जनमत कौलाचा इतिहास पाठ्यपुस्तकात आणणार

0
199

असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांच्या बलिदान व त्यागातून गोव्याला मुक्ती मिळाली तरीही गोवा महाराष्ट्रात विलिन होण्याची भीती गोमंतकीयांना होती. १९६७ मध्ये गोमंतकीय जनतेने धर्म जात पंथ व भाषा विसरून एकजुटीने विलीनिकरणाच्या विरोधात कौल देऊन गोव्याचे स्वातंत्र्य खर्‍या अर्थाने पूर्ण केले याची इतिहासात नोंद व्हायला हवी. गोव्याच्या पाठपुस्तकांत स्वातंत्र्य लढा व जनमत कौलाची माहिती देणारा इतिहास लिहून २०१९ पर्यंत समाविष्ष्ट करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल येथे दिले.

सरकारी पातळीवर दि. १६ जानेवारी हा ‘अस्मिताय दिवस’ म्हणून मडगाव येथे काल साजरा झाला. यावेळी जुने बाजार वाहतूक बेट ते रविंद्र भवनपर्यंत सजवलेल्या पदपथावर जनमत कौलास मोलाचे योगदान दिलेल्या ३६ नेत्यांच्या भल्यामोठ्या प्रतिमेचे मुख्यमंत्र्यांनी अनावरण केले. या नेत्यांच्या कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यानंतर रविंद्र भवनात जाहीर समारंभ झाला.

या समारंभाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रमुख अतिथी होते. अध्यक्षस्थानी कृषीमंत्री विजय सरदेसाई, सन्माननीय अतिथी म्हणून उपसभापती मायकल लोबो, नगराध्यक्ष डॉ. बबिता प्रभुदेसाई, रविंद्र भवनाचे अध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते. त्याशिवाय जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगांवकर आदी उपस्थित होते.
गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालय व रविंद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी रविंद्र भवनच्या स्पर्धेसाठी आलेले विद्यार्थी उपस्थित होते. मात्र, लोकांची संख्या कमी होती.

गोव्याच्या अस्तित्वासाठी लोकलढा
गोवा मुक्तीनंतर गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी लोकांना लढा द्यावा लागला. १९६७ मध्य गोव्याचे वेगळे अस्तित्व गोमंतकीयांनी राखले व १९८७ साली घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर स्वातंत्र्य पूर्ण झाले. हा सर्व इतिहास निपक्षपातीपणे लिहिण्याची गरज आहे. जनमत कौल जिंकण्यासाठी आज त्यांचे फोटो लावले. त्याशिवाय आणखी काही नावे असतील. त्यांचेही फोटो लावण्यात येतील, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. पर्रीकर म्हणाले, बाकीबाब बोरकर यांनी सुंदर कविता लिहिल्या. एम. बॉयर यांनी तियात्रे सादर करून जागृती केली. विलीनीकरण झाल्यास भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री राहणार नाहीत असाही प्रचार एका बाजूने केला जात होता. त्याचाही परिणाम जनमत कौल जिंकण्यात झाला असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जनमताच्या इतिहास लेखनाची गरज ः लोबो
जनमत कौलानंतर अस्मिताय दिवस साजरा करण्यात सरकारला ५१ वर्षे लागली याचे दुःख होत असल्याचे उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले.
या लढ्याची सुरवात सासष्टीतून झाली. त्याचा इतिहास भावी पिढीसाठी लिहिण्याची गरज आहे. मडगाव येथे फोटो लावले आहेत, तसे राजधानी पणजीतही सरकारने लावावेत. विधानसभा संकुलात जॉक सिकैरा यांचा पुतळा उभारण्यासाठी आपण प्रयत्न करीन व मडगाव येथे ज्यांचे फोटो लावले ते विधानसभागृहात लावावेत. त्यामुळे गोवा वेगळा राहिल, असेही उपसभापती लोबो यानी सांगितले.

कौलाच्या बाजूने राहिलेल्यांना
सलाम ः सरदेसाई
अस्मिता ज्यांनी राखून ठेवली त्याचे स्मरण करणे हे कर्तव्य समजतो. तसेच १ लाख ७२ हजार लोकांनी कौलाच्या बाजूने मते दिली त्यांना आपण सलाम करतो, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले. आज गोमंतकियांसमोर मोठे आव्हान आहे. परप्रांतिय येथे येवून गोमंतकीय बनले आहेत. त्या आव्हानाला यशस्वीपणे तोंड द्यायचे असेल तर एकजूट अभंग राखली पाहिजे.