जनमत कौल दिनाचा वापर राजकीय लाभासाठी ः रवी

0
194

काही राजकीय पक्षांकडून जनमत कौल दिनाचा राजकीय लाभ उठविण्यासाठी वापर केला जात असला तरी गोव्यातील जनता हुशार असून राजकीय पक्षाच्या भुलथापाना ती बळी पडणार नाही, असा दावा आमदार रवी नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुढाकाराने गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम राहीले आहे. गोव्याच्या विकासात पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या बरोबरच डॉ. सिक्वेरा यांचा महत्वाचा वाटा आहे. पर्वरी येथील विधानसभा संकुलाच्या आवारात भाऊसाहेबांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. डॉ. सिक्वेरा यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी नाईक यांनी केली.

गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण झाले असते तर विकासाला चालना मिळाली नसती. गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहिल्याने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळाली. जनमत कौल दिनाचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणे अयोग्य आहे. जनमत कौल दिन नकली नसावा, असेही नाईक यांनी सांगितले.
भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात आपला मगो पक्षाशी संबंध नव्हता. माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनी मगो पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर १९७५ मध्ये आपण मगो पक्षात प्रवेश केला, असेही नाईक यांनी सांगितले.
राज्यातील नद्या केंद्र सरकारच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नद्यांचे राष्ट्रीयीकरण धोकादायक आहे. केंद्र सरकारने नद्यांच्या विकासासाठी राज्य सरकारला निधी द्यावा.