दक्षिण आफ्रिकेला विजय हवाच

0
105

>> भारताविरुद्धचा दुसरा टी-२० सामना आज

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळविला जाणार आहे. पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेला भारतीय संघ या सामन्याद्वारे मालिका आपल्या नावे करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे कसोटी मालिकेतील यशानंतर वनडेत भारताकडून सपाटून मार खावा लागलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-२० मालिकेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याच्या तयारीत आहे.

न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिरंगी टी-२० सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना आज होणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला ३-० असे नमविले व न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला नमविल्यास टी-२० क्रमवारीत भारतीय संघाला द्वितीय स्थान मिळेल. परंतु, कांगारूंचा संघ विजयी झाल्यास भारताचे तिसरे स्थान कायम राहील.

पहिल्या सामन्यात शिखर धवन व रोहित शर्मा यांनी वेगवान सुरुवात भारताला करून दिली होती. कर्णधार कोहलीने सुरेश रैनाला तिसर्‍या स्थानावर बढती देऊन स्वतः मधल्या फळीत उतरण्याचा निर्णय या सामन्यात घेतला होता. महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, मनीष पांडे यांच्या बेभरवशीपणामुळे कोहलीला ‘तो’ निर्णय घ्यावा लागला होता. आजच्या सामन्यात मात्र मनीष पांडेच्या जागी लोकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

ब्रॅडमनना मागे टाकण्याची
विराटला संधी
‘रनमशिन’ विराट कोहली याने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यातील १३ डावांत ८७० धावा केल्या आहेत. आज २१ फेब्रुवारी व २४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या अखेरच्या दोन टी-२० सामन्यांत मिळून १०४ धावा केल्यास विराट डॉन ब्रॅडमन यांच्या ९७४ धावांचा विक्रम मोडीत काढेल. एका दौर्‍यात सर्वाधिक धावा करणार्‍यांच्या यादीत ब्रॅडमन दुसर्‍या क्रमांकावर असून १९३०च्या इंग्लंड दौर्‍यातील ५ कसोटींत त्यांनी या धावा केल्या होत्या. एका दौर्‍यात सर्वाधिक धावा करणार्‍यांमध्ये सर व्हिवियन रिचडर्‌‌स पहिल्या क्रमांकावर आहेत. वेस्ट इंडीजच्या १९७६सालच्या इंग्लंड दौर्‍यात त्यांनी १०४५ धावा केल्या होत्या. चार कसोटींत ८२९ धावा कुटल्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांत त्यांनी २१६ धावा जमवल्या होत्या. विराटने तीन कसोटी मालिकेत ४७.६६च्या सरासरीने २८६ व सहा वनडे सामन्यांत ५५८ धावा केल्या आहेत. टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात विराटला केवळ २६ धावा करता आल्या होत्या.
सामन्याची वेळः रात्री ९.३०