म्हादई : पर्रीकरांच्या निर्णयाविरोधात गोसुमं राज्यव्यापी आंदोलन छेडणार

0
66

कर्नाटकमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी भाजपने म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्याचा डाव आखलेला असून पर्रीकरांच्या या निर्णयाविरोधात गोवा सुरक्षा मंच आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्र्यांनी म्हादई प्रश्‍नावर एक मोठा ‘यु टर्न’ घेतलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह व पर्रीकर यांच्यात नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत वरील कट शिजल्याचा आरोप शिरोडकर यांनी यावेळी केला.

म्हादईप्रश्‍नी गोवा सुरक्षा मंच टप्प्या टप्प्याने आंदोलन छेडणार आहे. येत्या २७ डिसेंबर रोजी डिचोली व सांगे येथे व २८ रोजी मडगाव व म्हापसा तर ३० रोजी फोंडा येथे स्थानिक पातळीवर मोर्चे व धरणे धरण्याचा कार्यक्रम होणार आहे. नंतर राज्य स्तरावर एक मोठा मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. पणजीत हा मोर्चा होणार असून त्याची तारीख ठरली नसल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. नद्यांचे राष्ट्रीयकरण असो अथवा कोळसा, अमली पदार्थ असो अथवा कॅसिनो सर्वच प्रश्‍नांवर मनोहर पर्रीकर यानी गोमंतकीयांची दिशाभूल केली असल्याचे शिरोडकर म्हणाले.

गोमंतकीयांनाच पिण्याचे पाणी नाही
गोमंतकीयानांच पिण्यासाठी पाणी मिळत नाही. राज्यातील कित्येक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. बर्‍याच ठिकाणी लोकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अशा परिस्थितीत कर्नाटकला पिण्यासाठी पाणी देणे हे धोक्याचे ठरणार असल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. पाण्यासाठीच्या कोर्ट-कचेरीवर गोव्याने करोडो रु. खर्च केलेले आहेत हे पर्रीकर यांनी विसरू नये असेही शिरोडकर यावेळी म्हणाले. पर्रीकर यांना गोव्याच्या जनतेची चिंता नसून त्यांना केवळ आपली खुर्ची प्रिय आहे, असा आरोपही शिरोडकर यांनी यावेळी केला.

दरम्यान, शनिवार व रविवार (२३ व २४ डिसेंबर) असे दोन दिवस गोवा सुरक्षा मंचची चिंतन बैठक झाली. ह्या बैठकीत पक्ष बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील रणनिती ठरवण्यात आल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.