कैक वर्षांपूर्वी कवी बाकीबाब बोरकर लिहून गेले होते, ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती.’ गोव्यातील आपल्या निःस्पृह सामाजिक कार्याने अशाच दिव्यत्वाचे दर्शन घडविणार्या मंगलाताई वागळे यांनी काल मुंबईत देह ठेवला. पाळोळ्यात जन्मलेली आणि वयाच्या सतराव्या वर्षी लग्न होऊन गेलेली एक गृहिणी वयाच्या पन्नाशीत सामाजिक कार्यात उतरते काय आणि वयाच्या सत्तरीत ‘हमारा स्कूल’ सारख्या अनोख्या उपक्रमाद्वारे असंख्य उपेक्षित मुलांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाचा दीप प्रज्वलित करून वयाची ऐंशी वर्षे उलटून गेली तरी न डगमगता अथक प्रयत्नांती त्यांचे आयुष्य उजळवून टाकते काय… थक्क करून टाकणारा मंगलाताईंचा हा जीवनप्रवास आता थांबला आहे. ‘हमारा स्कूल’च्या आपणच लावलेल्या रोपट्याचा दिसामासाने वटवृक्ष होत असताना रोज स्वतः जातीने त्याच्या पाळा-मुळांना खतपाणी घालत आलेल्या या थोर सेवाव्रती महिलेने आपल्या जिद्दीने आणि परिश्रमाने जे सत्कार्य करून दाखवले ते भल्या भल्यांना जमले नसते. सामाजिक दातृत्वाला त्यांच्या प्रामाणिक कार्यानं साद घातली आणि बघता बघता हा वेलू विस्तारत गेला. काय गरज होती खरे तर त्यांना या लष्करच्या भाकर्या भाजण्याची? कोण्या गरिबांच्या मुलांसाठी धनवंत लोकांपुढे हात पसरवण्याची? परंतु मासळी बाजारात मासेविक्रेत्या बायका ट्रकमधून मासे चोरून पळवणार्या मुलांना मारहाण करत असल्याचे पाहून त्यांचे मन द्रवले आणि त्यातून त्या वाममार्गाला लागलेल्या मुलांना सन्मार्गावर आणण्याचा संकल्प त्यांनी आईच्या मायेने सोडला. खरे तर त्या तेव्हा बड्या बड्या पंचतारांकित हॉटेलांना मासे पुरविण्याच्या आपल्या पतीच्या व्यवसायात स्थिरावल्या होत्या. मुंबईत असताना पती निवर्तल्यानंतर त्यांचा व्यवसाय सांभाळत आपल्या मुलाच्या आग्रहावरून त्या गोव्यात परतल्या होत्या. इथल्या ‘ताज’, ‘सिदाद’, ‘मेरियॉट सारख्या बड्या हॉटेलांना आणि जुवारी सारख्या बड्या कारखान्यांच्या कँटिनना रोजची मासळी पुरवीत होत्या. पंचतारांकित संस्कृतीत जीवन घालवणे त्यांना सहज शक्य होते. परंतु त्यांचे मातेचे ह्रदय त्या कोवळ्या मुलांना अमानुष मारहाण होताना पाहून द्रवले आणि त्या त्यांची आई बनल्या. पणजीच्या मासळी मार्केटच्या त्या गलीच्छ वातावरणातला एक कोपरा निवडून त्यांनी त्या मुलांना स्वखर्चाने पाट्या पेन्सिली देऊन शिकवायला सुरवात केली. हेही दिसते तेवढे सोपे नव्हतेच. त्या मुलांच्या आया म्हणायच्या, यांना कशाला शिकवता? त्याने काय होणार? परंतु शिक्षणाचे महत्त्व मंगलाताईंना पुरेपूर माहीत होते. ज्यांनी ज्यांनी शिक्षणाचा दीप लावला, त्याचे आयुष्य उजळल्यावाचून राहात नाही हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे या वंचितांच्या, उपेक्षितांच्या रिकामटेकड्या फिरणार्या, वांडपणा करणार्या मुलांना सन्मार्गावर आणण्यासाठी त्यांनी ही अनौपचारिक शाळा उभी केली. मुलांनीच तिला नाव दिले, ‘हमारा स्कूल!’ सुरवातीला मुले घाणेरड्या वेशात असायची. मग स्वतःच्या हाताने आंघोळ घालून, स्वच्छतेचे धडे देणे आले. मुलांना आणि आईवडिलांना त्यांची जन्मतारीख ठाऊक नसायची. मग प्रतिज्ञापत्रे करून अंदाजाने जन्मतारखा तयार कराव्या लागल्या. केवळ मुलांना येथे शिकवणे पुरेसे नव्हते. ती उपाशीपोटी कशी शिकली असती? त्यांच्या आहाराचा प्रश्न होता. मग त्यावर त्यांनी शक्कल लढवली. पाच कडधान्ये दळून त्यांचा बनवलेला लाडू, कपभर दूध आणि एक केळे या मुलांना मिळू लागले. चांगल्या कामाला पैसा कधी कमी पडत नसतो. पैसे कुठून कुठून येत राहिले. निधी उभा राहात राहिला. ही मुले शाळेतून परत घरी गेल्यावर वेगळ्या संस्कृतीत वाढतील या भीतीने मग या मुलांच्या निवासाची व्यवस्था करावी लागली. त्यांना जेवण देण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे मंगलाताईंच्या मैत्रिणी पुढे आल्या. बघता बघता अनेक हात त्यांना येऊन मिळाले. कोणी त्या मुलांना शैक्षणिक साहित्य घेऊन आले, कोणी शिकवायला आले, कोणी स्वयंसेवक म्हणून आले, कोणी दाते म्हणून आले, सरकारने जुन्या गोमेकॉ इमारतीत थोडी जागा दिली. पुढे ‘इफ्फी’ अवतरताच सांतिनेजला प्रशस्त जागेत स्थलांतर झाले. बघता बघता हमारा स्कूलचे रोपटे वाढत, विस्तारत गेले आहे. मंगलाताईंच्या समर्पित आणि प्रसिद्धी पराङ्मुख कार्याची साक्ष देत आपल्यापुढे उभे आहे. किती मुलांचे आयुष्य या उपक्रमाने आजवर उभे केले असेल! इथे शिकलेली मुले दहावी – बारावीच्या परीक्षांत यश मिळवीत असतात. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेत असतात. आपल्या आयुष्यात जिद्दीने उभी राहात असतात. आता त्यांच्या ‘बडी टीचर’ मंगलाताई नाहीत. मंगलाताईंच्या त्या सात्विक चेहर्यावरचे प्रसन्न स्मितहास्य यापुढे दिसणार नाही. पण हमारा स्कूलमधून आपल्या पायावर उभ्या राहणार्या मुलांच्या चेहर्यावर मात्र हास्य उमटत राहील. त्यांच्या सत्कार्याची आठवण करून देत राहील!