मंगलाताई वागळे ः एक दीपस्तंभ

0
149
  • अनुराधा गानू

गोव्यातील ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती मंगला वागळे यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. अ. भा. महिला परिषद, कस्तुरबा ट्रस्ट आणि ‘हमारा स्कूल’च्या माध्यमातून त्यांनी निस्पृह सामाजिक कार्याचा आदर्श गोव्यापुढे उभा केला होता. त्यांना नवप्रभेची ही विनम्र श्रद्धांजली –

काणकोणचं गायतोंडे घराणं. देशभक्ती आणि समाज कार्याचं लेणं ल्यायलेलं. अशा घरांत जन्माला आलेल्या मंगलाताईंनी वेगळं काही केलं नसतं तरच नवल! देशभक्ती आणि समाजकार्याचं बाळकडू पिऊनच मोठ्या झालेल्या मंगलाताई. समाजासाठी त्यांनी दिलेलं योगदान खूप मोठं आहे.

समाजातील गरीब महिलांसाठी काहीतरी करायचं हे उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यांसमोर होतंच. त्यामुळे काही वर्षे त्यांनी अखिल भारतीय महिला परिषद गोवा शाखेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. तेथे त्यांनी महिलांसाठी ‘घरकान्न’ विभाग सुरू केला. महिलांनी खाद्यपदार्थ तयार करायचे आणि परिषदेने त्याची विक्री व्यवस्था करायची. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी हा उपक्रम होता आणि आजही तो चालूच आहे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी परिषदेतर्फे बालवाडी सुरू केली आणि कर्मचारी महिलांसाठी वसतीगृहही सुरू केले.

त्या अध्यक्ष असताना कस्तुरबा गांधी मेमोरिअल ट्रस्टच्या एक विश्वस्त श्रीमती शोभनाताई रानडे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी मंगलाताईंकडे कस्तुरबा मेमोरिअल ट्रस्टची एक शाखा गोव्यात काढावी आणि त्याची जबाबदारी मंगलाताईंनी घ्यावी असा प्रस्ताव मांडला. कोणत्याही समाजोपयोगी कामासाठी नाही म्हणणं हे मंगलाताईंच्या स्वभावात बसणारं नव्हतं. त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला, कारण हा ट्रस्ट महिलांचं शिक्षण, त्यांचा विकास आणि महिला सबलीकरण यासाठी काम करणारा होता. शिवाय या ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व मागासवर्गीय मुलांसाठी काम करणं शक्य होणार होतं.
त्याप्रमाणे १९९० साली पाळोळे-काणकोण येथे कस्तुरबा मेमोरिअल ट्रस्टची गोवा शाखा उघडली गेली.

गावडोंगरी-काणकोण येथील महिलांना त्यांच्या शेतातील माल विकण्यासाठी या ट्रस्टतर्फे मदतीचा हात दिला गेला. त्याशिवाय तेथील महिलांनी औद्योगिक वसाहतीत कँटीन चालवण्याचं काम सुरू केलं. महिला सशक्तीकरणाच्या वाटेवर टाकलेलं ते पहिलं पाऊल होतं. ५ वर्षेपर्यंत हे कँटीन चाललं. नंतर मंगलाताई पणजी येथे वास्तव्यास आल्या आणि इतर काही अडचणींमुळे हे काम बंद करावं लागलं. त्यानंतर मंगलाताईंनी आपलं लक्ष ‘हमारा स्कूल’कडे वळवलं.

सुरुवातीला मंगलाताईंचा हॉटेलांना मासे पुरवण्याचा व्यवसाय होता. मासे आणि भाजी विकणार्‍या बायकांची मुलं तिथेच मासळीच्या ट्रकच्या अवतीभवती असायची. एकदा एका मुलाला त्यांनी ट्रकमधून मासे चोरताना बघितलं आणि त्या मुलाने ते परस्पर विकूनही टाकले. मग त्या मासेविक्रेत्या बायकांनी त्याला मारलं. खरं म्हणजे याच घटनेनं ‘हमारा स्कूल’चं मूळ धरलं. मंगलाताईंना वाटलं, पोटाची भूक आणि परिस्थितीच माणसाला अशा वाकड्या वाटेवर आणते. मग अशा मुलांसाठी काय करता येईल हे विचारचक्र त्यांच्या मनात सुरू झालं. ही मुलं अशिक्षित असतात. त्यांच्या विचारांना दिशा नसते. त्यासाठी त्यांच्या मनात पहिला विचार आला की, या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मूलभूत गरजा भागवणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं, कारण माणूस सबंध जन्म पोटासाठी धडपडत असतो. मग जर त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवल्या गेल्या तर माणूस वाईट मार्गाकडे का वळेल??
मग शिक्षण ही त्याची पहिली पायरी आहे. तिथपासून सुरवात करायचं त्यांनी ठरवलं. मग स्वखर्चाने त्यांनी पाट्या आणल्या, पेन्सिली आणल्या, पुस्तकं आणली आणि त्याच बाजारात एका कोपर्‍यात पाच मुलांना शिकवायला सुरुवात केली. या मुलांना शिकताना बघितल्यावर आणखी काही मुलांची उत्सुकता वाढली. आणखी काही मुलं त्यांच्याबरोबर शिकण्यासाठी पुढे आली. पण बाजारासारख्या ठिकाणी शिकत असताना मुलांचं लक्ष फार ठिकाणी विचलीत होत होतं, हे लक्षांत आल्यावर त्यांनी सरकारी अधिकार्‍यांकडे शिकवण्यापुरती जागा मिळावी म्हणून विचारणा केली. पण सहानुभूतीशिवाय त्यांना काहीच मिळालं नाही.

मग त्यांनी कांपालच्या बागेमध्ये शिकवणी सुरू केली. पण पावसाळ्यात पुन्हा प्रश्न आला. पण या अडचणींमुळे मंगलाताई खचल्या नाहीत. त्यांनी भाड्याच्या एका फ्लॅटमध्ये हे कामच सुरू ठेवलं आणि २-३ वर्षांनंतर गोवा सरकारने त्यांना तात्पुरती जागा दिली आणि खर्‍या अर्थाने हमारा स्कूल सुरू झालं. ‘हमारा स्कूल’ हे नाव त्या मुलांनीच सुचवलं.

त्यानंतर कचरा गोळा करणारी, झोपडपट्टीत, अतिशय घाणेरड्या वातावरणात राहणारी किंवा रस्त्याच्या कडेलाच स्थिरावलेली, अतिशय दरिद्री अवस्थेत राहणारी मुलं, त्यांच्यासाठी बेतीच्या एका झोपडपट्टीतच एक शाळा सुरू केली. हमारा स्कूलमध्ये पदार्थ बनवायचे आणि त्या शाळेतील मुलांना खाऊ घालायला सुरुवात केली. गरिबीमुळे या मुलांना पोटभर जेवणच मिळत नव्हतं. तिथे सकस आहाराची गोष्ट दूरच राहिली, पण एका आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पाच धान्यांचे पौष्टीक लाडू बनवून त्या मुलांना द्यायला सुरुवात केली आणि अशा तर्‍हेने सुरुवातीला हे डे केअर सेंटर सुरू झालं. मुलं दिवसभर त्यांच्याकडे राहायची, शिकायची आणि संध्याकाळी परत आपल्या घरी जायची. हमारा स्कूलमध्ये दिवसभर त्यांच्यावर केलेले संस्कार परत ती आपल्या वस्तीत गेली की ते सगळे पुसले जायची भीती होती. हे बरोबर नाही हे लक्षात आल्यावर मंगलाताईंनी त्यांना निवारा दिला. सकस आहार दिला.

शिक्षणाची दारे उघडी केली. गणवेषही दिला आणि त्यांना स्वतःची अशी एक ओळख दिली… जेणे करून पुढे जाऊन ते सक्षम नागरिक बनतील. आपलं आयुष्य सन्मानानं जगू शकतील. इतक्या वर्षांनी म्हणजे आता आता ऑगस्ट २०१६ मध्ये गोवा सरकारच्या महिला व बाल विकास ‘ज्युव्हेनाइल जस्टिस (केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड) ऍक्ट २०१५ आणि गोवा ज्युव्हेनाइल जस्टिस (केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड) रूल्स २०१३’च्या नियमांतर्गत हमारा स्कूलला रजिस्ट्रेशन मिळालं आहे आणि त्यांना देणगी देणार्‍यांना ८० जीच्या कलमाखाली आयकर सूट मिळू शकते. गोवा चिल्ड्रन ऍक्ट २००३ च्या नियमाप्रमाणे एका फ्लॅटमध्ये एवढी मुलं राहू शकत नाहीत. त्यामुळे राहणार्‍या मुलांची संख्या कमी करावी लागली. सध्या १० मुलं आणि १० मुली तेथे राहतात. त्यांचं जेवणखाणं, कपडे, आरोग्य तपासणी, शाळेच्या गरजा या सगळ्याची व्यवस्था हमारा स्कूलतर्फे केली जाते. यामध्ये सर्व प्रकारची मुलं आहेत. काही मुलं अनाथ आहेत, काही एकल पालक असलेली आहेत. काहींचे पालक व्यसनात बुडालेले आहेत. काहींचे पालक रस्त्याच्याच कडेला राहतात आणि जबरदस्तीमुळे भीक मागतात. काही मुलं अभागी आहेत, जी कधीही वाईट मार्गाला लागू शकतात. अशा मुलांना सांभाळणं सोपी गोष्ट नाही. या सगळ्यांना समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार देण्याचं काम प्रतिका मुळगावकर या करीत आहेत. त्यांच्या पालकांमध्येही जागृती निर्माण करीत आहे. त्याशिवाय ३५ मुलं डे केअर सेंटरमध्ये आहेत. त्यांनाही जेवणखाण, कपडे, शैक्षणिक गरजा, आरोग्य तपासणी या सुविधा पुरवल्या जातात. या सगळ्याची व्यवस्था प्रियांका नागवेकर अतिशय उत्तम तर्‍हेने ठेवत आहे.

ही सगळी मुलं अभ्यासाबरोबर इतर विषयातही भाग घेतात. २०१४-१५ या वर्षी ३ मुलं बारावीच्या परीक्षेला बसली होती आणि फर्स्टक्लासमध्ये पास झाली. १० वीच्या परिक्षेला ५ मुलं बसली होती. सगळी मुलं पास झाली. एकाने तर ८६% गुण मिळवले. एक मुलगा बी.बी.ए.-मरीन करतो आहे. तिघंजण कॉमर्स विषयात करिअर करताहेत तर एकाने नर्सिंग कोर्स केलाय आणि तो स्वतंत्रपणे काम करतोय. एक मुलगी गोवा फूटबॉल टीममध्ये आहे तर एका मुलीची निवड गोवा क्रिकेट टीमसाठी झाली आहे. एक सहावीमधील मुलगी संस्कृतमध्ये शाळेत पहिली आलीय. निश्चितच ही सगळी मुलं कौतुकास पात्र आहेत.

प्रत्येक मुलाला एक दैवी देणगी मिळालेली असते. फक्त ती ओळखून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करून योग्य वाटेवर आणलं पाहिजे आणि ते काम मंगलाताईंच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती स्वाती शिरोडकर, खैरू खंवटे आणि श्रीमती नेहा खंवटे काम करीत आहेत. रुपाली चव्हाण आणि रोझी डिसौझा त्या मुलांना रात्रंदिवस सांभाळतात. मंगलाताईंच्या हाताला त्यांच्या या सगळ्या टीमचे हात मिळालेले आहेत. ही सगळी मुलं झोपडपट्टीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांना या देशाचे चांगले सक्षम नागरिक बनायचं आहे. सन्मानाने जगायचं आहे. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंगलाताईंचे प्रयत्न वयाची ऐंशी वर्षें ओलांडल्यावरही अविरत चालू होते. आज अखेर त्यांचा श्वास थांबला आहे. त्यांच्या कर्तृत्वाला खरोखर तोड नाही.

असे सुरू झाले हमारा स्कूल…
मंगलाताई वागळे यांचा मोठ्या मोठ्या हॉटेलांना मासे पुरवण्याचा व्यवसाय होता. मासे आणि भाजी विकणार्‍या बायकांची मुलं तिथेच ट्रकच्या अवती भोवती असायची. एकदा एका मुलाला त्यांनी ट्रकमधून मासे चोरताना बघितलं आणि त्या मुलानं ते परस्पर विकूनही टाकले. मग त्या इतर मासेवाल्या बायकांनी त्याला खूप मारलं. याच घटनेनं ‘हमारा स्कूल’च्या कल्पनेचं त्यांच्या मनात मूळ धरलं. मंगलाताईंना वाटलं, पोटाची भूक आणि परिस्थितीच माणसांना अशा वाकड्या वाटेवर आणते. ही मुलं तर अशिक्षित असतात. त्यांना विचाराची दिशा नसते. माणूस सबंध जन्म पोटासाठी धडपडत असतो. मग जर त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मूलभूत गरजा जर भागवल्या गेल्या तर माणूस का वाईट मार्गाकडे वळेल? मग शिक्षण ही त्याची पहिली पायरी आहे. तिथपासून सुरवात करायचं त्यांनी ठरवलं.

वतःच्या खर्चाने त्यांनी पाट्या, पेन्सिली आणल्या, वह्या, पुस्तकं आणली आणि त्याच बाजाराच्या एका कोपर्‍यात ५ मुलांना शिकवायला सुरवात केली. या मुलांना शिकताना बघितल्यावर आणखीही काही मुलं त्यांच्याबरोबर शिकू लागली. पण बाजारात शिकताना मुलांचं लक्ष विचलीत होतं हे लक्षात आल्यावर त्यांनी जागा बदलली. २-३ वर्षांनंतर सरकारने त्यांना तात्पुरती जागा दिली हेच ते ‘हमारा स्कूल’. हे नावही मुलानीच सुचवले.

त्यानंतर कचरा गोळा करणारी, अतिशय घाणेरड्या वातावरणात झोपडपट्टीत राहणारी किंवा रस्त्याच्या कडेला स्थिरावलेली, अतिशय दरिद्री अवस्थेत राहणारी मुलं, त्यांच्यासाठी बेतीच्या एका झोपडपट्टीतच एक शाळा सुरू केली व त्या मुलांना सकस आहार द्यायला सुरवात केली. अशा तर्‍हेने सुरवातीला हे ‘डे केअर सेंटर’ सुरू झालं. परत मुलं संध्याकाळी घरी गेल्यावर इथे केलेले संस्कार पुसले जायची भीती होती. त्यामुळे मंगलाताईंनी त्या मुलांना निवारा दिला. सकस आहार दिला. शिक्षणाची दारे उघडी करून दिली. गणवेशही दिला आणि त्यांना स्वतःची अशी एक ओळख दिली. जेणेकरून पुढे जाऊन ते सक्षम नागरिक बनतील आणि आपलं आयुष्य सन्मानाने जगू शकतील.