पर्रीकरांनी पहिल्यांदा पणजीला पाणी द्यावे

0
72

गिरीश चोडणकरांचा सल्ला

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दुसर्‍यांना पिण्याचे पाणी देण्यापूर्वी आपल्या पणजी मतदारसंघातील मतदारांना नियमित पिण्याचे पाणी द्यावे असा सल्ला अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांनी काल दिला. मुख्यमंत्री पर्रीकर मागील २२ वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पर्रीकर मतदारसंघात विविध भागात मुबलक पिण्याचे पाणी पुरविण्यात अपयशी ठरले आहेत. सरकारकडून चोवीस तास पाणी देण्याचे आश्‍वासन दिले जात आहे. मात्र, पणजीतील नागरिकांना दिवसातून केवळ दोन तास पाणी दिले जात आहे. पणजी शहरात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पणजीकरांची तहान भागविण्यात मुख्यमंत्री पर्रीकर अपयशी ठरले आहे, अशी टिका चोडणकर यांनी केली.

मुख्यमंत्री पर्रीकर निवडणुकीच्या वेळी मतदारांना अनेक आश्‍वासने देतात. परंतु आश्‍वासनांच्या पूर्तीकडे लक्ष दिले जात नाही. मतदारांना गृहीत धरले जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कदंब पठारावरील जनतेला गोवा मुक्तीदिनाच्या दिवशी पाण्यासाठी जल सत्याग्रह करावा लागला, असेही चोडणकर यांनी म्हटले आहे. चोडणकर यांनी पणजी पोटनिवडणुकीच्या वेळी पाणी प्रश्‍नाला महत्त्वाचा मुद्दा बनविला होता.