Home बातम्या ही कसली शिस्त?

ही कसली शिस्त?

0

– प्रा. रमेश सप्रे

एक मजेदार प्रसंग. म्हणजे तसा गंभीर चिंतन करण्यासारखा. पण आपण त्याला ‘मजेदार’ म्हणू या…

एक प्रशिक्षण शिबिर महिनाभर चालू आहे. शिक्षकांना उद्बोधन (ओरिएंटेशन) सुरू आहे. वार शनिवार. सोमवारपासून शाळा सुरू. हे शिक्षक प्रथमच विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. ‘मुलांना समजून कसं घ्यायचं? त्यांच्यातलंच एक होऊनही त्यांच्यापासून निराळं कसं राहायचं?’..अशा विषयावर अखेरचं सत्र सुरू आहे. ते दुपारी एक वाजता संपून भोजनसत्र होऊन शिबिर संपणार आहे. एकमेकाचा निरोप घेऊन शिक्षक मंडळी नवी स्वप्नं.. नव्या आकांक्षा घेऊन आपापल्या घरी निघणार आहेत… अत्यंत उत्सुकता त्यांच्या मनात आहे आपल्या विद्यार्थ्यांना भेटण्याची.

वाजलेत दुपारचे बारा पंचावन .. शेवटची पाच मिनिटं त्यांच्याकडून एक महत्त्वाचा अभ्यास करून घेतला जातोय. पूर्वावलोकन (व्हिज्युअलायझेशन), अंतःपरीक्षण (इंट्रोस्पेक्शन), स्वयंसूचन (ऑटोसजेशन) अन् प्रार्थना – यांचा अभ्यास. मार्गदर्शकाला वेळेचं भान आहे. तो शिक्षकांना योग्य त्या सूचना देऊन त्यांच्या अंतरंगात प्रवेश करायला मदत करतोय…तो सांगतोय… ‘डोळे बंद करा…सोमवार उजाडलाय.. प्रसन्न सकाळ…पावसाची रिमझिम.. हवेत प्रसन्न गारवा…मी उठून तयारी करतेय शाळेला जाण्याची…शांत, सावकाश, सेवाभावानं मी शाळेत पोचलेय…उत्सुक मुलं इकडं तिकडं नाचताहेत…एखादं पोर रडतंय…त्याच्याजवळ जाऊन अत्यंत प्रेमानं मी त्या बालब्रह्माला स्पर्श करतेय. मीच धन्य होतेय…पालकांच्या चेहर्‍यावर उद्गार चिन्ह नि प्रश्‍नचिन्ह दोन्हीही एकाच वेळी आहेत…खूप मोहरून गेलंय मन…आता या छोट्या मनांशी संवाद साधायची संधी मिळणार…अस्वस्थ पालकांना आश्‍वस्त करून परत पाठवलंय…शाळेची घंटा वाजतेय..मंदिरातल्या घंटानादापेक्षा पवित्र नि मधुर वाटतोय त्या घंटेचा ध्वनी…सारी मुलं समोर आहेत…काही क्षणात सुरू होईल प्रार्थना..’

इतक्यात फुर्रर्रर्र असा शिट्टीचा कर्कश्श आवाज सर्वांच्या कानावर पडला. ते सत्र चालू असलेल्या वर्गाच्या दारात येऊन ‘शिस्तप्रिय’ संचालकानं ती शिट्टी वाजवली होती. एक वाजला होता बरोब्बर! बारा वाजून…एकोणसाठ मिनिटं..एकोणसाठ सेकंद झाल्यावर त्यानं केलं फुर्रर्रर्र…

सर्वांची लागत असलेली समाधी भंगली. खाडकन् सारी रूक्ष वर्तमानात आली. सर्वांना समोर दिसत असलेली ती मुलं…देवाघरची फुलं..एकदम कुठंतरी अदृश्य झाली नि जाणवलं आजूबाजूचं रूक्ष वास्तव…कटू परिस्थिती!

महिनाभर चाललेल्या वर्गाचा कळस (क्लायमॅक्स) गाठला जात होता. आणखी दोन-तीन मिनिटं सत्र चाललं असतं तर शेवट गोड, प्रभावी होणार होता. पऽऽण….

शिस्त आडवी आली.

पण शिस्त कशी आडवी येईल? ती पाळणार्‍यांनी थोडा अधिक समजूतदारपणा दाखवायला हवा होता. शिस्त हा महत्त्वाचा संस्कार आहे. पण त्याक्षणी तरी त्या सत्रात सहभागी असलेल्या सर्वांच्या मनात एकच प्रतिक्रिया होती… ही कसली शिस्त?

खरंच आहे. शिक्षणक्षेत्रात (तसं पाहिलं तर मानवी जीवनात) प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीला दोन पैलू असतात एक बाहेरची रचना, सापळा (स्केलेटन) दाखवणारा तर दुसरा अंतरीच्या आत्म्याला स्पर्श करणारा. म्हणजेच नियमाचे शब्द (लेटर ऑफ द लॉ) आणि नियमाचा आत्मा (स्पिरिट ऑफ द लॉ)! हा जो आत्मा असतो त्याला ‘मारून’ कोणते संस्कार आपण घडवणार? नि कोणती शिस्त पाळणार? अशी शिस्त ही बाहेरून लादलेली असते; अन् असे लादणारे मुलांच्या कोवळ्या मनासाठी लादेनपेक्षाही भयंकर असतात.

आपल्याला खरं तर स्वतःच्या किंवा व्यक्तीच्या जीवनात तसेच संस्थांच्या वा समाजाच्या जीवनात शिस्तीचा अर्थच कळलेला नाहीये. आपल्याला शिस्तीचं महत्त्व पटतं. शिस्तीला जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे हेही कळतं. ‘पण शिस्त म्हणजे नक्की काय? ती जीवनात कशी आणायची?’ याबद्दलच्या आपल्या कल्पना अस्पष्ट व काहीशा अव्यवहारी असतात.

‘शिस्त’ हा शब्द संस्कृतमधील ‘शिष्य’ शब्दापासून आलाय. इंग्रजीतसुद्धा ‘डिसायपल्’(म्हणजे शिष्य) यावरूनच ‘डिसिप्लिन’ हा शिस्त या शब्दाचा अर्थ आलाय. या शिस्तीत नुसतेच वागण्याचे यम-नियम (विधी-निषेध) नसतात तर गुरुकुलात राहणार्‍या, गुरूजवळ राहणार्‍या शिष्याची जीवनशैली समाविष्ट असते. शिस्तीला ‘अनुशासन’ हा आणखी एक शब्द आहे. बाहेरून लादलेली शिस्त सर्वत्र दिसते. पण खरी शिस्त ही ‘स्वयंशिस्त (सेल्फ डिसिप्लिन्)’ किंवा ‘आत्मानुशासन’ या स्वरूपाची असते. शिस्त आतून यावी लागते हे बरोबर आहे. पण मुलांना हे कळणार कसं? ..हा प्रश्‍न विचार करण्यासारखा आहे. यासाठी मुलांना ‘शिस्तीचं महत्त्व – नियम’ यावर व्याख्यान-प्रवचन देणं चुकीचं आहे. गोष्टीतून, दृष्टांतातून आणि याहीपेक्षा स्वतःच्या उदाहरणातून शिस्तीचा आदर्श (रोल मॉडेल) वडील मंडळींनी घालून देणं महत्त्वाचं आहे.

नुसती शिस्तप्रिय नव्हेत, तर स्वयंशिस्त असलेली शिक्षक व पालक मंडळी खूप काही साधू शकतात. पण आपण नेहमी पोहर्‍यात (कळशीत) पाणी नाही याबद्दलच तक्रार करत राहतो. विहिरीतच पाणी नाही याची आपल्याला कल्पना नसते. पण खरंच कल्पना नसते का?

‘पंचांग कितीही पिळलं तरी त्यातून एक थेंबही पाऊस पडत नाही, जरी त्यात लिहिलेलं असलं की यावर्षी पन्नास इंच पाऊस पडेल.’ असं रामकृष्ण परमहंस म्हणायचे. किती खरंय हे! शिस्तीचे लिखित वा अलिखित नियम वारंवार ऐकवून प्रभावी शिस्त मुलांच्या जीवनात येणार नाही. त्यासाठी शिस्तीचं वर्तन हवं. शिस्तीचा व्यवहार हवा. असो.

‘शिस्तीनं राष्ट्र मोठं बनतं. (डिसिप्लिन मेक्स अ नेशन ग्रेट)’ अशा अर्थाची वाक्य भिंतीवर वा पुस्तकात लिहिलेली असतात. शिस्तपालनासाठी जर भीती वा शिक्षा यासारखे नकारात्मक घटक असतील तर ती शिस्त परिणामकारक बनत नाही. प्रेमातूनही शिस्त लावता येते. मुख्य म्हणजे शिस्तीची अपेक्षा करणार्‍या व शिस्त इतरांना लावण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी स्वतःचं जीवन शिस्तबद्ध करायला हवं.

शैक्षणिक संस्थांतून – विशेषतः उच्च माध्यमिक स्तरावर (अन्य स्तरांवरसुद्धा) आज या गोष्टीचा प्रभाव कमी व अभाव जास्त असा प्रकार आहे. तो प्रभाव वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जीवनउभारणीसाठी शिस्त ही हवीच. वेडवाकडं बांधलेलं घर नि बेशिस्तीवर आधारलेलं जीवन उभंच राहू शकणार नाही. लगेच कोसळून पडतात. पत्त्यांच्या बंगल्यांसारखी!

सध्या याचा विदारक अनुभव आपल्याला येतोय. विद्यार्थी जगतात आत्महत्यांचं प्रमाण वाढू लागलंय. पण यातही अधिक चिंताजनक म्हणजे अधिकाधिक लहान वयातील (शाळेतील) मुलं जीव देताहेत अन् अत्यंत तुच्छ कारणांसाठी यावर उपाय काय? …

श्रमुलांनी चांगलं ऐकलं – पाहिलं – केलं पाहिजे. यासाठी अनेक उपक्रम शाळा-कॉलेजातून राबवले जातातही. पण कसे? त्या संस्थांतून शिक्षकवर्ग किंवा पालक-शिक्षक संघटना सक्रिय भाग घेऊन असले विधायक कार्यक्रम राबवतात तिथं युवक-युवतींची उपस्थिती जाणवण्याइतकी म्हणजे खूप असते. पण फक्त नोटिसा लावून किंवा वाचून दाखवून पुरेशी प्रेरणा मिळत नाही. परिणाम म्हणून चांगले वक्ते, मार्गदर्शक लाभूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य असते. विशेष म्हणजे अशा खरोखर चांगल्या कार्यक्रमांना शिक्षकवर्गही उपस्थित नसतो.

श्रबंकिंग’, ‘मास बंकिंग’ हा बेशिस्तीचा एक नमूना आहे. एक प्रकारचा निषेध यातून युवावर्ग व्यक्त करतो. विशेष म्हणजे काही शिक्षकांच्या व्याख्यानांना चांगली उपस्थिती असते. म्हणजे या क्लास बुडवणार्‍या प्रवृत्तीच्या मुळाशी क्रिया नसते तर प्रतिक्रिया असते. क्रिया ही अध्यापकवर्गाकडून नीट शिकवलं न जाणं, विद्यार्थ्यांना समजून न घेणं, त्यांच्याशी जिवंत संबंध निर्माण न करणं अशा अनेक प्रकारची असते. इथं सावध व प्रयत्नशील असायला हवं.

श्रविद्यार्थ्यांशी संवाद (रॅपोर) साधणं अत्यावश्यक आहे. रोल कॉल, विद्यालयाची डायरी, वेळोवेळी दिले जाणारे प्रगतीविषयक रिपोर्ट हे सारं व्यक्तिगत (पर्सनलाइझ) केलं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना नावानं हाक मारणं अतिशय आवश्यक आहे. शेरे (रिमार्क्स) देतानासुद्धा ‘अभय, तू आणखी अभ्यास केलास तर सर्वांगानं आदर्श (बेस्ट ऑलराउंडर) विद्यार्थ्याचा चषक (ट्रॉफी) निश्चित जिंकशील.’ असा शेरा अभयसाठी उत्साहवर्धक असतो. प्रत्येक कृतीतून विद्यार्थ्यांशी जवळीक व संवाद साधला पाहिजे.

श्र‘विद्यार्थ्यांचं मंत्रिमंडळ’ अनेक संस्थांतून असतं. त्यासाठी निवडणुका, प्रचार ही सारी तंत्रं राबवली जातात. यात एक शिस्तपालन, शिस्तीची अंमलबजावणी करणारी कमिटी असावी. सर्व शाखांचे नि प्रवाहांचे (स्ट्रीम्स) प्रतिनिधी या शिस्तपालन समितीवर असावेत. शिक्षकांचे प्रतिनिधी असलेच पाहिजेत. महिन्यातून एक-दोन शनिवारी या समितीच्या बैठका गंभीरपणे घ्याव्यात. शिस्तीचे नियम कमीत कमी कसे असतील नि जास्तीत जास्त शिस्त कँपसवर कशी दिसून येईल याबाबत मुख्यतः विचार करावा. शिक्षक प्रतिनिधींनी मार्गदर्शकाचं काम करावं, निर्णय विद्यार्थ्यांनाच घेऊ द्यावेत. काही विशिष्ट प्रकरणांची (स्पेसिफिक केसेस) चर्चा होऊन योग्य ती परिस्थिती येण्यासाठी पावलं उचलली जावीत. या समितीच्या सर्व बैठकांतील चर्चा ‘विद्यार्थी केंद्री(स्टुडंट सेंटर्ड)’ किंवा ‘समस्या केंद्री (प्रॉब्लेम सेंटर्ड)’ असावी केवळ ‘शिक्षा केंद्री(पनिशमेंट सेंटर्ड)’ नसावी. फार छान चर्चा होते. नवीन मुद्दे निघतात. विद्यार्थ्यातील सामंजस्य वाढते. विद्यार्थ्यांनी जर शिक्षा दिली तर कॉलेजबद्दल किंवा प्राध्यापकांबद्दल कटुता निर्माण होत नाही. एकूणच वातावरण छान बनते.

श्र शिस्त येण्यासाठी विद्यार्थ्यांना आपली शिक्षणसंस्था ‘आपली’ वाटली पाहिजे. प्रत्येकाला ती ‘माझी’ वाटली पाहिजे. ही आपलेपणाची जाणीव (सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस) दुहेरी असते. संस्थेला म्हणजे चालकांना, व्यवस्थापकांना तसंच अध्यापकवर्गालाही मुलं अगदी आतून आपली वाटली पाहिजे. आज काही अपवादात्मक संस्थांतून हा अनुभव प्रत्ययाला येतो. अशा संस्थांतले एकूणच संबंध घट्ट विणीचे व आत्मीयतेचे बनतात. अशी संस्था एखाद्या शिल्पकृतीसारखी साकारत जाते.

श्र अनेक प्रकारच्या संधी मुलांच्या विकासासाठी निर्माण केल्या जाव्यात. यासाठी पुरेसा निधी संस्थांकडे असतो. अनेक माध्यमातून तो उभारताही येतो. पण यातून विद्यार्थी व अध्यापकांमध्येही कर्तव्यपरायणता (ड्यूटी ओरिएंटेशन) निर्माण झाली पाहिजे. तशी ती होतेही. नाहीतर निव्वळ ‘हक्क-परायणता (राइट ओरिएंटेशन)’ असतेच व ती मारक ठरते.

पूर्वीच्या व्ही. शांतारामांच्या ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाचा विषय या संदर्भात महत्त्वाचा वाटतो. सहा फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना एक जेलर उघड्या जागेत मुक्त जीवनासाठी स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन जातो. कैद्यांच्या बारा हातांना त्यांना अनुकूल अशी कामं देऊन त्यांच्यावर आपल्या दोन शिस्तप्रिय डोळ्यांची नजर ठेवून अक्षरशः त्या ओसाड जागेत नंदनवन उभं करतो. आपले विद्यार्थी गुन्हेगार नसतात. त्यांना शिस्त हवी असते पण भीती व शिक्षा यावर आधारलेली नाही तर विश्‍वास व प्रेम यावर उभारलेली!

अशी शिस्त सार्‍या विश्‍वाचं घर, घराचं घरकुल, घरकुलाचं घरटं बनवते. अन् रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनचं (विश्‍वभारती विद्यापीठाचं) हेच तर घोषवाक्य होतं. ‘इथं सारं विश्‍व एक घरटं बनतं.’ बनवू या आपल्या विद्यालयाला असं उबदार घरटं! नाहीतर सध्या चाललंय ते चालूच राहील…विद्यालयातून विद्येचा लय नि विद्यापीठाच्या चक्कीतून विद्येचं पीठ! अन् विद्यार्थ्यांत फोफावणारंं बेशिस्तीचं पीक!