
>> हॉकी ः उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी लढत
अंतिम दोन मिनिटांत वरुण आणि मनदीप सिंह यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर २१व्या राष्ट्रकुल खेळांतील हॉकी स्पर्धेत काल भारताने इंग्लंडवर ४-३ असा रोमहर्षक विजय मिळवित ‘ब’ गटात अव्वल स्थान प्राप्त केले. आता उपांत्य फेरीत भारताची लढत ‘अ’ गटात दुसर्या स्थानी राहिलेल्या न्यूझीलंड संघाशी तर इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.
काल बुधवारी खेळविण्यात आलेला हा ब गटातील शेवटचा साखळी सामना अटीतटीचा झाला. पहिल्या क्वॉर्टरमध्ये ६व्या मिनिटाला गोलरक्षक श्रीजेशने इंग्लंडचा गोल करण्याचा प्रयत्न उधळून लावला. परंतु १७व्या मिनिटाला डेव्हिड कोनडोनने गोल नोंदवित इंग्लंडचे खाते खोलले (०-१). तिसर्या क्वॉर्टरमध्ये ३३व्या मिनिटाला मनदीप सिंहने गोल नोंदवित भारतीय संघाला १-१ अशा बरोबरीवर आणले.
चौथ्या क्वॉर्टरमध्ये जोरदार संघर्ष पहायला मिळाला. भारताला ५१व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा पुरेपुर लाभ उठवित रुपिंदर पाल सिंगने भारताला २-१ अशा आघाडीवर नेले. परंतु त्यांचा आनंद काही क्षणांपुरतीच टिकला. कारण लगेच पुढच्याच मिनिटाला लियाम अँसेलने इंग्लंडला २-२ अशी बरोबरी साधून दिली. ५६व्या मिनिटाला इंग्लंडला आणखी एक पेनाल्टी कॉर्नर मिळाला. त्यात सॅम वार्डने गोल नोंदवित इंग्लंडची आघाडी २-३ अशी केली. पराभवाकडे वाटचाल करीत असलेल्या भारतीय संघाला ५८व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाला आणि वरुणने त्याचे गोलमध्ये रुपांतर करीत भारतीय संघाला पुन्हा ३-३ अशा बरोबरीवर नेले. तर लगेच ५९व्या मिनिटाला मनदीप सिंहने शानदार मैदानी गोल नोंदवित भारताचा ४-३ असा विजय साकारला.