आणि त्यामधून उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती जगासाठी घातक आहे अशी टिप्पणी, पाकिस्तानी सेनाध्यक्ष जनरल कमर बाजवांनी ६ सप्टेंबरला झालेल्या पाकिस्तानच्या १९६५ च्या युद्धातील तथाकथित विजय दिवसाच्या समारंभात दिली.
३) ८ सप्टेंबरला पाकिस्तानने किमान २००० सैनिक आणि १५० स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या कमांडोंना पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या बाघ आणि कोटली क्षेत्रात, नियंत्रण रेषेच्या जवळ आणले. त्याच प्रमाणे पाकिस्तानने अंदाजे २७५ अफगाण व पश्तून जिहाद्यांना गुरेझ (८०), मच्छल (६०), करना (५०), केरन (४०), उरी (२०), नौगाम (१५) आणि रामपूर (१०) ह्या सात लॉन्च पॅड्सवर आणून भारतात घुसवण्यासाठी सज्ज केले.
४) ८ सप्टेंबरलाच काश्मिरच्या केरन क्षेत्रात भारतीय सेनेने पाकिस्तानी बॉर्डर ऍक्शन टीमच्या तीन सदस्यांना ठार केले आणि त्यांची पार्थिवे घेऊन जाण्याची सूचना पाकिस्तानला दिली.
५) पाकिस्तान इजिप्तकडून ३६ मिरज २००० विमान खरेदी करणार असून ती आगामी ३० ते ६० दिवसांमध्ये पाकिस्तानात दाखल होतील.
६) ६-०७ सप्टेंबरला कच्छच्या सर क्रीक क्षेत्रात, बेवारस आणि काहीही खुणा नसलेल्या सात छोट्या मोठ्या बोटी सापडल्या आणि त्याचबरोबर थोड्याच दिवसात केरळमध्ये समुद्रमार्गे जिहादी हल्ला होऊ शकतो अशी ताकीद भारतीय इंटलिजन्स एजन्सींनी दिली.
७) पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी ५-०८ सप्टेंबर दरम्यान,चीनचा दौरा केला.
८) सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात पाकिस्तानने काश्मिरमधील जिहाद्यांना एफएम रेडियोच्या माध्यमातून गुप्त संदेश द्यायला, पुंछ क्षेत्रात दोन आणि जम्मू अखनूर क्षेत्रात दोन रेडियो रीले टॉवर्स सीमेवर उभारल्याचे नजरेस आले आहे.
९) पाकिस्ताननी जैशचा म्होरक्या अझर महमूदला ८ सप्टेंबरला कैदेतून गुपचूप सोडून दिल्याची बातमी आली.
१०) १० सप्टेंबरला पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशींनी जिनेव्हातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समिती समोरील भाषणानंतर वार्ताहरांशी बोलतांना ‘इंडियन स्टेट ऑफ काश्मीर’ असा उल्लेख करून तेथे खळबळ उडवून दिली.
११) त्याच दिवशी पाकिस्तानी सेनाध्यक्ष जनरल कमर बाजवांनी ऑपरेशनल रेडिनेससाठी मांगला/गुजरानवाला स्थित पाकिस्तानच्या फर्स्ट स्ट्राईक कोअरची चाचपणी केली आणि
१२) १२ सप्टेंबरला पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी अपघाती युद्ध होऊ शकण्याची शक्यता व्यक्त केली.

चीन व पाकिस्तानने लडाखच्या उत्तरेला लेहपासून ३०० किलोमीटर दूर असलेल्या होल्टन एयरबेसवर ‘शाहीन ८’ युद्धाभ्यास केला. लेहच्या इतक्या जवळ असा युद्धाभ्यास पहिल्यांदाच होतो आहे. चीनने तिबेटमध्ये, लडाखच्या उत्तरेला अनेक विमानतळ उभे केले आहेत, पण पाकिस्तानने पहिल्यांदाच स्कार्डू एअर बेसचा वापर हवाई युद्धाभ्यासासाठी केला आहे. या युद्धाभ्यासात गिलगिट बाल्टिस्तानच्या स्कार्डू एयर बेस वरील ३६ पाकिस्तानी मिरज २००० व जेएफ १७ थंडर लढाऊ विमान आणि ४६ चीनी जे १० सी,जे ११ व जे १७ लढाऊ विमानांचा सहभाग होता. याच बरोबर या युद्धाभ्यासात चिनी व पाकिस्तानी स्पेशल फोर्सेस आणि भूदल सैनिक जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे, रडार्स, आणि एयर बॉर्न लँडिंग अँड कम्युनिकेशन यांचाही समावेश होता. ह्या बॅक टू बॅक युद्धाभ्यासात, दोन्ही बाजूंना कुठलीही माहिती दिली गेली नाही. दोघांवरही, शत्रूची माहिती प्रत्त्यक्ष युद्धयजन्य परिस्थितीनुसार,अर्ली वॉर्निंग एयरक्राफ्टच्या माध्यमातून मिळवायचे आणि त्यानुसार आपली लढाऊ युद्ध धोरण आखण्याच बंधन होते. युद्धाभ्यासात भाग घेणार्‍या सैनिकांना व वैमानिकांना, प्रत्यक्ष वातावरण व भौगोलिक समन्वयाची सवय व्हावी या उद्देशाने हा युद्धाभ्यास, काश्मिर खोर्‍यासदृष्य सपाट आणि पहाडी इलाक्यात केला गेला. या सर्वांमुळे पाकिस्तानला रियल कॉम्बॅट लेव्हल प्रशिक्षण मिळाले. चीन व पाकिस्तान दोघांनीही भारताने काश्मिरमध्ये केलेल्या एकतर्फी कारवाईवर टीका केली असून त्यामुळे तेथील परिस्थिती अजूनच बिघडेल अशी चिंता या युद्धाभ्यासा नंतर व्यक्त केली. ह्या सर्व गोष्टी बॅटल इंडिकेशन्स असून त्यांचे पृथक्करण केल्यास आगामी पाकिस्तानी कारवाईचे संकेत मिळू शकतात.

बालाकोट वरील हल्ल्यात व नौशेरा/पूंछ क्षेत्रात झालेल्या एरियल कॉम्बॅटमध्ये अपमानास्पद मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानी वैमानिकांना हवाई युद्धाचे आणि स्पेशल फोर्सेस सैनिकांना काश्मीर सदृश्य भूभागात प्रत्यक्ष युद्ध प्रशिक्षण देण्यासाठी चीनने या युद्धाभ्यासाचे नियोजन केले असावे असा संरक्षणतज्ज्ञांचा कयास आहे. पाकिस्तानने २७५ जिहादी ७ लॉन्च पॅड्सवरून भारतात घुसवण्यासाठी तैनात केले आहेत. हे करताना २००० च्या वर स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे सैनिक आणि १५० स्पेशल फोर्सेसचे नुमाईंदे त्यांना मदत करण्यासाठी पीओकेत सीमेजवळ तैनात केले आहेत. ही संख्या सध्या जे पाकिस्तानी युनिट्स व फॉर्मेशन्स सीमेवर फॉरवर्ड पोस्ट्सवर तैनात आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आहे. ही तैनाती होण्याआधी पाकिस्तानने हाफिज सईदची लष्कर ए तैयबा आणि अझर महमूदची जैश ए महंमद या दहशतवादी संघटनांना काश्मीरमध्ये जिहादी हैदोस माजवण्यासाठी स्थानिक व अफगाण स्वयंसेवकांची नवीन भरती करण्याचे आदेश दिले होते. एसएसजीचे कमांडो या रिक्रुटसना प्रशिक्षण देतील आणि त्यांच्या सीमापार भारतात घुसण्याआधी त्यांना बॉर्डर ऍक्शन टीम्समध्ये सामील करतील. १० सप्टेंबरला भारतीय सेनेने केरन सेक्टरमध्ये अशा टीमच्या आठ सदस्यांना अल्ला प्यारे केले. याचा अर्थ असा की काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून तेथे तैनात भारतीय सेनेबरोबर जिहादी युद्ध छेडण्याची पूर्ण तयारी केली आहे. आपल्या जिहाद्यांना गुप्त संदेश देण्यासाठी पाकिस्तान सीमेवरील रेडियो रीले टॉवर्सचा वापर करेल. काश्मीरमधील अलगाववादी आणि दगडफेके जिहाद्यांच्या समर्थनार्थ खुलेआम समोर बाहेर पडतील. भारताने या विरुद्ध कारवाई केल्यास पाकिस्तान संयुक्त राष्ट्र संघात भारतीय सुरक्षा दल काश्मिरी जनतेवर अत्याचार करत असून तेथे अमानुष दडपशाही करत असल्यामुळे हा त्या विरुद्ध उफाळलेला लोकक्षोभ आहे व याची तपासणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार समितीने हस्तक्षेप करावा अशी बोंब मारेल. या उपर जर संयुक्त राष्ट्रसंंघानी काहीही कारवाई केली नाही तर या लोकक्षोभाच्या मदतीला धावून जाणे आमचे नैतिक कर्तव्य आहे असे म्हणत पाकिस्तान त्या २००० सैनिकांच्या माध्यमातून आणि ‘शाहीन ८’ युद्धाभ्यासात प्रशिक्षित झालेल्या त्याच्या वायुसेनेच्या प्रत्यक्ष मदतीने, सीमेवर लिमिटेड आर्मी ऍॅक्शन करेल. कदाचित भारताच्या उखळी तोफांचा मारा त्याच्या फॉरवर्ड पोस्ट्सवर झाल्यावर त्याची विमान भारतावर हवाई आक्रमण आणि स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे सैनिक भारतीय ठाण्यांवर जमिनी आक्रमण करून अपघाती युद्ध चालू करतील. भारताने सैनिकी प्रतिकार सुरु करताच ही चकमक अणुयुद्धात बदलू शकते या शक्यतेने घाबरलेले पाश्चिमात्य देश व संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती युद्धबंदीसाठी प्रयत्न लागू करतील अशी आशा पाकला वाटते. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांच्या चीन दौर्‍यात त्यांनी याच मुद्यावर चिनी अधिकार्‍यांशी चर्चा केली असावी, असाही संरक्षणतज्ज्ञांचा होरा आहे.

ज्या बेवारस बोटी कच्छच्या सर क्रीकमध्ये आढळून आल्यात त्यावरून बरेच जिहादी कच्छ मार्गे गुजराथमध्ये आले असण्याची संभावना नाकारता येत नाही. काही जिहादी गुजराथमध्येच असतील तर उर्वरित जिहादी त्यांच्या भारतातील जयचंदी संपर्कांच्या मदतीने उर्वरित भारतात गेले असतील आणि त्या ठिकाणांवरील स्लीपर सेल्सच्या मदतीने तेथे जिहादी हैदोस घालतील. दुसरीकडे,अफगाणिस्तानमध्ये पाय रोवून बसलेली आयसीस भारतातही आपले पाय रोवण्यास उत्सुक आहे. दक्षिण भारतात त्यांचे समर्थक आहेत हे २०१९ च्या ईस्टर संडेला श्रीलंकेतील चार ठिकाणांवर झालेल्या जबरदस्त जिहादी हल्ल्यानंतर स्पष्ट झालेच आहे. खास करून तामीळनाडू, महाराष्ट्र व केरळमध्ये आयसीसला जबरी समर्थन मिळत आहे आणि त्याचाच फायदा घेत, आयसीसचे अरब जिहादी, समुद्र मार्गे येऊन केरळमधील स्लीपर सेल्सच्या सहाय्याने तेथे जिहादी हैदोस घालण्याची दाट संभावना आहे. गुजराथ व केरळमधील जिहादी हल्ल्यांनंतर ह्या कारवाया तेथील असंतुष्ट मुस्लिम तरुणांनी केल्या आहेत आणि त्या त्यांच्या विरुद्ध प्रचलित दुजाभाव व पक्षपाती धोरण विरोधात आहेत अशी ओरड करायला पाकिस्तान व त्याचे भारतातील समर्थक तयारच असतील. अशा प्रकारे इस्लामाबाद, केरळ-काश्मीरमधील जिहादी हल्ल्यांना हवा देईल आणि भारतीय काश्मीर व इतरत्र भारतामध्ये कसा असंतोष आहे आणि मुसलमानांना कशी सापत्न वागणूक दिली जाते आहे याच रडगाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत गाईल. या सर्व पाकिस्तानी कारवायांना चीनचा संपूर्ण नैतिक पाठिंबा असेल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आमसभेत तो ठामपणे पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहील.
सद्यस्थितीत जगाचे लक्ष्य या प्रश्नाकडे वेधण्यासाठी लिमिटेड मिलिटरी ऍक्शन शिवाय पाकिस्तानकडे दुसरा पर्याय नाही. ही लिमिटेड मिलिटरी ऍक्शन सर्वंकष युद्धात बदलू देणे त्याला परवडणार नाही कारण त्याचा फायदा घेत बलुचिस्तान व सिंध प्रांत पाकिस्तान पासून वेगळे होतील आणि पाकिस्तानची शकले होतील ही सार्थ भीती सरकार, सेना आणि समर्थक चीनला वाटते आहे.

पाकिस्तान आज काश्मिरी नाटकाच्या संहितेच्या शेवटच्या पानावर आलेला दिसून येतो. तो काश्मीर बाबतीत सर्व चाली खेळून चुकला आहे आणि त्यापैकी कुठलीही खेळी यशस्वी झाली नाही. त्यामुळे हतबल झालेला पाकिस्तान आता काश्मीरच्या नावाने भारतावर युद्ध लादून आणि हे युद्ध अणुयुद्धात परिवर्तीत होऊ शकेल अशी भीती दाखवून जगाचे लक्ष परत एकदा काश्मीरकडे वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करील. आपला हा उर्वरित हुकमाचा एक्का खेळण्याशिवाय त्याच्या हाती आता काहीच उरलेले नाही.