>> राज्यपालांचा मुख्य सचिवांना आदेश
राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या ओल्ड गोवा येथील बंगल्याच्या बांधकाम प्रकरणी योग्य कारवाई करण्याचा आदेश मुख्य सचिवांना दिला आहे.
वीजमंत्री मडकईकर यांनी ओल्ड गोवा येथील संरक्षित पुरातन वास्तू असलेल्या बेसिलिका ऑफ बॉम जीजस चर्चच्या ३०० मीटर अंतराच्या आत बंगला बांधल्याची ऍड. आयरिश रॉड्रीगीस यांची तक्रार आहे. या भव्य बंगल्याची कंपाऊड भिंत ५० मीटरच्या आत असल्याचा दावा केला आहे. केंद्रीय संरक्षित पुरातन वास्तूच्या ३०० मीटरच्या आत कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले जाऊ शकत नाही. तरीही, मंत्री मडकईकर यांनी आपल्या रियल इस्टेट कंपनीतर्फे सर्वे क्रमांक १४४(१) आणि १४४(२) मध्ये बंगल्याचे बांधकाम केल्याचे आयरिश यांनी तक्रारीत म्हटले आहे.
रॉड्रगीस यांनी दि. ९ एप्रिल रोजी भारतीय पुरातत्त्व संचालकांकडे यासंबंधीची तक्रार केली आहे. या तक्रारीची प्रत पंतप्रधान कार्यालय आणि राज्यपालांना पाठविण्यात आली आहे. राज्यपालांनी या तक्रारीची दखल घेऊन मुख्य सचिवांना या प्रकरणी योग्य कारवाई करण्याची सूचना केली आहे.
पुरातत्त्व विभागाने ३ नोव्हेंबर १५ रोजी ओल्ड गोवा पोलीस स्टेशनला मडकईकर यांच्याविरोधात बेकायदा बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची सूचना केली होती. अशी माहिती रॉड्रीगीस यांनी दिली.