धुळेर–म्हापसा येथील रहिवाशी तथा गोवा दमण व दीव स्वातंत्र्य लढ्यातील आझाद गोमंतक दलाचे सेनानी, ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक तसेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते महाबळेश्वर सखाराम नाईक ऊर्फ म्हाबळूकाका यांचे अल्प आजाराने गुरुवारी पहाटे ३.३० वाजता पेडे–म्हापसा जिल्हा रुग्णालयात वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.
दुपारी ४ वाजत निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघाली. वैैंकुठधाम स्मशानभूमीत नातू जयदिप नाईक यांनी त्यांना मंत्राग्नी दिली. यावेळी झालेल्या शोकसभेत प्रा. सुरेंद्र सिरसाट, माजी धर्मा चोडणकर, नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, पत्रकार तुषार टोपले यांची भाषणे झाली. माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी दिल्लीहून शोकसंदेश पाठवून काकांना श्रध्दांजली अर्पण केली.
त्यांच्या दु:खद निधनाची वार्ता कळताच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरविकास मंत्री ऍड्. फ्रान्सिस डिसोझा, हळदोण्याचे आमदार ग्लेन टिकलो, म्हापशाचे नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, माजी सभापती सुरेंद्र सिरसाट, बार्देश बझाराचे अध्यक्ष धर्मा चोडणकर, स्वातंत्र्य सैनिक पुनाजी आचरेकर, लक्ष्मण गोवेकर, रंगनाथ नाईक, लवचंद्र केणी, पोलीस उपअधीक्षक सॅमी लावारिस, पोलिस निरीक्षक तुषार वेर्णेकर, माजी उपअधीक्षक देवू बाणावलीकर, गोवा दूरदर्शनचे वृत्त संपादक सतिश नाईक, ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ, प्रुडंटचे संपादक संदेश प्रभुदेसाई, स्वातंत्र्य सैनिक श्यामसुंदर नाईक, प्रभाकर येंडे, प्रभाकर तिवरेकर, इन गोवा न्युजचे संपादक अनिल लाड, गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक, म्हापसा अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष वासुदेव शिरोडकर, बार्देश बझारचे उपाध्यक्ष महादेव नाटेकर, अखिल गोवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण कारेकर आदींनी अंत्यदर्शन घेतले.
परिचय
महाबळेश्वर सखाराम नाईक ऊर्फ म्हाबळू काका यांचा जन्म म्हापसा येथे २४ जुलै १९२७ रोजी झाला होता. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात उडी घेतली. आझाद गोमंतक दलाचे सदस्य झाल्यानंतर संघटना म्हापसा परिसरात बळकट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. नॅशनल कॉंग्रेस गोवा या मुक्तीलढ्याशी संबंधित संघटनेत त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या सहभागामुळे पोर्तुगीज सरकारकडून त्यांना दहा वर्षे कारावास ठोठावण्यात आला होता शिवाय १५ वर्षांसाठी त्यांचे राजकीय हक्क निलंबित करण्यात आले होते. नंतर १९५९ साली त्यांची मुक्तता करण्यात आली होती.
गोवा मुक्तीनंतरही त्यांनी आपले कार्य चालू ठेवले होते. सुषमा बालवाचन मंदिर तसेच युवक संघ स्थापण्यात त्यांचा पुढाकार होता. याशिवाय बार्देश बझार, म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव, बोडगेश्वर संस्थान आदीशी त्यांचा संबंध होता.