Home बातम्या योगमार्ग-राजयोग (योगसाधना : १३४) (अस्तेय – १७ )

योगमार्ग-राजयोग (योगसाधना : १३४) (अस्तेय – १७ )

0

डॉ. सीताकांत घाणेकर

समाज व्यवस्थित चालावा म्हणून पूर्वजांनी काही ठरावीक गोष्टी ठरवल्या. त्यात एक म्हणजे- कुणीही चोरी करू नये – अचौर्य, अस्तेय. विविध तर्‍हेच्या चोर्‍यांत एक चोरी विचारांती लक्षात येते ती म्हणजे- वेळेची चोरी.

मानवी जीवनात वेळेचे महत्त्व फारच आहे. कारण गेलेली वेळ केव्हाही परत येत नाही. म्हणून वेळेचा सदुपयोगच करायला हवा. म्हणून ह्या विषयाबद्दल चिंतन व संस्कार हवेत. प्रत्येक कामात नियमितता ही गोष्ट अनिवार्य आहे.

दुर्भाग्याने बहुतेक भारतीय जनता ह्या संदर्भात दक्ष नाही. पाश्‍चात्त्य लोक वेळेला फार प्राधान्य देतात. आम्ही मात्र निष्काळजीपणा

करतो. उदाहरणार्थ- आम्ही कुणालातरी अमुक वेळेला बोलावतो पण आपण त्यावेळी हजर नसतो. आपण उशीरा येतो. आपल्यामुळे त्यांचा वेळ फुकट गेला, हा साधा विचार देखील आपल्या मनात येत नाही. म्हणून अनेकांना आपल्या कृतीबद्दल पश्‍चात्ताप होत नाही. त्यामुळे ते क्षमा देखील मागत नाहीत. ह्या अशा घटना सरकारी कर्मचार्‍यांच्या बाबतीत जास्त घडतात. कारण बहुतेकजण बेजबाबदार असतात. त्यांना जाब विचारला जात नाही. त्यांना आपल्या कर्तव्याचे भानच नसते. वेळेवर न येणे हा जणू काय त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे, असे त्यांना वाटते. त्यांनी निसर्गाचा एक नियम लक्षात ठेवायला हवा की, स्वतःचा वेळ आपण व्यर्थ दवडू शकतो पण इतरांचा वेळ असा घालवणे म्हणजे पाप आहे. कुठेतरी ह्याचा जाब द्यावाच लागेल.

आपले पुष्कळ कार्यक्रम अनेकवेळा ठरलेल्या वेळेपेक्षा उशिराच सुरू होतात. आता तर सर्वांना एवढी सवय झाली आहे की आपण सहज म्हणतो देखील ‘सात म्हणजे साडे सात’. त्यामुळे वेळेवर येणारे सुद्धा उशिराच येतात. ही गोष्ट भूषणावह नाही. आयोजकांनी ह्या बाबतीत दक्ष राहायला हवे. जे कुणी वेळेवर आले आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम ठरल्यावेळी सुरू करायला हवा. तरच लोकांना चांगली सवय लागेल.

काही कार्यक्रमासाठी आपण समाजातील मोठ्या व्यक्तीला उद्घाटन करण्यासाठी किंवा वक्ता म्हणून बोलावतो. बहुतेक वेळा ह्या व्यक्ती म्हणजे राजकारणी, आमदार, नगराध्यक्ष, मंत्री, श्रीमंत दानशूर असतात. हे धुरीण बहुधा वेळेवर पोहचत नाहीत. तासन्‌तास आयोजक व इतर प्रेक्षक त्यांची वाट बघत आतुरतेने थांबतात. खरे म्हणजे अशा व्यस्त व्यक्तींना बोलावू नये. पण इथे आयोजकांचा स्वार्थ असल्यामुळे नाइलाज होतो कारण अशा व्यक्तींकडे त्यांचे काम असते. त्यांच्या कडून भरपूर देणग्या मिळतात.

अशावेळी इतर प्रेक्षकांचा विचार करून मूळ कार्यक्रम सुरू करायला हवा. ती व्यक्ती आली की मग उद्घाटनाचा विधी करू शकतो. काही प्रमुख पाहुणे तसा निरोप देखील पाठवतात. पण अशा व्यक्ती अगदी नगण्य आहेत.

ह्या अशा समयी आठवण होते ती अशा काही निवडक संस्थांची ज्यांचे कार्यक्रम मात्र ठरल्यावेळीच सुरू होतात व संपतात देखील. ह्या संस्था बहुतेक आध्यात्मिक असतात. त्यांना इतरांच्या मूल्यवान वेळेची कदर करायला शिकवले जाते. त्यांच्यासाठी सर्वच प्रेक्षक अतिमहनीय असतात. त्यांच्या आश्रमात सर्व कार्यक्रम काटेकोरपणे ठरवले जातात. व त्या वेळा दक्षतेने पाळल्या जातात. अनेक केंद्रांत सकाळी पाच वाजता प्रार्थना, योग, ध्यान असे विविध कार्यक्रम नियमित सुरू होतात. तिथे शिस्तीचे कडक पालन होते. काही अपवाद असत नाहीत. तिथेच सद्वर्तनाचे संस्कार होतात.

तसे पाहिले तर आपल्या पूर्वजांना वेळेचे महत्त्व माहीत होते म्हणून त्यांनी जीवनातील साधना व अनेक कर्मकांडे त्याप्रमाणे ठरवली होती. सकाळी सूर्योदयाबरोबर सूर्यनमस्कार, प्रार्थना व बीजमंत्र म्हणून सूर्यनमस्कार घालणे. संध्या-पूजा सकाळी विशिष्ट समयी करणे, तिन्हीसांजेची प्रार्थना देखील ठरलेल्या वेळीच व्हायची.

आमच्या बालपणात संध्याकाळी सात वाजता सर्व एकत्र जमून प्रार्थना म्हणत असत. एकत्र कुटुंब व वाडवडिलांचे मोठे घर होते. अंगणाकडे भिंतीला टांगलेले एकमेव घड्याळ होते. तरी देखील सात वाजायच्या आधीच सर्व मुले तिथे जमत असू- देवघराच्या बाहेर असलेल्या मोठ्या ओसरीत ठीक सात वाजता वडीलधार्‍या महिला व आजी येऊन प्रार्थनेला सुरुवात करीत. आजीदेखील सहभागी व्हायच्या. प्रार्थना, स्तोत्रे, भजने व तदनंतर एक लहानशी गोष्ट – ध्रुव, प्रल्हाद, राम-कृष्ण ज्ञानेश्‍वर, तुकाराम, शिवाजी, झाशीची राणी… अगदी लहानग्यांसाठी ससा-कोल्हा व चिऊ-काऊची गोष्ट देखील असायची. त्यानंतर जेवणे व लगेच आठ- साडेआठपर्यंत झोपणे. ह्या विशिष्ट कर्मकांडामुळे वेळेचे महत्त्व आपोआप समजायचे व सुंदर संस्कार देखील सहज व्हायचे.

हल्ली ह्या अनेक चांगल्या गोष्टी बंद झाल्या. त्यांची जागा दूरदर्शनने घेतली. एकत्र कुटुंबे विस्कटून गेली. आता दूरदर्शनवरील कार्यक्रम. कसले संस्कार करतील हे त्या कार्यक्रमांवर अवलंबून आहे. पण एक गोष्ट चांगली आहे की इतर वेळी वेळेला महत्त्व न देणारे व वेळेचे बंधन न मानणारे देखील ह्या कार्यक्रमासाठी मात्र अगदी काटेकोरपणे उपस्थित असतात. कारण दूरदर्शन कुणासाठीही थांबत नाही.

तसेच आणखी काही वेळा सांभाळाव्याच लागतात- शाळेची वेळ, रेल्वेची वेळ, विमानाची वेळ. कारण इतरांसाठी इथे थांबू शकत नाही.

कर्मकांडात आणखी काही समारंभ वेळेवरच होतात. मुंज, लग्ने. लग्नाचा मुहूर्त पाळायलाच हवा. त्या वेळेमध्ये तडजोड करता येत नाही. ही देखील एक चांगली गोष्ट आहे.

वेळेच्या संदर्भात आणखी एक थोडा वेगळा विचार मनात डोकावतो- तो म्हणजे सरकारी डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतात त्याबद्दल. खरे म्हणजे त्यांना त्या मोबदल्यात वेगळा भत्ता दिला जातो. पण तरी देखील काहीजण कायदा मोडून खासगी प्रॅक्टिस करतात.

तसे बघितले तर ही चोरीच आहे. कारण त्यांनी आपला वेळ सरकारी दवाखान्यात येणार्‍या रुग्णांसाठी द्यायला हवा. बहुधा इथे येणारे गरीब रोगीच जास्त असतात. कारण त्यांना खासगी डॉक्टरांची फी परवडत नाही. अनेक वेळा शिकाऊ किंवा कमी अनुभवी डॉक्टर त्यांचा इलाज करतात. कारण वरिष्ठ डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करण्यात गुंतलेले असतात.

त्याशिवाय मेडिकल कॉलेजमधील वरिष्ठ डॉक्टर विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यासाठी स्वतः भरपूर वाचन व आपल्या विषयाचा अभ्यास करायला हवा. काही प्रोफेसरांना तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना देखील शिकवायचे असते. अनेकजण परीक्षक देखील असतात. आज प्रत्येक क्षेत्रात शास्त्र झपाट्याने पुढे जात आहे. ज्ञानांत भर पडत आहे. अशावेळी आधुनिक माहिती प्राप्त करणे हे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य आहे. आता असे डॉक्टर व शिक्षक जर खासगी प्रॅक्टिस करायला लागले तर ते अभ्यास करून ज्ञान संपादन करणार केव्हा, आणि तसे केले नाहीतर रोग्याचा इलाज नव्या उपायांनी करणार कसा व विद्यार्थ्यांना (पुढील पिढीचे डॉक्टर) शिकवणार काय?

आपणांतील अनेकजण देखील ही गोष्ट माहीत असून अशा डॉक्टरांकडे जातो त्याला विविध कारणे आहेत- त्यांची फी कमी असते. (कारण त्यांना सरकारी पगार असतो आणि त्यांची ही वरची कमाई असते), ह्या खासगी रुग्णांना गरज पडली तर सरकारी दवाखान्यात खास मानाचे स्थान मिळते. इथे रोगी व डॉक्टर दोघेही नैतिकदृष्ट्या विचार करत नाहीत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चोरीत सहभागी होतात.

आज प्रत्येकजण आपल्या कामात एवढा व्यस्त, व्यग्र आहे की, थोडा देखील वेळ उगाच दवडणे बहुतेकांना परवडत नाही. अशावेळी प्रत्येकाने ह्या विषयावर चिंतन करून मी दुसर्‍याच्या वेळेची तरी चोरी करणार नाही हे ठरवायला हवे. अस्तेय ह्या यमाचे महत्त्व प्रत्येकाला समजायला हवे.