गोवा डेअरी आवारात सत्यशोधक समितीतर्फे आमरण उपोषण

0
189

गोवा डेअरीच्या आवारात गुरुवारी सकाळपासून सत्यशोधक समितीतर्फे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. एकूण सहा मागण्यांसाठी सहा जणांनी उपोषणाला सुरुवात केलेली असून दिवसभर परिसरात वातावरण तंग बनल्याने पोलीस तसेच संयुक्त मामलेदारांनी मध्यस्थी करून स्थितीवर नियंत्रण ठेवले. संध्याकाळपर्यंत मागण्या पूर्ण करण्यात आल्या नसल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सत्यशोधक समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद सावर्डेकर, विकास प्रभू, शिवानंद बाक्रे, वैभव परब, ज्योतिबा घेवडे व प्रमोद सिधिये यांनी गोवा डेअरीच्या आवारात उपोषणाला सुरुवात केली. डेअरीच्या आवारात उपोषणाला बसण्यास व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने अधिक पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक हरीश मडकईकर व संयुक्त मामलेदार अबीर हेदे यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीवर नियंत्रण ठेवले.

संध्याकाळी गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्यासाठी १ महिना अवधी देण्याची मागणी केली. मात्र पशुखाद्यात केलेली २.५० रुपये वाढ त्वरित मागे घेण्यास नकार दिल्याने चर्चा फिसकटली. दत्तप्रसाद सावर्डेकर यांनी अधिक माहिती देताना सहा मागण्यांसाठी सहाजणांनी उपोषण सुरू केले असून मागण्या पूर्ण करण्याची लेखी हमी देईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.