बोफोर्स प्रकरणाला पंचवीस वर्षे उलटून गेली, तरी त्याचे भूत काही भारतीय राजकारण्यांची पाठ सोडायला तयार नाही. स्टेन लिंडस्टॉर्म यांच्या ताज्या खुलाशामुळे आता पुन्हा नव्याने वादळ उठले आहे. काल राज्यसभेत विरोधकांनी या विषयावरून रान पेटवले. राजीव गांधी यांना बोफोर्स प्रकरणात प्रत्यक्ष दलाली मिळालेली नसली, तरी त्यांनी क्वात्रोची यांची पाठराखण चालवली होती असे लिंडस्टॉर्म यांनी आता उघड केले आहे. ‘हिंदू’च्या ज्या चित्रा सुब्रह्मण्यम यांनी ज्या काळात भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये शोध पत्रकारितेने बाळसेही धरले नव्हते तेव्हा बोफोर्स घोटाळा अक्षरशः खणून काढला, त्यांचा प्रमुख माहिती स्त्रोत हे लिंडस्टॉर्मच होते. याच लिंडस्टॉर्मनी सुब्रह्मण्यम यांना गोपनीय कागदपत्रे पुरवली होती. त्यामुळे या सार्या प्रकरणात लिंडस्टॉर्म हे महत्त्वाचे पात्र ठरते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांकडे गांभीर्यानेच पाहावे लागते. बोफोर्स प्रकरणी भारतीय राजकारण्यांना दलाली गेल्याचा गौप्यस्फोट जेव्हा एप्रिल ८७ मध्ये स्वीडिश रेडिओने केला तेव्हापासून आजतागायत या प्रकरणातील सत्य पूर्णांशाने भारतीय जनतेसमोर आलेले आहे असे कदापिही म्हणता येत नाही.
या प्रकरणातील महत्त्वाचे दुवे असलेली एकेक पात्रे एक तर काळाच्या पडद्याआड गेली, किंवा देश सोडून परागंदा झाली. ज्या विन छड्डांचे नाव मध्यंतरी घेतले गेले, ते देवाघरी गेले. ज्यांच्यावर दलाली घेतल्याचा आरोप झाला त्या राजीव गांधी यांची हत्या झाली. ज्याला मध्यस्थ म्हणून या होवित्झर तोफांच्या व्यवहारात दलाली मिळाली, त्या ओट्टावियो क्वात्रोचीपर्यंत भारतीय कायदेकानूनाचे हात कधी पोहोचलेच नाहीत. त्याने त्याच्या एई सर्व्हिसेसतर्फे दलाली घेतल्याचे सिद्ध होऊनही क्वात्रोचीचे कोणी काहीही वाकडे करू शकला नाही. यामागे कोण होते त्याकडे आता लिंडस्टॉर्म यांचे वक्तव्य अंगुलीनिर्देश करते आहे. क्वात्रोचीला २००० साली अटक झाली होती. २००७ साली अर्जेंटिनात त्याला पुन्हा अटक झाली. पण त्याच्या भारतातील हस्तांतरणाचे प्रामाणिक प्रयत्न झालेच नाहीत. उलट २००९ साली केंद्र सरकारने क्वात्रोचीवरील खटलाच मागे घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. गेल्या वर्षी आयकर लवादाने क्वात्रोचीने ४० कोटींच्या दलालीवर आयकर भरला नसल्याचा स्पष्ट निवाडा दिलेला असतानाही केंद्र सरकारने सीबीआयच्या माध्यमातून आपले हात आखडते घेतले. क्वात्रोचीची अशी पाठराखण का झाली याचे उत्तर मिळणे हा भारतीय जनतेचा हक्क आहे. एकीकडे क्वात्रोचीला अभयदान मिळाले, तर दुसरीकडे बिग बी अमिताभ बच्चन आणि त्याचा भाऊ अजिताभ यांचे नाव या प्रकरणात हेतुतः गोवून तपासाची दिशा दुसरीकडेच वळवण्याचाही प्रयत्न झाला. लिंडस्टॉर्म यांच्या ताज्या खुलाशामुळे बच्चन यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता आणि स्वीडिश वृत्तपत्रामध्ये त्यांचे नाव भारतीय तपासयंत्रणांनीच पेरले हेही स्पष्ट झाले आहे. अर्थात, गेल्या पंचवीस वर्षात बच्चन कुटुंबाला या प्रकरणातून किती मनस्ताप झाला हे तेच जाणोत. वृत्तपत्रांत सातत्याने येणार्या बातम्या पाहून आपल्या वडिलांनी एकदा आपल्याला खरेच दलाली मिळाली का असे विचारले होते. ते हयात असतानाच हा खुलासा झाला असता तर किती बरे झाले असते, असे अमिताभ आता म्हणाले ते खरेच आहे. राजकारण्यांचा वरदहस्त लाभला तर सर्व करून नामानिराळे राहता येते आणि राजकारण्यांची अवकृपा झाली तर काही न करताही माथी कलंक सोसावा लागतो याचे हे जळजळीत उदाहरण आहे. बोफोर्सचे भूत आता उकरले तरी त्यातून हाती फारसे काही लागणार नाही. बोफोर्स घोटाळा होता ६४ कोटींचा. आज आपण एक लाख श्याहात्तर कोटींच्या घोटाळ्यांना सरावलो आहोत. दलाली उकळलेल्यांनी त्या पैशावर गेल्या पंचवीस वर्षांत चैन केली असेल. ज्या राजकारण्यांनी क्वात्रोचीची पाठराखण केली, ते तर आज हयातही नाहीत. फक्त एकच होईल, ते म्हणजे बोफोर्स प्रकरणात सत्य काय हे मात्र जनतेपुढे येईल. आजवर ज्या बोफोर्सच्या नावे हजारो कथा – दंतकथा प्रसृत होत राहिल्या, किस्से, चुटके प्रचलित झाले, त्या भारतीय राजकारणाला हादरवून सोडणार्या प्रकरणात काय घडले हा इतिहास नव्या पिढीला ज्ञात होईल, जे आजवर दडवले गेले ते उघड होईल एवढेच!