कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यांत भाजप विस्ताराचा निर्धार

0
113

भाजपने लोकसभेची २०१९ ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विविध मतदारसंघात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून कॉँग्रेस पक्षाचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात भाजपचे पक्षसंघटन मजबूत करण्याचा निर्धार काल झालेल्या बैठकीत करण्यात आला.

भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा राज्यसभा सदस्य भुपेंद्र यादव, राष्ट्रीय संयुक्त सचिव (संघटन) बी. एल. संतोष यांनी आमदार, पक्षाचे पदाधिकारी, मतदारसंघाचे अध्यक्ष, मोर्चाचे पदाधिकारी यांची काल बैठक घेऊन पक्षसंघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. बैठकीच्या सकाळच्या सत्राला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची उपस्थिती होती.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जुलै २०१७ मध्ये दौरा करून पक्षसंघटनात्मक कार्याला गती देण्याची सूचना केली होती. तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विविध सूचना केल्या होत्या. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस यादव यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांकडून मागील सहा महिन्यांतील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. पक्षसंघटन आणखीन मजबूत करण्यासाठी त्यांनी सूचना केल्या आहेत. भाजपची गाभा समिती, आमदार, खासदार यांच्याशी पक्ष संघटनात्मक वाढीसाठी चर्चा करण्यात आली.

भाजपचे राज्य पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस, राज्य मोर्चा अध्यक्ष यांच्याशी संघटनात्मक कार्याबाबत चर्चा करण्यात आली. पुढील दोन महिन्यात पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.