ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणार्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारत पुरुषांच्या ६४ किलो व ८१ किलो वजनीगटात एकही बॉक्सिंगपटू उतरवणार नाही. सहबागी खेळाडूंची नावे देण्यासाठी ५ मार्च ही अंतिम तारीख असून या महिन्याच्या अखेरीस संघ जाहीर केला जाणार आहे. पदकांची शक्यता नसल्याने महिलांच्या ५७ किलो व ७५ किलो गटातही खेळाडू न उतरवण्याचे भारतीय बॉक्सिंग महासंघाने निश्चित केले आहे. यामुळे पुरुषांच्या ८ वजनी गटात (४९ किलो, ५२ किलो, ५६ किलो, ६० किलो, ६९ किलो, ७५ किलो, ९१ किलो व ९१ किलोंवरील) व महिलांच्या चार वजनी गटासाठी (४८ किलो, ५१ किलो, ६० किलो व ६९ किलो) खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
४ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत सदर स्पर्धा होणार आहे. ६४ व ८१ किलो गटात खेळाडू न पाठविण्याचा निर्णय अपेक्षित होता. परंतु, महिलांच्या ५७ किलो गटाला वगळण्याचा निर्णय अचंबित करणारा ठरला आहे. सोनिया लाठर ही या वजनी गटात खेळत असून याच वजनी गटात तिने वर्ल्ड व आशियाई रौप्यपदक जिंकले आहे. मागील महिन्यात झालेल्या इंडिया ओपन तसेच सध्या सुरु असलेल्या स्टँडजा इम्पिरियल स्पर्धेत तिचे आव्हान लवकर संपुष्टात आल्याने तिचा वर्तमान फॉर्म पाहता महासंघाने निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बॉक्सिंग प्रकारात भारतीय संघ १२ व्या स्थानावर आहे. बॉक्सिंगमध्ये भारताने आत्तापर्यंत ५ सुवर्ण, ९ रौप्य व १४ कांस्यपदके जिंकली आहेत. २००२ साली मोहम्मद अली कमार याने या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण जिंकून दिले होते.