दूध उत्पादक सोसायट्यांमध्ये जानेवारीपासून दूधतपासणी यंत्रे

0
93

पशुसंवर्धन खात्याने राज्यातील सर्व दूध उत्पादक सोसायट्यांमध्ये स्वयंचलित अत्याधुनिक दूध तपासणी यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जानेवारी २०१८ पासून प्रायोगिक तत्त्वांवर फोंडा आणि सत्तरी तालुक्यातील निवडक ५६ दूध उत्पादकांच्या सोसायट्यांमध्ये अत्याधुनिक यंत्रे बसविण्यात येणार आहेत. दर्जेदार दूध उत्पादन, शेतकर्‍यांना रास्त दर आणि आधारभूत किंमत वेळेवर उपलब्ध करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे अशी माहिती पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. संतोष देसाई यांनी दिली.

स्थानिक दूध उत्पादक सोसायट्यांमध्ये बसविण्यात येणारी दूध तपासणी यंत्रे पशुसर्ंवधन खाते, गोवा डेअरी यांच्याशी थेट जोडण्यात येणार आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना दुधातील फॅट व इतर घटक, किंमत व अन्य माहिती मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातून देण्याची सोय यंत्रात उपलब्ध आहे. राज्यात १७८ दूध उत्पादक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांकडे दूध तपासणी करण्यासाठी योग्य यंत्रणा नाही. त्यामुळे दूध उत्पादकाला रास्त दर मिळत नाही. तसेच दुधाची योग्य तपासणी सुध्दा होत नाही, असे डॉ. देसाई यांनी सांगितले. नवीन स्वयंचलित अत्याधुनिक दूध तपासणी यंत्रांमुळे दुधातील फॅट व इतर माहिती त्वरित मिळण्याची सोय उपलब्ध आहे. या माहितीची दूध सोसायट्यांबरोबरच पशुसर्ंवधन खाते आणि गोवा डेअरीकडे ऑनलाइन पद्धतीने नोंद होणार आहे. त्यामुळे दूध सोसायट्यांच्या कारभारात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. उच्च दर्जाच्या दुधाला चांगला दर मिळणार आहे. दुधामध्ये भेसळ असल्यास त्वरित नोंद होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना भेसळमुक्त दर्जेदार दूध मिळण्यास मदत होणार आहे, असा दावा डॉ. देसाई यांनी केला.

जीएसटीमुळे दूध तपासणी यंत्रे बसविण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. जीएसटी लागू होण्यापूर्वी निविदा जारी करण्यात आली होती. परंतु, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जीएसटी लागू झाल्याने यंत्रे बसविण्यासाठीच्या निविदेमध्ये आवश्यक सुधारणा करावी लागली, अशी माहिती संचालक डॉ. देसाई यांनी दिली.

फोंडा व सत्तरी या दोन्ही तालुक्यांतील संबंधित दूध उत्पादकांच्या सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन स्वयंचलित अत्याधुनिक दूध तपासणी यंत्राबाबत माहिती देण्यात आली आहे. दूध सोसायट्या, पशुसर्ंवधन, गोवा डेअरीच्या कर्मचार्‍यांना यंत्रे हाताळणीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यंत्रे बसविण्यात आल्यानंतर निर्माण होणार्‍या काही प्रश्‍नांबाबत पशुसंवर्धन खात्याने दूध उत्पादक सोसायटी प्रमुखांना विधायक सूचना केल्या आहेत. या उपक्रमाचा आढावा घेतल्यानंतर इतर दूध सोसायट्यांमध्ये यंत्रे बसविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही संचालक देसाई यांनी सांगितले.

या यंत्रांमुळे दुधाला दर निश्‍चित करताना कोणताही घोळ होणार नाही. दूध उत्पादक शेतकर्‍यांना साधारण तीन महिन्यानंतर आधारभूत किंमत मिळते. या यंत्रांमुळे शेतकर्‍यांच्या दुधाची पशुसर्ंवधन खात्याकडे नोंद होणार असल्याने आधारभूत किंमत सुध्दा त्वरित वितरित करण्यास मदत होणार आहे, असेही डॉ. देसाई यांनी सांगितले.

पशुसर्ंवधन खात्याने गोवा डेअरीला सोसायट्यांमध्ये अत्याधुनिक दूध तपासणी यंत्रे बसविण्याबाबत पत्र पाठविले आहे. या यंत्रांमुळे स्वच्छ व दर्जेदार दूध उत्पादन उपक्रमाला आणखीन चालना मिळणार आहे. तसेच गोवा डेअरीला उच्च दर्जाचे दूध मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसो सावंत यांनी दिली.