पणजी (प्रतिनिधी)
नगर नियोजन खात्याने इमारत आराखडा मंजुरीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीपीच्यावतीने गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडने इमारत आराखडा मंजुरी व्यवस्थापन पध्दतीची रचना, विकास, अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि देखरेख ठेवण्यासाठी संबंधितांकडून इच्छा प्रस्ताव मागविले आहेत.
नगर नियोजन विभाग, पीडीए आणि जीआयडीसीकडून विकास नियमानुसार बांधकाम परवान्यांना मान्यता दिली जाते. सध्याच्या बांधकाम आराखडे मान्यता देण्याच्या प्रक्रियेमुळे जलदगतीने कामकाज करण्यात अडचणी येतात. त्यामुळे टीसीपीने विकास नियमांसह वेब आधारित ऍप्लिकेशन बनविण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन पध्दतीमुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया कार्यक्षम आणि परिणामकारकहोणार आहे, असा दावा सरकारी सूत्रांनी केला.
या नवीन पध्दतीचा वापर टीसीपीच्या सर्व कार्यालये आणि उपकार्यालयात केला जाणार आहे. तसेच पीडीए, जीआयडीसी आणि इतर संलग्न खात्यातून केला जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
इच्छुकांकडून प्रस्ताव येत्या २३ नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ३.३० वाजेपर्यत ऑन लाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत.