खाण विषयाकडे गंभीरपणे लक्ष देऊन तोडगा काढा : राणे

0
198

>> राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरूवात

राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा अभिभाषणात राज्यातील महत्त्वपूर्ण अशा ‘खाण’ या विषयावर काहीच बोलल्या नाहीत. खाण हा विषय महत्त्वाचा आहे. खाण व्याप्त भागातील व्यावसायिक, गॅरेज, ट्रक मालक आदी अनेक कुटुंबे खाण व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारने या विषयाकडे गंभीरपणे लक्ष देऊन तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी कॉँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी अभिभाषणावरील चर्चेत बोलताना काल केली.

नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याचे काम रखडले आहे. प्रमुख शहरे आणि मुख्य रस्त्याच्या बाजूच्या शेत जमिनीमध्ये मातीचे भराव घालून शेतजमीन बुजविण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे, असा आरोप आमदार राणे यांनी केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आले आहे. राज्यातील शेतकर्‍यांना वन्य प्राण्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. वन्य प्राण्याकडून शेतीची नासधूस केली जात असल्याने शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागत असल्याचे राणे म्हणाले.

विकासासाठी प्राधान्य : काब्राल
सरकारने नवीन साधन सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश काब्राल यांनी चर्चेत बोलताना काल केले. आमदार टिकलो यांनी सरकारने नवीन साधन सुविधा उभारण्याची अनेक कामे हाती घेतली असल्याचे सांगितले.
पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी उपक्रम हाती घेण्याची मागणी आमदार राजेश पाटणेकर यांनी केली.खाणीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्याची गरज आहे. खाण बंदी लागू झाल्यानंतर सुमारे दोन लाख नागरिकांना फटका बसणार आहे, असे प्रतिपादन उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले. चर्चील आलेेमाव यांनी मतदारसंघातील विकास कामांच्या निविदेबाबत चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जात असल्याची तक्रार केली.

थिवीत पाणीटंचाई : हळर्णकर
थिवी मतदारसंघातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. चोवीस तास पाणी पुरविण्याची घोषणा हवेत विरली आहे. नागरिकांना दिवसा केवळ दोन तास पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी आमदार नीळकंठ हर्ळणकर यांनी केली. कुंकळ्ळी मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम खात्याची विकासकामे जीएसटीमुळे रखडली आहेत. जलस्रोत खात्याकडून एकही विकासकाम हाती घेण्यात आलेले नाही. आंबावली येथे पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे, अशा तक्रारी आमदार क्लाफासियो डायस यांनी केल्या.

ग्रेटर पीडीएत ग्रामीण भाग : रेजिनाल्ड
राज्यात नवीन पीडीए स्थापनेला विरोध होत असला तरी सरकारकडून नवीन पीडीएची स्थापना केली जात आहे. नवीन पीडीएमध्ये ग्रामीण भागाचा समावेश केला जात आहे. ग्रेटर पणजी पीडीएमध्ये समाविष्ट पंचायत क्षेत्र वगळण्याची मागणी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली. खाण प्रश्‍नावर कायद्याच्या चौकटीत राहून तोडगा काढण्याची गरज आहे. म्हादईच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.

विरोधी पक्ष नेत्यांनी सुचविल्या २२ दुरुस्त्या
विधानसभेत काल भाजपचे आमदार ग्लेन टिकलो यांनी मांडलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावाला विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी २२ दुरुस्त्या सुचविल्या आहेत. राज्यपाल सिन्हा यांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावावरील चर्चेला काल पासून प्रारंभ झाला. या ठरावावरील चर्चेला बुधवारी सभागृहाचे नेते सुदिन ढवळीकर उत्तर देणार आहेत. राज्यपाल सिन्हा यांच्या अभिभाषणावरील ठराव भाजपचे आमदार ग्लेन टिकलो यांना मांडला. त्याला आमदार राजेश पाटणेकर आणि आमदार नीलेश काब्राल यांनी अनुमोदन दिले. या ठरावाला विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी २२ दुरुस्त्या सुचविल्या असून नियमानुसार त्या सचिवाकडे सादर करण्यात आल्या आहेत. अभिभाषणामध्ये काही मुद्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे वरील मुद्यांचा अभिभाषणात समावेशासाठी दुरुस्त्या सुचविण्यात आलेल्या आहेत, असे विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी म्हटले आहे.