गोव्याला मोप विमानतळाबरोबरच दाबोळी विमानतळही हवा आहे. आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी मोप विमानतळ आवश्यक असून या महत्वाच्या प्रकल्पाला कोणीही विरोध करू नये, असे आवाहन वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.
‘मोप’ विमानतळामुळे गोव्यातील पर्यटनाला अधिक वाव मिळेल, तसेच पायाभूत सुविधाही निर्माण होतील याची विरोध करणार्यांनी नोंद घ्यावी, असे ढवळीकर म्हणाले. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पर्यटकांना मुंबईत जावे लागते. मोप पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांनाच नव्हे तर स्थानिकांनाही विदेशात जाण्यासाठी मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही, महाराष्ट्रातील लोकही विदेशी दौर्यासाठी गोव्यात येतील. खरे म्हणजे याचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे, असे ढवळीकर यांनी सांगितले. तीन वर्षांच्या काळात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारला वेळ देण्याची विनंती ढवळीकर यांनी केली आहे. दरम्यान, मगो नेही युगोडेपाच्या मोप विरोधी धोरणास हरकत घेतली आहे. मगोला मोप व दाबोळी हे दोन्ही विमानतळ हवे आहेत, असे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.