बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पितळातील नवीन कार्डिएक सुपरस्पेशालिटी विभागाची पायाभरणी जानेवारी २०१८ मध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिली.
बांबोळी येथील पोस्ट ऑपरेटीव्ह कार्डियो थोरासीक आयसीयू विभागाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री राणे बोलत होते. पाच खाटांची सुविधा असलेला हा विभाग वास्कोतील बांदोडकर स्ट्रट यांनी पुरस्कृत केला आहे.
हॉस्पिटलमध्ये पाचशे हार्ट ऑपरेशन आणि दीड ओपन हार्ट ऑपरेशन झालेली आहेत. हार्ट ऑपरेशनसाठी रूग्णांना प्रतिक्षा यादीत ठेवावे लागत आहे. सध्या प्रतीक्षा यादीचा कालावधी दीड महिना आहे. नवीन विभागामुळे प्रतीक्षा यादीचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले
केंद्र सरकारच्या आर्थिक सहकार्यातून सुपरस्पेशालिटी विभागाचे बांधकाम केले जाणार आहे, या विभागाच्या बांधकामाची निविदा ठेकेदाराला बहाल करण्यात आली आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
कार्डिएक रूग्णवाहिकेसाठी डॉक्टरांची कमतरता भासू लागली आहे. स्थानिक पातळीवर कार्डिएक डॉक्टर उपलब्ध नसल्याने बाहेरून डॉक्टर आणून सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
शस्त्रक्रिया विभागाजवळच पोस्ट ऑपरेटीव्ह कार्डियो थोरासीस आयसीयू विभागात सुरू केल्याने रूग्णांवर चांगली देखरेख ठेवण्यास आणि रूग्णांवरील संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे, असे डॉ. शिरीष बोरकर यांनी सांगितले. कार्डिओलॉजीमध्ये शिक्षण विभाग आणि सुपर स्पेशालीटी वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जीेएमसीचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी दिली.