कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष निवड आठवडाभरात : चेल्लाकुमार

0
97

नव्या प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षाचे नाव आठवडाभरात निश्‍चित करण्यात येणार असल्याचे कॉंग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी काल स्पष्ट केले. त्यासाठीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झालेली असून दोन-चार नावे चर्चेत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे त्या पदासाठी इच्छुक आहेत. काल त्यांना त्यासंबंधी छेडले असता आपण गोवा प्रदेश अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. संधी देण्यात आली तर आपण आतापर्यंतच्या सर्व प्रदेशाध्यक्षांपेक्षा चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. सध्या गोव्यात कॉंग्रेस पक्षाची रयाच गेलेली असून पक्षाचा सुवर्णकाळ पुन्हा येण्याची गरज आहे. तसे करायचे झाल्यास पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे नव्या जोमाने कामाला लागतील. यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे रेजिनाल्ड म्हणाले. मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाला पक्षाकडे आकर्षित करावे लागेल, ते म्हणाले.

गिरीश चोडणकर शर्यतीत
दरम्यान, अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव असलेल्या गिरीष चोडणकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. ते कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अगदी मर्जीतील असे एक नेते असल्याने प्रदेश अध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता आहे.

दिगंबर कामतही स्पर्धेत
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी मडगावचे आमदार व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिगंबर कामत यांचेही नाव चर्चेत आहे. कामत यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या वाढदिनी बोलताना आपण आता राजकारणात कधी नव्हे एवढा सक्रीय होणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, एक-दोन वर्षांपूर्वी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले एक नेते ऍड. यतीश नाईक हेही अध्यक्षपदासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, त्यांच्या नावाला काही नेत्यांचा विरोध आहे.