वनडेत विराट, बुमराह आणि भारत अव्वल

0
184

>> अफगाणिस्तानचा रशीद खान सर्वांत युवा नंबर १

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने फलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक मिळविला. अफगाणिस्तानचा लेगब्रेक गोलंदाज रशीद खान याने १९ वर्षे व १५३ दिवस वय असताना पुरुष क्रिकेट क्रमवारीच्या इतिहासातील सर्वांत युवा नंबर १ होण्याचा मान मिळविला. गोलंदाजीत रशीदसह भारताचा जसप्रीत बुमराह देखील संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. दोघांचेही समान ७८७ गुण झाले आहेत.
विराटने कसोटीपाठोपाठ एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९०० गुणांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणाता तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डीव्हिलियर्स याने हा कारनामा यापूर्वी केला आहे.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजीत सर्वाधिक गुण घेणार्‍या फलंदाजांमध्ये विराटने काल ब्रायन लारा याला मागे टाकताना सातवे स्थान मिळविले. १९९३ साली मार्च महिन्यात लाराच्या नावावर ९०८ गुण होते. तर विराटच्या नावावर ९०९ गुण जमा आहेत. या यादीत ९३५ गुणांसह व्हिव रिचडर्‌‌स पहिल्या क्रमांकावर आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ३२३ धावा जमविलेल्या शिखर धवनने फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. ७६९ गुणांसह त्याने दहावे स्थान मिळविले आहे. फलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स ८४४ गुणांसह दुसर्‍या व डेव्हिड वॉर्नर ८२३ गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.

गोलंदाजी विभागात युजवेंद्र चहल व कुलदीप यादव या भारताच्या मनगटी फिरकीपटूंना मोठा फायदा झाला आहे. मालिकेत १६ बळी घेत चहलने २१ स्थानांची मोठी उडी घेत आठवे स्थान मिळविले आहे तर १७ बळी घेतलेल्या कुलदीपने ४७ स्थानांची सुधारणा करत थेट १५व्या स्थानी हक्क सांगितला आहे. झिंबाब्वेविरुद्धच्या मालिकेत १६ बळी घेऊन रशीदने गोलंदाजांमध्ये पहिला क्रमांक मिळविला. फलंदाजीत दोन डावांत ५१ धावा जमवून अष्टपैलूंमध्येदेखील त्याने चौथे व फलंदाजांमध्ये ११ स्थाने वर सरकताना ११४वे स्थान प्राप्त केले.

सांघिक क्रमवारीत भारताने दक्षिण आफ्रिकेवरील ५-१ अशा विजयासह ४ मौल्यवान गुणांची कमाई करत १२३ गुणांसह आपले पहिले स्थान अधिक भक्कम केले. चार गुणांचा तोटा सहन करावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेचे ११७ गुण राहिले आहेत. त्यांच्या दुसर्‍या स्थानाला इंग्लंड (११६), न्यूझीलंड (११५) यांच्याकडून धोका संभवतो.