प्रत्येक भूमिका मला काही तरी देऊन जाते. तसेच प्रत्येक पुरस्कारही मला वेगळे काही तशी देऊन जातो. गोव्याने दिलेला हा पुरस्कार मी विनम्रतेने स्वीकारतो असे सांगून गोवा आणि गोव्याच्या कोकणी भाषेवर आपले प्रेम आहे असे ते दिलखुलासपणे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन प्रभावळकर याना कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्ञानेश मोघे यांनी मानपत्राचे वाचन केले.
त्याआधी मराठी सिने व नाट्यसृष्टीतील तारे-तारका, दिग्दर्शक, निर्माते यांच्या मांदियाळीत दिग्गज चित्रपट निर्मात्या सई परांजपे यांच्या हस्ते मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, वीजमंत्री मिलिंद नाईक, पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर, कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर, आयोजक विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये, अभिनेते सचिन खेडेकर, चित्रपट निर्माते नितीन देसाई, उमेश कुलकर्णी, सुजय डहाके, सोनाली कुलकर्णी, डॉ. श्रीरंग गोडबोले तसेच मराठी चित्रपट क्षेत्रातील अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.
सई परांजपे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रारंभीक आपण अपराधीपणाच्या भावनेने बोलत असल्याचे सांगितले. ‘मी मराठी असूनही एकही मराठी चित्रपट बनविला नाही.’ मग मी येथे उभी का? या तोतयेपणाचा बचाव मला करायचाय. माझ्या चित्रपटांची मला जरी मराठी नसली तरी माझ्या चित्रपटांची जानकुली मराठी आहे. कथा, अंगुठा छाप, चाळ या चित्रपटांवरून हे सिध्द होते’ असे प्रतिपादन त्यांनी आपल्या छापील भाषणातून केले. अलीकडील काळात मराठी चित्रपट व्यंगचित्रपट बनले असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
‘कशाला – उद्याची बात?’, ‘दिसला ग बाई दिसला’, ढगाला लागली कळ…’ अशा ठसकेबाज मराठमोळ्या गीतांवर आधारीत झकास नृत्य सादरीकरणाने औपचारिक उद्घाटन, आधी आवश्यक वातावरण निर्मिती झाली. मात्र हा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा तासभर उशिरा सुरू झाला.
नितिन देसाई निर्मित ‘अजिंठा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने या महोत्सवाला प्रारंभ झाला. कला अकादमी, आयनॉक्स व मॅकिनेझ पॅलेस या केंद्रावर १० जूनपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.