कॉर्पोरेट क्षेत्राला दिलासा

0
128

वस्तू व सेवा कर मंडळाच्या बैठकीसाठी गोव्यात आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल कॉर्पोरेट करामध्ये भरघोस कपातीची देशाच्या समस्त उद्योगजगताला दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली. वास्तविक, गेल्या काही अर्थसंकल्पांच्या वेळेस अशा प्रकारे उद्योग जगताला दिलासा देण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात केली जाणार का, असा सवाल विचारला जात असे, परंतु सरकारने ते पाऊल आजवर उचलले नव्हते. मात्र, देशाचे घसरलेले अर्थव्यवस्थेचे गाडे पुन्हा रुळावर ठेवण्याच्या गेले अनेक दिवस चाललेल्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून कॉर्पोरेट करामध्ये भरघोस करसवलत अर्थमंत्र्यांनी जाहीर केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सध्या आलेली मरगळ हा सरकारसाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनाने सहा वर्षांतील नीचांक गाठलेला आहे. नवे रोजगार निर्माण होत नाहीत, विविध उत्पादन क्षेत्रांमध्ये मंदीचे सावट असल्याने उत्पादन बंद ठेवण्यापासून कामगार कपातीपर्यंतची पावले उचलावी लागत आहेत. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकार पावलांमागून पावले टाकत चालले आहे. कॉर्पोरेट करात कपातीचा कालचा निर्णय हा त्यातलाच एक धाडसी निर्णय आहे. वास्तविक, उत्पादनांना मागणी वाढावी यासाठी सरकारला प्रत्यक्ष करामध्ये म्हणजे आयकरात सवलत देता आली असती किंवा अप्रत्यक्ष करामध्ये म्हणजे वस्तू व सेवा करातही सवलती देता आल्या असत्या, परंतु त्यांचा परिणाम जरी तात्काळ दिसून आला असता तरीही ते तात्कालिक उपाय ठरले असते. मात्र, कॉर्पोरेट करामधील कपातीचा निर्णय हे दूरगामी पाऊल आहे. कॉर्पोरेट कर कमी भरावा लागणे म्हणजेच त्या कंपन्यांचा नफा वाढेल. हा वाढीव नफा एक तर भागधारकांना लाभांश रूपाने वाटला जातो किंवा नव्या भांडवली गुंतवणुकीसाठी त्याचा वापर होतो. सहसा भांडवली गुंतवणुकीसाठी, विस्तार योजनांसाठीच त्याचा वापर होत असल्याने ह्या कंपन्या हा पैसा नव्या गुंतवणुकीसाठी वापरतील व त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा सरकारचा होरा आहे. खासगी क्षेत्राकडून जोमाने गुंतवणूक व्हावी व भारत हे एक उत्पादन केंद्र बनावे असा मोदी सरकारचा सतत प्रयत्न राहिला आहे. सध्या उत्पादनक्षेत्रावर मंदीचे सावट आहे. वाहन उद्योगासारख्या उद्योगांमध्ये काय परिस्थिती ओढवली हे गेल्या काही महिन्यांत दिसले. कॉर्पोरेट कर हा सर्व देशी कंपन्यांना लागू होत असतो. भले मग त्या छोट्या असोत अगर मोठ्या, शेअर बाजारावर नोंदणीकृत असोत वा नसोत, उत्पादन, व्यापार व सेवा क्षेत्रातील कंपन्यांना सरसकट हा कर लागू होत असल्याने या करसवलतीचा फायदा त्या सर्वांना होणार आहे. सध्या चारशे कोटींपर्यंत उलाढाल असलेल्यांना सध्या २९.१४ टक्के कर अधिभारांसह भरावा लागे. त्यावरील उलाढाल असलेल्या कंपन्यांना तो ३४.९ टक्के लागू होत असे. आता तो अधिभारांसह अनुक्रमे २५.१७ ते ३० टक्क्यांपर्यंत खाली येईल. म्हणजे सरासरी साधारण चार टक्के कमी कर या कंपन्यांना सरकारला द्यावा लागेल. किमान वैकल्पिक कर (मॅट)ही त्यांना द्यावा लागणार नाही. त्यामुळे हा सारा पैसा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वळवला जाईल या अपेक्षेने सरकारने हे पाऊल उचलले आहे. या करसवलतीमुळे भारतीय कॉर्पोरेट जगत आता पूर्व आशियाई देशांतील करप्रणालीशी सुसंगत बनलेले आहे. नव्या कंपन्यांना तर केवळ १७.०१ टक्के कॉर्पोरेट कर लावला गेला आहे. अट फक्त आहे ती मार्च २०२३ पर्यंत त्यांनी आपले उत्पादन सुरू करण्याची. करकपातीतून अर्थातच सरकारला १.४५ लाख कोटींचा तोटा सोसावा लागेल. गेल्या अर्थसंकल्पात म्हटल्याप्रमाणे सरकारची सध्याची वित्तीय तूट ७.०४ लाख कोटी आहे, ती या भुर्दंडामुळे ८.४८ लाख कोटींवर जाईल. वित्तीय तूट ३ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे जे उद्दिष्ट सरकारला सतत ठेवावे लागते, त्याच्याशी थोडी तडजोड त्यामुळे करावी लागू शकते. रिझर्व्ह बँकेने सरकारला दिलेल्या १.२५ लाख कोटींचा त्या कामी उपयोग केला जाऊ शकतो असे अर्थतज्ज्ञांना वाटते. वित्तीय तूट प्रमाणाबाहेर जाऊ नये यासाठी सरकारला आपला अन्य खर्चही कमी करावा लागेल, करमहसुल किती गोळा होतो, निर्यात किती वाढते वा कमी होते वगैरे घटकांचेही अर्थातच त्यामध्ये कमी अधिक योगदान असते. वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार उपाययोजना करीलच, परंतु कॉर्पोरेट क्षेत्राला दिलासा देणे ही काळाची गरज होती. काल सीतारमण यांनी हा निर्णय जाहीर करताच शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. उद्योग जगताने उत्साहात या निर्णयाचे स्वागत केले आहे असा त्याचा अर्थ आहे. लवकरच दिवाळी येणार आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये उत्पादनांची मागणी वाढत असते. मंदीसदृश्य वातावरणामुळे यंदाची दिवाळी सुनी सुनी जाईल अशी जी शक्यता वर्तवली जात होती, त्यात आता नवा हुरूप येईल. कॉर्पोरेट करातील सवलतीचा विनियोग नव्या गुंतवणुकीसाठी केला जाणार का, स्पर्धात्मकतेसाठी त्याचे साह्य होणार का, नवे रोजगार त्यातून निर्माण होणार या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी अर्थातच थोडी प्रतीक्षा करावी लागेल!