नऊ रात्री आणि विजयोत्सव

0
270

ही बीजं धान्याची आणि सृजनोत्सव धरणीचा; तशीच आपल्या जगण्यात ती असावीत सद्भावनांची, सत्‌प्रवृत्तींची; आणि अनुभव यावा ‘शुद्ध बीजापोटी, तरु कोटी कोटी…’ असाच. आणि उत्सव असावेत आनंदाचे, विविध कलागुणांचे, सर्जनाचे, कृतार्थतेचे! ही नवरात्र सर्वांना हर्षदा, नवऊर्जादायी ठरो, आणि या विजयादशमीला आनंदाचे, समाधानाचे सोने भरभरून लुटता येवो, हीच शुभेच्छा!

गणपती उत्सवाची धामधूम संपली. पितृपंधरवडा उलटत आला आणि वेध लागले नवरात्रीचे… वेध लागले आणि बघता बघता, तयारीत रमता रमता नवरात्र सुरूही झाले…
आश्‍विन महिन्याची सुरुवात… पावसाळा संपत आलेला असतो, अधूनमधून हस्ताच्या सरी बरसतात… पण त्यांत आक्रमकता नसते. हिरवीगार सृष्टी मन प्रसन्न करत असते. अशावेळी शरद ऋतूचं आगमन होतं. आनंदी वातावरण आणि अनेक सण-उत्सव घेऊन येणारा ऋतू. आश्‍विन महिन्याची सुरुवात होते तीच घटस्थापनेने… शारदीय नवरात्र उत्सवाने.
घट स्थापन करून, नंदादीप प्रज्वलित करून, तो अखंड तेवत ठेवून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करायची… नवरात्रोत्सव उल्हासाने, श्रद्धेने साजरा करायचा. शक्ती/देवीच्या नऊ रूपांची पूजा या नऊ दिवसांत केली जाते. महालक्ष्मी, महासरस्वती आणि दुर्गादेवीच्या नऊ रूपांची- नवदुर्गांची पूजा, उपासना… शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपं!
दुर्गादेवीने केलेला महिषासुरवध, राम-रावण युद्ध, श्रीरामाचा विजय म्हणजे सर्व अनिष्ट वृत्ती-प्रवृत्तींचा नाश आणि सर्व मंगलमांगल्याची सुरुवात… असत्य, अधर्म यांवर सत्य, धर्म यांचा विजय. हे विजयपर्व आणि शक्तीची उपासना यासाठीच.
आदिशक्तींना मातृकाशक्ती मानून त्यांचे पूजन करण्याची आपली प्राचीन संस्कृती आहे. दुर्गा, भवानी, रेणुका, काली, अंबा, महालक्ष्मी, सरस्वती, संतोषी, महिषासुरमर्दिनी, चामुंडा, चंडिका, कालिका, एकवीरा, व्रजेश्‍वरी इ. विविध नावांनी उपासना केली जाते. देवीची विविध स्तोत्रं, विविध प्रकारच्या आरत्या, गाणी, देवीचा गोंधळ, जोगवा, घागरी फुंकणे, जागर, ललिता सहस्रनाम, दुर्गा सप्तशती, शक्तिपाठ, देवीपुराण वाचन अशा अनेक माध्यमांमधून विविध प्रकारे देवीची उपासना, आळवणी केली जाते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठं आहेत. संपूर्ण भारतातही अनेक शक्तिस्थानं आहेत.
भारतात सर्वत्र नवरात्र उत्सव वेगवेगळ्या प्रथा-परंपरांनुसार खूप धामधुमीत साजरा केला जातो. महाराष्ट्रात हादगा, भोंडला खेळला जातो. गुजरातमध्ये गर्भा-दांडिया खेळत रात्री जागवल्या जातात. बंगालमध्ये दुर्गापूजेचा महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो, तर म्हैसूरचा राजवाडा या पर्वामध्ये अप्रतिम विद्युत रोषणाईने सजवला जातो. विजयादशमीला राजेशाही मिरवणूक निघते. गोव्यामध्ये विविध मंदिरांमध्ये रोज रात्री होणारा ‘मखरोत्सव’ हा खास वैशिष्ट्यपूर्ण असतो. विदर्भात भुलाबाईची पूजा होते.
नवरात्र म्हटलं की माझ्या मनात गजर सुरू होतो- ‘चतुःश्रृंगी माता की जय! चतुःश्रृंगी माता की जय!!’ आठवू लागतात दिवस तिथल्या जत्रेचे, जत्रेतल्या गमतींचे, पहाटे पहाटे रांगेत राहून घेतलेल्या दर्शनाचे, अष्टमीला आईने खणा-नारळाने देवीच्या भरलेल्या ओटीचे, नव्या परकर-पोलक्यात रोज एकेका मैत्रिणीच्या अंगणात फेर धरून गाणी म्हणत गाजवलेल्या हादग्या-भोंडल्याचे, फस्त केलेल्या वेगवेगळ्या खिरापतींचे! घरी वाचल्या जाणार्‍या देवीपुराणाचे, दसर्‍या दिवशी घातल्या जाणार्‍या मोठ्या देवी पूजेचे, पुराणावरणाच्या नैवेद्य प्रसादाचे, जमणार्‍या सार्‍या आप्त-स्वकीयांचे…! कितीतरी… प्रत्येकाच्या मनात या उत्सवांच्या आठवणींचे धूप दरवळत असतात. उत्सव, श्रद्धा, भक्ती सर्वांचा अनोखा मेळ म्हणजे नवरात्र.
नवरात्रीतले पहिले तीन दिवस दुर्गादेवीला समर्पित असतात. पुढचे तीन दिवस लक्ष्मीदेवीला व शेवटचे तीन दिवस सरस्वतीदेवीला समर्पित असतात. दुर्गा-काली पूजा म्हणजे ऊर्जा-शक्तीरूपाची पूजा, लक्ष्मी- समृद्धी, शांती, संपन्नता यासाठीची आराधना, तर सरस्वती- कला आणि ज्ञानसाधनेची आठवणी.
नमो देव्यै महादेव्यै, शिवायै सततं नमः
नमः प्रकृत्यै भदायै नियताः प्रणताः स्मताम्‌॥
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते|
या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता
बुद्धिरुपेण संस्थिता, मातृरुपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
असे या शक्तिरूपाचे, मातृरूपाचे पूजन… या सर्व पूजनामागे आध्यात्मिक अर्थही आहे. सामाजिक, मानसिक स्वास्थ्य आणि विकास यांसाठी मार्गदर्शक असे हे तत्त्व आहे. पहिले तीन दिवस दुर्गादेवीचे आपल्या मनातले, जीवनातले, समाजातले जे जे अनिष्ट, अशिष्ट, दुष्ट त्या सर्वांचे निराकरण, निःपात, नायनाट, नाश करायचा… त्या सर्वांविरुद्ध युद्ध पुकारायचे. समर्थपणे त्यावर विजय मिळवायचा. एकदा अंतःकरण आणि वातावरण शुद्ध, स्वच्छ झाले की उषःकाल होतो.
पुढचे तीन दिवस लक्ष्मी उपासनेचे, म्हणजे जीवनात संपन्नता आणण्याचे. केवळ भौतिक दृष्टीने नव्हे, तर आंतरिक समृद्धीचे. सद्गुण, सद्वर्तन, चारित्र्यसंपन्नता यातून लाभणारे समाधान आपल्याला खर्‍या संपन्नतेकडे नेऊ शकते. एकदा आपण या उजळल्या मार्गावर मार्गस्थ झालो की पुढचे दिवस सरस्वतीदेवीची प्रसन्नता लाभण्याचे. अत्युच्च ज्ञान संपादन करण्याचे, कलागुणांचा आनंद घेण्याचे. आणि त्यानंतरची विजयादशमी. अहंकाराचा त्याग करून वेगळ्या उंचीवर पोचण्याची सुरुवात. असं हे नवरात्र पर्व स्वतःला समृद्ध करत जाण्याचंही!
नवरात्रामध्ये बालिकांचं पूजन केलं जातं, युवतीची पूजा, प्रौढ महिलेची पूजा केली जाते. या परंपरेद्वारा खरं तर एकप्रकारे आपल्या जीवनातल्या सर्व महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या स्त्रीशक्तीचा सन्मान करणे, गौरव करणे, कृतज्ञता व्यक्त करणे हे साध्य केलं जात असतं. इथे मला शांता शेळके यांच्या ‘हात’ या कवितेतल्या काही ओळी आठवतात. राबणार्‍या, आधार देणार्‍या अनेक अबोल हातांबद्दल भावना व्यक्त करताना कवयित्री म्हणते-
हात पाण्याच्या हंड्याला आधार देणारे,
थकल्या माथ्याखाली उशी होणारे,
फाटके शिवणारे, ठिगळ लावणारे,
तुळशीपुढे दिवा होऊन तेवणारे,
इथे तिथे सर्वत्र दिसणारे,
काळोखात हळूच डोळे पुसणारे,
हात असतील सासुरवाशी, माहेरवाशी,
हातांमागे उभी असेल माझीच आई, आजी,
मामी, मावशी;
परंपरेने सजीव होऊन आलेली माती
हेच हात माझ्या हाती…
इतक्या हृद्यपणे समाजातल्या प्रत्येकानं या सर्व हातांची जाण ठेवली, आदर केला तर निरामय जगण्यासाठी एक कणखर आधारभूमी प्रत्येकालाच लाभेल. प्रत्येकीमध्ये असलेला दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी, पार्वतीचा अंश, वेळोेवेळी उभारून येणारं ते ते रूप ओळखून त्याला मान दिला तर समाजजीवनही सुकर होईल.
नवरात्रीमध्ये जी घटस्थापना केली जाते, नंदादीप तेवत ठेवला जातो, बीज पेरले जाते; या सर्वांद्वारे एकप्रकारे पंचतत्त्वांचे पूजन केले जाते. या सर्व सृष्टीबद्दल, चराचर व्यापून असलेल्या पंचमहाभूतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे.
नवरात्र हा सृजनाचा उत्सव.
आधी बीज एकले
बीज अंकुरले, रोप वाढले… हा अनुभव देणारा.
ही बीजं धान्याची आणि सृजनोत्सव धरणीचा; तशीच आपल्या जगण्यात ती असावीत सद्भावनांची, सत्‌प्रवृत्तींची; आणि अनुभव यावा ‘शुद्ध बीजापोटी, तरु कोटी कोटी…’ असाच. आणि उत्सव असावेत आनंदाचे, विविध कलागुणांचे, सर्जनाचे, कृतार्थतेचे!
ही नवरात्र सर्वांना हर्षदा, नवऊर्जादायी ठरो, आणि या विजयादशमीला आनंदाचे, समाधानाचे सोने भरभरून लुटता येवो हीच शुभेच्छा!
—————————————————————————————————————————————————————————————-