दरम्यान, आग दुर्घटनेत भाजलेल्यांपैकी कुयाराम मिघाराम आयरागर (२३) याचे काल गोमेकॉत उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर झुआर कंपनीवर ३०४ कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तो ९५ टक्के भाजला होता. कुयाराम आग दुर्घटनेतील पहिला बळी ठरला आहे. आणखी पाच जण गंभीर जखमी झाले असून उपचार घेत आहेत. दरम्यान, आग दुर्घटनेचा तपशीलवार अहवाल येत्या सात दिवसांत सादर केला जाणार आहे.
२० दिवस पुरेल इतके पेट्रोल–डिझेल उपलब्ध
१५ हजार किलो लिटर्स पेट्रोलचा व १४ हजार किलोलिटर्स इतका डिझेलचा साठा उपलब्ध असून तो गोव्यात पुढील २० दिवस पुरेल इतका आहे असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने काल सांगितले. लोकांनी घाबरून जाऊ नये तसेच तेल साठवून ठेऊ नये असे आवाहनही केले आहे. नाफ्ता आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुरगाव पोर्ट ट्रस्टचे चेअरमन पी. मारा पांडियन यांनी एमपीटी मुख्यालयात काल महत्वाची बैठक बोलावली. यावेळी फॅक्टरी ऍण्ड बॉयलर्सचे मुख्य निरीक्षक तसेच तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी फॅक्टरी बॉयलर्स निरीक्षकांनी एमपीटी बर्थ ८ ते इंडिया ऑईल कॉर्पोरेशनच्या टाक्यांपर्यंत तेलवाहिनी सुरक्षित असल्याचे हमीपत्र दिले. त्यानंतर आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रोखून ठेवलेल्या ‘इगल मिरत’ जहाजाला आत बर्थकडे प्रवेश देण्यात आला व भारत पेट्रोलियमच्या टाकीत २ हजार किलो लिटर्स इंधन भरण्यात आले.