वादग्रस्त सीडीवरून चर्चेत आलेले ज्येष्ठ वकील आणि कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांनी काल संसदीय समिती अध्यक्षपदाचा व कॉंग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला.
आजपासून सुरू होत असलेल्या दुसर्या चरणातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग ५३ वर्षीय अभिषेक मनु सिंघवी एका महिलेशी अश्लील वर्तन करीत असल्याचे दाखविणारी सीडी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली त्यावरून सिंघवी वादात सापडले होते.
दरम्यान, या सीडीतील संवाद छापण्यास वा प्रसारित करण्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी जारी केली आहे. आपण निर्दोष असून केवळ लोकसभेच्या सत्रात आपल्यामुळे गोंधळ होऊन बाधा निर्माण होऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचे सिंघवी यांनी म्हटले आहे. ती सीडी बनावट असल्याचा दावाही सिंघवी यांनी केला आहे. ती सीडी खरी असली तरी त्यातील दृश्यांतून दिसणार्या गोष्टी या वैयक्तिक आणि सहमतीपूर्ण असल्याचे, व त्यातून कोणतीही बेकायदेशीर बाब समोर येत नसल्याचे सिंघवी यांनी म्हटले. दरम्यान, सिंघवी यांच्या समितीने दिलेल्या अहवालावरून केंद्र सरकारने लोकपाल विधेयक संसदेत सादर केले होते. दरम्यान, भाजपने मागणी केली आहे की श्री. सिंघवी यांनी आपल्या राजीनाम्याबाबत संसदेत स्पष्टीकरण द्यावे. दुसरीकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी सीडीचा विषय वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे.