श्रेयसी सिंहला सुवर्णपदक

0
95
India's Shreyasi Singh celebrates during the medal ceremony for the women's double trap during the 2018 Gold Coast Commonwealth Games at the Belmont Shooting Complex in Brisbane on April 11, 2018. / AFP PHOTO / Patrick HAMILTON

राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या डबल ट्रॅप नेमबाजीत भारताची नेमबाज श्रेयसी सिंगने सुवर्ण पदक जिंकले आहे. श्रेयसीने अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या एम्मा कॉक्सला पराभूत करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. श्रेयसीच्या कारकिर्दीतील ही तिची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. श्रेयसी सिंहने ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. त्याच वर्षी तिने इंचियोन आशियाई स्पर्धेत डबल ट्रॅपमध्ये कास्यपदकाची कमाई केली होती.

२६ वर्षीय श्रेयसीने २४, २५, २२ व २५ गुण घेत एकूण गुणसंख्या ९६ केली. एम्माने २३, २८, २७ अशी जोरदार सुरुवात करत सुवर्णपदकाच्या दिशेने मार्गक्रमण केले होते. परंतु, शेवटच्या प्रयत्नात केवळ १८ गुण घेता आल्याने तिचा स्वप्नभंग झाला. यानंतरही तिने ९६ गुणांसह श्रेयसीची बरोबरी साधत आशा कायम ठेवली. श्रेयसीने यानंतर शूटआऊटमध्ये दोन्ही लक्ष्यांचा अचूक वेध घेतला तर एम्माचा एक नेम चूकला. लिंडा पियर्सनने ८७ गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली. ८६ गुण घेतलेल्या वर्षा वर्मनला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या ५० मीटर पिस्तोल प्रकारात ओम मिथरवाल याने कांस्यपदक कमावले. पात्रता फेरीत ओम ५४९ गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहिला होता. पात्रता फेरीत सहाव्या स्थानी राहिलेला जीतू राय १०५ गुणांसह शेवटच्या स्थानी राहिला. २०१.१ गुण घेत ओमने कांस्यपदक मिळविले. बांगलादेशचा शकिल अहमद २२०.५ गुणांसह दुसर्‍या स्थानी राहिला. २२७.२ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा डेनियल रेपाचोली पहिला आला. पुरुषांच्या डबल ट्रॅप अंतिम फेरीत अंकुर मित्तल ५३ गुण मिळवून तिसर्‍या क्रमांकावर राहिला. भारताच्याच अशब मोहम्मदला चौथे स्थान लाभले.