कुठ्ठाळी पोटनिवडणूक
आपल्याला आधी आपल्या मतदारसंघातली कामे तसेच मतदारांची कामे पूर्ण करायची असून त्या कामाना आपण सुरुवातीपासूनच आरंभ केल्याचे श्रीमती एलिना साल्ढाना यांनी येथे सांगितले.
कुठ्ठाळीचे आमदार स्व. माथानी साल्ढाना यांच्या आकस्मिक निधनामुळे कुठ्ठाळीत परत एकदा पोट निवडणूक घेण्यात येणार असून सदर मतदारसंघात एलिना साल्ढाना यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल सकाळी त्यांनी वास्कोतल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीचा उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, वीजमंत्री मिलिंद नाईक, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, उद्योगमंत्री महादेव नाईक, माजी आमदार दामोदर नाईक, नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष (हंगामी) दाजी साळकर तसेच नगरसेवक, भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
आपला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांना सुपूर्द केल्यानंतर श्रीमती साल्ढाणा यांना गहिवरून आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी म्हटले की आपल्याला स्व. माथानींचा जाहीरनामा पूर्ण करायचा असून आपल्याला आता अधिक जोमाने काम करावे लागणार आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नांना उत्तरे दिली. मोपा विमानतळ तसेच दाबोळी विमानतळ यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की दोन्ही विमानतळ हे राहणार असून मोपा विमानतळाविषयी कॉंग्रेसने फक्त पाच वर्षे राजकारण केलेले आहे. आपण अधिक माहिती देवू शकत नसून सध्या आचारसंहिता लागलेली आहे. निवडणुकीनंतरच यावर अधिक माहिती देवू शकेन, असे ते म्हणाले.
वास्को शहरात पाण्याची तीव्र टंचाई आहे हे खरे असले तरीही इतर ठिकाणी पाण्याची सोय वेळेवर होत आहे. तरी सुद्धा या विषयावर आपण बैठक घेवून संबंधितांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तळागाळाशी संबंध असलेला उमेदवारच देऊ : देशप्रभू
दि. २ जून रोजी होण्यार्या कुठ्ठाळी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तळागाळातील लोकांशी संबंध असलेला स्थानिक उमेदवारच असेल. आज सकाळपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर होऊ शकेल, असे कॉंग्रेस प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही. यापुढे घराणेशाहीला कॉंग्रेस पक्षात स्थान नसेल, असे देशप्रभू यांनी सांगितले.
चर्चिलच्या उमेदवारीस मिकींचा विरोध
माजी साबांखामंत्री चर्चिल आलेमाव यांच्या कुठ्ठाळी मतदारसंघातील उमेदवारीस नुवेचे आमदार तथा गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा मिकी पाशेको यांनी विरोध केला आहे. तर कॉंग्रेसने कुठ्ठाळीतील उमेदवार जाहीर केल्यानंतरच आपला पक्ष कुठ्ठाळीतून निवडणूक लढविण्यासंबंधीचा निर्णय जाहीर करणार असल्याचे प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेंद्र सिरसाट यांनी सांगितले.कॉंग्रेसचा उमेदवार आज सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे.