माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव कॉंग्रेसचा त्याग करून युगोडेपा पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काल युगोडेपाचे उपाध्यक्ष राधाराव ग्राशियस यांच्यासमवेत त्यांनी मोपा विमानतळाला विरोध करण्यासाठी आणि माध्यम प्रश्नावर सरकारच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी एक संयुक्त पत्रकार परिषदही घेतली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चर्चिल आलेमाव यांच्या ‘फॅमिली राज’ मुळे कॉंग्रेसचा समूळ पराभव झाला असा निष्कर्ष पक्षाच्या काही नेत्यांनी काढला असल्याने चर्चिल नाराज आहेत. पक्ष श्रेष्ठींकडे आलेमाव यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी कागाळ्या केल्या आहेत. त्यामुळे आपण ज्या पक्षातून राजकारणात आलो, त्या युगोडेपा पक्षात परत जाणेच आता या परिस्थितीत योग्य आहे, असे अनौपचारिकरीत्या बोलताना चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.
कुठ्ठाळीतील पोटनिवडणुकीत भाजपच्या संभाव्य उमेदवार एलिना साल्ढाणा यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासंबंधी आपला कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, असे चर्चिल म्हणत असले तरी त्यांना सर्वपक्षीय उमेदवार म्हणून एलिना यांच्या विरोधात उभे करण्याचा घाट युगोडेपाच्या नेतृत्वाने घातला आहे. चर्चिल यांचे नाव सर्वपक्षीय उमेदवार म्हणून पुढे करून एलिना यांच्याविरोधात आव्हान उभे करण्याचा प्रयत्न युगोडेपा करू पाहात आहे. त्यासाठी मोपा विमानतळ व माध्यम प्रश्न हे विषय पुढे केले जाणार आहेत.